Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या निवडणुकीत कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब
पाटील हे विजयी झाले आहे. पाटण सोसायटी मतदार संघातील निवडणुकीत सत्यजिसिंह पाटणकर,
जावळी सोसायटी मतदार संघातील निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे, खटाव प्राथमिक कृषी पतपुरवठा
मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे, नागरी
बँका आणि ग्रामीण सहकारी पतपेढी मतदार संघात रामराव लेंभे हे विजयी झाले आहेत.
दरम्यान, कोरेगाव आणि माण प्राथमिक
कृषी पतपुरवठा मतदार संघातील परस्परविरोधी उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढून
निकाल घोषित करण्यात आला. यात माण इथल्या शेखर गोरे आणि कोरेगाव इथल्या सुनील खत्री
यांना विजयाचा कौल दिला. इतर मागास प्रवर्गातून प्रदीप विधाने, महिला प्रतिनिधी राखीव
मतदारसंघाच्या निवडणूकीत कांचन साळुंखे आणि ऋतुजा पाटील विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा
पराभव झाला आहे. शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच रांजणे यांनी केवळ एक मतानं
पराभव केला. या पराभवानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या
जिल्हा कार्यालयावर दगडफेक केली.
****
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला १७ तर चार जागा भारतीय
जनता पक्ष पॅनलला मिळाल्या आहेत.
****
विधान परिषदेसाठी मुंबईतून
सुनील शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे,
सुभाष देसाई, अनिल परब तसंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल
परब यांच्या मुंबईतील शासकीय निवास स्थानाबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
आज आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी परब यांच्या निवासस्थावावर काळं फेकण्याचाही प्रयत्न
केला. पोलिसांनी या प्रकरणी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईत आझाद मैदानात
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
****
नांदेड इथं आज भारतीय जनता
पक्षाच्या वतीनं नांदेड, अमरावती आणि मालेगाव इथल्या हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ
धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व राज्याचे माजी कृषि राज्यमंत्री अनिल
बोंडे यांनी केलं. यावेळी बोंडे यांनी रजा अकादमीवर बंदी आणि त्यातील पदाधिकाऱ्यांविरुध्द
कारवाई करावी अश्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांना दिलं.
****
भारतमाता प्रकल्प १ आणि २ अंतर्गत
आतापर्यंत ६५ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बनवले असल्याचं केंद्रीय रस्ते आणि
वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. येत्या २०२५ पर्यंत २ लाख किलोमीटर
पर्यंतचे रस्ते बनवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय
महामार्गालगत झाडे लावण्यात येणार असून यामध्ये स्थानिक नागरिक, शेतकरी, एनजीओ यांचा
सहभाग अपेक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
भारतातून ५० हजार मेट्रिक टन
गहू अफगाणिस्तानला आपल्या हद्दीतून पाठवण्याला पाकिस्तान सरकारनं परवानगी दिली आहे.
अफगाणिस्तान आंतर-मंत्रालय समन्वय कक्षाच्या पहिल्या सर्वोच्च समितीची, पंतप्रधान इम्रान
खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ही परवानगी देण्यात आली. भारतानं अफगाणिस्तानला
मानवतावादी मदत म्हणून ५० हजार मेट्रिक टन गहू देण्याची घोषणी केली आहे. भारतानं कार्यपद्धती
निश्चित केल्यानंतर पाकिस्तानच्या वाघा सीमेवरून गहू पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला
पाठवला जाईल. भारत तसंच अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी
यांनी पाकिस्तानमार्गे गहू वाहतूक करण्यास परवानगी देण्याची विनंती पाकिस्तानला केली
होती.
****
देशात गेल्या चोवीस तासांत
७ हजार ५७९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. तर १२ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी
परतले असून आतापर्यंत एकूण ३ कोटी ३९ लाखांहून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले
आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात १८
हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत ११७ कोटी ६३ लाखांहून
अधिक तर गेल्या २४ तासात ७१ लाख ९२ हजार नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात ७५ टक्के कोरोना
प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात २२२ गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण झाल्याची
माहिती नाशिकचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कैलास भोई यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत
३६ लाख ८१ हजार नागरिकांना पहिला तर १४ लाख ८८ हजारांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment