Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती
करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा
सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या
काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी
आढावा घेणार, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि हिंगोलीचा समावेश
·
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम
सुरू होणार
·
आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्यामुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेचा यशस्वी
मुकाबला करू- इंडियन मेडिकल असोसिशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांना विश्वास
·
राज्यात एक हजार १७२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोन
जणांचा मृत्यू तर ४५ बाधित
·
गडचिरोली जिल्ह्यात अनेक
गावांना भूकंपाचे धक्के
·
तुळजापूरच्या
नगराध्यक्षसह चौदा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी
निलंबित
·
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला आजच्या वसुबारसनं
प्रारंभ
आणि
·
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडलडून
आठ गडी राखून पराभव
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या बुधवारी तीन नोव्हेंबरला कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत
आढावा बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र, झारखंडसह काही राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण
अपेक्षित प्रमाणात झालेलं नसल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, बुलडाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये
लसीकरणाचं प्रमाण कमी आहे.
****
भारताच्या राज्यघटनेत विहित केलेल्या आदर्शांची भारतीय सशस्त्र दलांनी
काळजीपूर्वक देखभाल केली असल्याचं, सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत
यांनी म्हटलं आहे. देशानं गेल्या काही वर्षांत जी आर्थिक प्रगती पाहिली आहे, त्याचं श्रेय या दलांनी
सीमेवर आणि अंतर्गतरित्या निर्माण
केलेल्या शांततापूर्ण वातावरणाला दिलं जाऊ शकतं, असं
त्यांनी स्पष्ट केलं. ‘राष्ट्र उभारणीत भारतीय सशस्त्र
दलांची भूमिका’, या विषयावर आकाशवाणीच्या सरदार पटेल वार्षिक स्मृती व्याख्यानात ते काल बोलत
होते. ‘हर काम देशके नाम’ या भावनेनं
या दलांनी आपलं ध्येय पूर्ण केलं आहे, असे कौतुकोद्गार रावत
यांनी यावेळी काढले.
****
ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन समग्र विकास साधता येईल, असा विश्वास,
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत,
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या योग्य समीकरणावर लक्ष देण्याची गरज त्यांनी नमूद
केली. देशातल्या सर्वोच्च संस्थांमधल्या विद्यार्थ्यांनी उद्योजक, संशोधक,
व्यावसायिक आणि उत्तम व्यक्ती होण्याचं, तसंच राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान
देण्याचं आवाहन प्रधान यांनी केलं.
****
राज्यातल्या
विद्यापीठांमध्ये पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरी इथं ही घोषणा केली. रत्नागिरी
जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, जलकार्यशाळेच्या
उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता
आणि जलशक्ती अभियान राबवण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह
यांनी यावेळी केलेल्या भाषणात, हवामान बदल आणि पाण्याचं विज्ञान समजून घेण्याची गरज
व्यक्त केली. शेतीला पाण्याशी जोडलं जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे. राज्यात पाण्याच्या
दक्षतेविषयी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही, राजेंद्रसिंह यांनी केली.
****
काँग्रेसचे
पुण्यातले आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी
२९ नोव्हेंबरला मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक
आयोगानं काल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
****
नांदेड
जिल्ह्यात "मिशन कवचकुंडल" अंतर्गत किनवट तालुक्यात शिवरामखेडा या अतिदुर्गम
भागातल्या गावानं, काल एकाच दिवशी ७० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण
पूजार यांनी, काल या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन, सर्वांना कोविड लसीचं महत्त्व पटवून
देत, लस घेण्याचं आवाहन केलं. त्यामुळे गावातल्या १९२ पैकी १३४ गावकऱ्यांनी काल कोविड
लसीची मात्रा घेतली.
****
आरोग्य
यंत्रणा सक्षम झाल्यामुळे कोविडची तिसरी लाट आली तरी यशस्वी मुकाबला करू, असा विश्वास,
इंडियन मेडिकल असोसिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयलाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल
नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात १०० कोटीहून अधिक नागरिकांचं लसीकरण झाल्याबद्दल,
त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मोठ्या प्रमाणावर झालेल्या लसीकरणामुळे कोविडच्या
संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
इंडियन मेडीकल असोसिएशन सुरुवातीपासूनच लसीकरणात सरकारला मदत करत असून, समाजात ज्या
लोकांपर्यंत पोहोचणं कठीण आहे, त्यांच्यापर्यंत लस पोहोचण्यासाठी सर्व पावलं उचलत असल्याचं,
डॉ जयलाल यांनी सांगितलं.
****
राज्यात काल एक हजार १७२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ११ हजार, ७८ झाली आहे. काल २०
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ४० हजार २१६ झाली
असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे.
काल एक हजार ३९९ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५० हजार ५८५ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक
५७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १६ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर बीड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उस्मानाबाद
जिल्ह्यात १४ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात
११, औरंगाबाद आठ, लातूर पाच, नांदेड चार, तर जालना जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश
आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, अहेरी, चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंप मापकावर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.
गडचिरोली-तेलंगणा राज्य सीमेवरील जाफ्राबाद चक गावाजवळ भूकंपाचा
केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूपासून ७७ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले
आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या
काही भागालाही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.
****
तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी
यांच्यासह चौदा नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून सहा वर्षांसाठी निलंबित
करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी काल ही माहिती दिली. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या तुळजापूर
नगरपालिकेतल्या १४ नगरसेवकांनी, मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना लावलेली
गैरहजेरी, तसंच पक्षविरोधी काम
केल्याचा ठपका ठेवत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
शहरातला गुंठेवारीचा प्रश्न हाताळताना पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांची भुमिका वेगवेगळी
असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकार आणि शिवसेनेच्या सांगण्यावरुन मनपा आयुक्तांनी
गुंठेवारीत वसुली सुरु केली असून, मध्यमवर्गीय आणि गरीबांना अवाजवी दंड आकारण्यात येत
असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
****
आज
वसुबारस. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला आजपासून प्रारंभ होत आहे. आजच्या दिवशी
सवत्स धेनू अर्थात गाय वासराची पूजा करून, त्यांना गोड घास भरवण्याची प्रथा आहे. दरम्यान,
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गृहसजावटीसह कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स
वस्तू तसंच इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
****
गावाचा
विकास करण्यासाठी स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, फळझाडांची लागवड, शिक्षण आणि वृद्धांचा
सन्मान या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन, औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श गाव पाटोदाचे
राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केलं आहे. आझादी का अमृत
महोत्सवअंतर्गत परभणी इथं ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळेत
पेरे पाटील बोलत होते. ग्रामपंचायतींनी लोकांच्या गरजा ओळखून काम करावं, नागरिकांनी
शौचालयाचा नियमित वापर करण्याचं आवाहन पेरे पाटील यांनी केलं.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा फक्त मराठवाड्यापुरता
मर्यादित नसून, पूर्ण हैदराबाद
संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी होता, असं उस्मानाबाद इथले स्वातंत्र्य
सैनिक भास्करराव नायगावकर यांनी सांगितलं आहे. काल सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त
हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या आठवणी आणि त्यातल्या आपल्या सहभागाबद्दल आकाशवाणीशी बोलताना,
नायगावकर यांनी निजामाच्या मनसुब्यांविषयी माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातून मिळणारा
महसूल निजामाच्या खासगी खर्चासाठी वापरला जात असल्याचं नायगावकर यांनी सांगितलं. ते
म्हणाले....
[ Ramesh
Jaibhaye - Freedom Fighter Osmanabad 01112021 - ]
****
टी
ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताचा न्यूझीलंडलडून आठ गडी राखून पराभव झाला.
प्रथम फलंदाजी करत भारतनं दिलेलं १११ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं १४व्या षटकातच पूर्ण
केलं.
****
युवा सेनेच्या वतीनं काल राज्यभर पेट्रोल-डिझेल
यासह गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद
इथं युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या सायकल
फेरीत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. इंधन दरवाढीच्या निषेधात यावेळी
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जालना
इथं युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्त्वाखाली गांधी चमन ते
सावरकर चौकापर्यंत सायकल रॅली काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं युवा सेनेच्या वतीनं सायकल फेरी काढून आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय
जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्या
नेतृत्वाखाली युवा सेनेने सायकल रॅली काढून आपला रोष व्यक्त केला. उस्मानाबाद,
नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, सोलापूर आणि धुळे इथंही युवा सेनेच्या वतीन आंदोलन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर जळकोट भागातले रस्ते खराब झाले असून, या रस्त्यांची तत्काळ
दुरुस्ती करण्याचे निर्देश, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे
यांनी दिले आहेत. उदगीर जळकोट तालुक्यातल्या विविध विकास कामासंदर्भात लातूर इथं झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक
बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तसंच विहीत
मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या.
****
No comments:
Post a Comment