Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्याचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय - ईडीसमोर हजर झाले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी
वसूल केल्याचा आरोप केल्यानंतर, ईडीनं देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावलं होतं. त्यांची
पाच कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसंच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट
जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा
देण्यास नकार दिल्यानं आज अखेर देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले.
उच्च न्यायालयानं
संविधानातल्या अधिकारात आपल्याला विशेष कोर्टात जाण्याचं स्वातंत्र्य दिलं असतानाही,
आपण आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं, देशमुख
यांनी म्हटलं आहे.
****
अंमली पदार्थांचा
व्यवसाय करणाऱ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा जयदीप राणा
याचा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक
यांनी आज ट्विटरवर प्रसिद्ध केला असून, अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधल्या नद्यांच्या
संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा केला आहे. यासंदर्भात मुंबईत
वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, दिवाळीनंतर
याबाबतचे पुरावे जाहीर करणार असल्याचं सांगितलं. मलिक यांच्या जावयाकडे अंमली पदार्थांचा
साठा सापडला, त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला ड्रग्ज माफिया म्हणायचे का,
असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.
****
कोविड महामारीमुळे
गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली हज यात्रा यंदा होणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक
विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत याबाबतची घोषणा केली. हज यात्रेसाठी
आता मोबाईल ऍप सुद्धा बनवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कोविड प्रतिबंधक लसीचे
दोन डोस घेतलेल्यांनाच हज यात्रेला परवानगी देण्यात आल्याचं नक्वी यांनी सांगितलं.
****
देशात सध्या
सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. आतापर्यंत या लसीच्या १०६ कोटी ३१ लाख २४ हजार २०५ नागरीकांना लस देण्यात आली.
यापैकी ७३ कोटी ३६ लाखांहून अधिक पहिल्या मात्रा, तर ३२ कोटी ९५ लाखांपेक्षा अधिक दुसऱ्या
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १२ हजार ५१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २५१ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख
८५ हजार ८१४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५८ हजार ४३७ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल १२ हजार ७१८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३६ लाख ६८ हजार
५६० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५८ हजार ४३७ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय
गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल डेअरी सहकार योजनेची सुरुवात केली. अमूलच्या
७५व्या वर्धापनदिनानिमित्त गुजरातमधल्या आणंद इथं आयोजित कार्यक्रमात ही योजना सुरु
करण्यात आली. ‘सहकाराकडून समृद्धीकडे’ हे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सरकारच्या सहकार
मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाद्वारे एकूण पाच हजार कोटी रुपयांच्या
गुंतवणुकीसह डेअरी सहकार योजना राबवण्यात येणार आहे. ‘शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं’
आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डेअरी सहकार योजनेअंतर्गत, गोवंश
विकास, दूध खरेदी, प्रक्रिया, गुणवत्ता हमी, दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक,
निर्यात यासारख्या उपक्रमांसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून, सहकारी
संस्थांना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.
****
कार्तिकी
यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या
अधीन राहून वारी भरवावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची
माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. कार्तिकी यात्रा
भरवण्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्तिकी वारीतला एकादशीचा मुख्य
सोहळा सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.
****
आळंदी इथं
झालेल्या अठराव्या एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष
गटात नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई करत सांघिक अजिंक्यपद पटकावलं.
महिला गटात, तसंच उपकनिष्ठ गटातही ३४ गुणांसह राज्याच्या संघानं अजिंक्यपद पटकावलं
आहे. महाराष्ट्राची कर्णधार प्रणिता सोमण हिनं दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्ण पदक
जिंकून सर्वोत्तम महिला सायकलपटूचा बहुमानही मिळवला.
****
No comments:
Post a Comment