Wednesday, 24 November 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      हवामानाची अचूक माहिती देणारं सी बँड रडार डॉप्लर औरंगाबाद जिल्ह्यात म्हैसमाळ इथं बसवण्यास केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची परवानगी

·      महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे अंतरिम वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारकडून प्रस्ताव

·      औरंगाबाद शहराला स्वच्छ वायू आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी येत्या पाच वर्षांत ८७ कोटी रुपयांचा निधी मिळणार

·      नांदेड जिल्ह्यात कामठा इथल्या व्यापारी संकुलात अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा, १११ किलो अंमली पदार्थ जप्त

·      राज्यात ७६६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात २ जणांचा मृत्यू तर ३४ बाधित

आणि

·      औरंगाबाद शहरातील विविध विकास कामांचा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

****

औरंगाबादच्या जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या म्हैसमाळ इथं सी बँड रडार डॉप्लर बसवण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयानं यासाठी परवानगी दिली आहे. या रडारच्या माध्यमातून हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात हे रडार महत्वाची भूमिका निभावणार असून तीनशे ते चारशे किलोमीटरचा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार आहे. यासाठी पंधरा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं मंत्री डॉक्टर कराड त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे अंतरिम वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परीवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत ही अंतरिम वेतनवाढ असेल. अहवाल आल्यानंतर जर समितीनं विलिनीकरण करण्यास अनुकूलता दर्शवली तर पुन्हा वेतनवाढ दिली जाईल, असं परब यांनी सांगितलं. संपकरी कामगार संघटनांच्यावतीनं आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संप अधिक न ताणवता, तो मागे घेण्यात यावा, असं आवाहन मंत्री परब यांनी यावेळी शिष्टमंडळाला केलं.  

दरम्यान, या संदर्भात आज सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे.

****

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद शहराला स्वच्छ वायू साठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुढच्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्यात ८७ कोटी रुपये निधी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनं कालपासून मुंबईत संवेदनशीलता आणि पुनरावलोकन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल, या कार्यशाळेत केंद्र शासन, राज्य शासनाचा नगर विकास विभाग आणि औरंगाबाद महानगपालिका यांच्यात १५व्या वित्त आयोगांतर्गत यासंदर्भात करार करण्यात आला. औरंगाबाद महानगरपालिके प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी औरंगाबाद शहरात वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

****

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातून काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे चंदशेखर बावनकुळे, आणि काँग्रेसचे भोयर यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी या मतदार संघातून अर्ज दाखल केले आहेत.

धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी भाजपकडून माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार धुळ्याचे नगरसेवक गौरव वाणी यांनी काल अर्ज दाखल केले. या मतदार संघातून आतापर्यंत सहा उमेदवारांनी अकरा अर्ज दाखल केले आहेत

दरम्यान, विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला सहा पैकी पाच जागा निश्चितपणे मिळतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. प्रज्ञा सातव यांच्यासाठी भाजप उमेदवार संजय केनेकर यांनी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली, या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या इतर जागांसाठीची निवडणूकही बिनविरोध होऊ शकते, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी यावेळी केलं.

****

अंमली पदार्थ विरोधी पथकानं काल नांदेड शहरालगतच्या मालटेकडीजवळील कामठा इथल्या एक व्यापारी संकुलात छापा टाकून १११ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती या पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. या छाप्यात १११ किलो खसखसचा पेढा, दीड किलो अफू, दीड लाख रूपये रोख, दोन मशीन, वजनकाटा आणि पैसे मोजण्याचं मशीन जप्त केलं आहे.

*****

येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, केंद्र सरकार अनुसूचित जातीच्या विद्यार्थांच्या बँक खात्यांमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणार आहे, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचतीर्थांवर अर्थात बाबासाहेबाशी संबंधित पाच महत्वाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे कार्यक्रम होणार असून या ठिकांणामध्ये नागपूर दीक्षाभूमीचा तसंच बाबासाहेबचं जन्म गाव असलेल्या, मध्य प्रदेशातल्या महू या गावाचा समावेश आहे. येत्या २६ तारखेला संविधान दिनानिमित्तही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं.

****

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकारानं १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत औरंगाबाद परिमंडलातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील १९६ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित ‘शरद शतम्’ आरोग्य योजनेच्या अभ्यासासाठी नियुक्त कृती दलाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहेत.

****

राज्यात काल ७६६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३१ हजार, २९७ झाली आहे. काल १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ७६६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९२९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ७७ हजार ३७९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही मृत रुग्ण हे बीड जिल्ह्यातील आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात १२ नवे रुग्ण आढळले. बीड, परभणी प्रत्येकी पाच, लातूर उस्मानाबाद प्रत्येकी चार, जालना ०२ तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

****

कोविड लसीकरणासंदर्भात बीड जिल्हा हा रेड झोन मधून आता येलो झोन मध्ये आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात तालुका निहाय फिरती कोविड लसीकरण पथकं तयार करण्यात आली असून जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युध्दपातळीवर सुरू असल्याचं डॉ साबळे यांनी सांगितलं

****

हिंगोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागा तर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. काल आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आठवडी बाजारातच लसीकरण शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात १६५ जणांनी कोविड लस घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारवर टीका करण्यातच वेळ घालवला, असंही खासदार मुंडे यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या -

वारंवार स्वत:चा दोष झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखावण्याचं काम हे राज्य सरकार करतंय. कुठलाही प्रश्न विचारला की केंद्रानं आम्हाला मदत केली नाही. तुमच्याकडे एखादं विकासाचं काम तुम्ही करत नाही आहात तर केंद्र सरकार निधी देत नाहीये. तुम्ही संकटात सापडलेला शेतकऱ्यांना मदत नाही करत आहात तर केंद्राकडून आम्हाला मदत आलेली नाहीये. तुम्ही लसी देण्यामागे कमी पडतात तर केंद्राने आम्हाला लसी दिलेल्या नाहीत. आणि आज तुम्ही ओ बी सीं चं असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप केलेलं आहे. राजकीय आरक्षण घालवण्याचं आणि मराठा समाज जे आरक्षणाच्या प्रतीक्षेत होता त्या आरक्षणाला सुद्धा कुठल्याही पद्धतीने न्याय हे सरकार देताना दिसत नाहीये. पण ह्याच्यासाठी सुद्धा पुन्हा जे आहे ते बोटं केंद्र सरकारकडे दाखवले जातायत.

या सरकारनं गेली दोन वर्ष शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही डॉ मुंडे यांनी केला.

****

राज्यातील इतर मागास वर्ग - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार उपाययोजना करत नसल्याचा आरोप औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणीही आमदार सावे यांनी केली आहे.

****

प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून कामं पूर्ण करावीत, असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. बनसोडे यांनी काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत नांदेड दक्षिणसह विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. कोणतीही शाळा किंवा अंगणवाडी पाणी पुरवठ्याविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी दिले.

****

औरंगाबाद शहरातील विविध रस्त्यांची कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करुन पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचं नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या विजय चौक ते रूचके मंगल केंद्र, सिंधी कॉलनी, संत एकनाथ मंदिर ते शाह कॉलनी आणि मिटमिटाअंतर्गत भारत टॉवरपासून ते कोमलनगरपर्यंत या चार रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंग कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

 शहरातल्या विविध रस्त्यांच्या बांधकामासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात येत असून, एकूण १५२ कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय महामार्गापासून गावाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीवर भर दिला जात असून, परभणी विधानसभा मतदारसंघात दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. असोला, राहटी तसंच आलापूर पांढरी इथल्या विकासकामांचं भूमीपूजन डॉ. पाटील यांच्याहस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. गावातील अंतर्गत रस्त्यांच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झालेला असून यातून डांबरीकरण, सिमेंट काँक्रेटचे रस्ते, पूल आदींची निर्मिती पूर्ण झाली आहे, काही ठिकाणी दर्जायुक्त विकासकामं प्रगतीपथावर असल्याचं डॉ पाटील यांनी सांगितलं.

 

दरम्यान, परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ग्रँड कॉर्नर या रस्त्यावर पडलेल्या भलामोठ्या खड्ड्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं काल वृक्षारोपण करण्यात आलं. या खड्यामुळे बरेच अपघात झाल्याचं सांगत महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

****

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी कृषी माल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा आदी शेतमालावर बाजार भावानुसार ७५ टक्के तारण कर्ज देण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...