Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 23 November 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं
घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत
आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप
लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका
अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क
वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** २०२१ वर्षासाठीचे शौर्य पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान
**
विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला सहा पैकी
पाच जागा निश्चित मिळतील - भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार
चंद्रकांत पाटील यांचा दावा
**
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत
औरंगाबाद परिमंडलातील अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील १९६ ग्राहकांना वीजजोडणी
आणि
** कोविड लसीकरणासंदर्भात बीड जिल्हा रेड झोन मधून आता येलो झोन
मध्ये
****
राष्ट्रपती भवनात आज झालेल्या तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२१
वर्षासाठीचे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या गलवान
क्षेत्रात ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान बलिदान देणाऱ्या संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. सुभेदार संजीव
कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलं. नायब
सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार के. पलानी, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना मरणोत्तर वीर चक्रानं
सन्मानित करण्यात आलं. वायुसेना
प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात
आलं.
****
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदार
संघासाठी काँग्रेसनं रविंद्र भोयर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भोयर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपचे चंदशेखर बावनकुळे, आणि काँग्रेसचे भोयर यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी या मतदार
संघातून अर्ज दाखल केले आहेत.
धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार
संघासाठी भाजपकडून माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांनी
आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघासाठी
महाविकास आघाडीचे उमेदवार धुळ्याचे नगरसेवक गौरव वाणी यांनी आज आपला अर्ज दाखल
केला.
दरम्यान,
विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला सहा पैकी
पाच जागा निश्चितपणे मिळतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
प्रज्ञा सातव यांच्यासाठी भाजप उमेदवार संजय केनेकर यांनी
उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली, या पार्श्वभूमीवर
विधान परिषदेच्या इतर जागांसाठीची निवडणुकही बिनविरोध होऊ शकते, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी
यावेळी केलं.
****
महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच लाख घरं बांधण्याचं उद्दीष्ट असून ते
पूर्ण करण्याचा संकल्प अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा
निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. आज मंत्रालयात या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुश्रीफ
यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अधिकाऱ्यांनी
कमीत कमी वेळेत घरं बांधून सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करावं, अशी सूचना मुश्रीफ यांनी केली. राज्यमंत्री
अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते. ही घरं बांधण्यासाठी साहित्य मिळण्यात येणाऱ्या
अडचणी येत असतील, तसंच या घरांकरता केंद्र सरकारकडून रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास,
त्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असं सत्तार यांनी सांगितलं.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या एक जानेवारी २०२२
पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य
संस्थांकडून दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही
मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. नाट्य
स्पर्धा सादरीकरण दिनांक १५ जानेवारी पासून सुरुवात होईल, अशी घोषणाही देशमुख
यांनी आज केली. जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभाग
नोंदवावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.
****
येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, केंद्र सरकार अनुसूचित
जातीच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणार आहे, केंद्रीय पर्यटन
आणि सांस्कृतिक कार्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. महापरिनिर्वाण
दिनानिमित्त पंचतीर्थांवर अर्थात बाबासाहेबांशी संबंधित पाच
महत्वाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे कार्यक्रम होणार असून
या ठिकांणामध्ये नागपूर दीक्षा - भूमीचा तसंच बाबासाहेबांचं जन्म गाव असलेल्या, मध्य प्रदेशातल्या महू या गावाचा समावेश आहे. येत्या २६
तारखेला संविधान दिनानिमित्तही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचं रेड्डी
यांनी सांगितलं.
****
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारानं १४
एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत
औरंगाबाद परिमंडळातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती
प्रवर्गातील १९६ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत या
योजनेचा लाभ घेता येणार असून गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद महावितरणच्या वतीनं
करण्यात आलं आहे.
****
कोविड लसीकरणासंदर्भात बीड जिल्हा हा रेड झोन मधून आता
येलो झोन मध्ये आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात तालुका निहाय फिरती कोविड लसीकरण पथकं तयार करण्यात आली असून जिल्ह्याच्या
सीमेवर मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युध्दपातळीवर
सुरू असल्याचं डॉ साबळे यांनी सांगितलं.
****
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडी
सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या आज बीड इथं
पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारवर टीका करण्यातच वेळ घालवला, असंही खासदार मुंडे यांनी नमूद केलं. या सरकारनं गेली दोन वर्ष शेतकऱ्यांची
फसवणूक केल्याचा आरोपही डॉ. मुंडे यांनी यावेळी केला.
****
राज्यातील
इतर मागास वर्ग - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार उपाययोजना करत नसल्याचा आरोप
औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत
होते. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा
एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणीही
आमदार सावे यांनी यावेळी केली.
//***************//
No comments:
Post a Comment