Tuesday, 23 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.11.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या चोवीस तासांत ७ हजार ५७९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात १२ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशभरात १८ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत ११७ कोटी ६३ लाखांहून अधिक तर गेल्या २४ तासांत ७१ लाख ९२ हजार नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

राज्य परिवहन-एसटी महामंडळाचे कर्मचारी उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर सहकुटुंब मोर्चा काढणार आहेत. यामुळे परब यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत अद्याप तोडगा न निघाल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी सहकार पॅनलचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ एक जागा भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनलला मिळाली आहे. 

****

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालात कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांना या निवडणुकीत १४० पैकी ७४ मतं मिळाली आहेत. उर्वरीत मतदार संघातील मोजणी अद्याप सुरू आहे.

****

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला ११ तर एक जागा भारतीय जनता पक्ष पॅनलला मिळाली आहे. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार निवडून आले आहेत. एका जागेवर भाजपचे आमदार संजय सावकारे निवडून आले. धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलने १३ जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे.

****

No comments: