Tuesday, 1 March 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू; ऑपरेशन गंगा द्वारे आतापर्यंत सुमारे दीड हजार नागरिक भारतात दाखल

** ईडीची कारवाई बेकायदेशीर-नवाब मलिक यांचा दावा; तर मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

** चालू वर्षात देशभरातली दीड लाख टपाल कार्यालय १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालीत समाविष्ट केली जाणार

आणि

** महाशिवरात्र उत्साहाने साजरी; मराठवाड्यात तिन्ही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

****

युक्रेनमध्ये खारकिव्ह इथं झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखराप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट संदेशात ही माहिती दिली.

दरम्यान, किव्हमधील दूतावासात आलेल्या ४०० विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर रवाना करण्यात आलं असून, आत्तापर्यंत एक हजार जणांचं स्थलांतर पूर्ण झालं आहे. काही विद्यार्थी अजूनही किव्हच्या काही भागात आहेत. त्यांनी संचारबंदी उठताच युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे जाण्याची सूचना भारतीय दूतावासाने केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटका करण्याच्या, ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत, आज नववं विमान २१८ भारतीयांना रोमानियाची राजधानी बुखारेस्टवरुन घेऊन नवी दिल्लीत पोहचलं. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे दीड हजार भारतीय युक्रेनमधून परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

दरम्यान, ऑपरेशन गंगा मध्ये वायू सेनेनं देखील सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वायुसेनेची सी १७ विमानं या मोहीमेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असून, आपल्याला ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणी मलिक यांनी या याचिकेत केली आहे. नवाब मलिक यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र फराझ मलिक यांनाही ईडीचे समन्स बजावलं आहे. फराझ मलिक ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संबंधित काळा पैसा वैध प्रकरणी मलिक यांना तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा अन्यथा विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतं, हे धक्कादायक असल्याचं पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या वीजबील प्रकरणी मुद्द्यांवर भाजपाने यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन केल होतं, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केलं असून यास भाजपचा पाठिंबा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

दाऊद इब्राहिमच्या जवळच्या लोकांशी मलिक यांनी आर्थिक व्यवहार करुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलं, यासंबंधात ईडीकडून चौकशी होत असेल, तर महाविकास आघाडीचे नेते मलिक यांच्या समर्थनात आंदोलन का करत आहेत, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.  मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा उग्र आंदोलन करेल असा इशारा दरेकर यांनी दिला.

****

चालू वर्षात देशभरातली दीड लाख टपाल कार्यालय १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालीत समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे टपाल कार्यालयं आणि बँकांमधल्या बचत खात्यांमध्ये निधीचे ऑनलाइन हस्तांतरण करता येणार आहे. तसंच नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, तसंच एटीएम द्वारे खात्यांमध्ये व्यवहार करता येतील. ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आला आहे.

****

फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर -जीएसटी अंतर्गत १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. २०२० मध्ये जमा झालेल्या महसुलापेक्षा हे प्रमाण २६ टक्क्यांनी जास्त तर मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी जास्त आहे.

****

महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. मराठवाड्यात बीड जिल्ह्यातलं परळी वैद्यनाथ, हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तसंच औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्याचं दिसून आलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातले भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. कोविड प्रतिबंधामुळे गेली दोन वर्ष मंदिरं बंद असल्यानं, यंदा भाविकांचा शिवदर्शनासाठी उत्साह दिसून आला.

परळी इथं मध्यरात्रीच्या सुमारास वैद्यनाथाला दुग्धाभिषेक करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं संस्थान सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, आमदार प्रज्ञा सातव, संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटेपूर्वी २ वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. दरम्यान दिवसभरात हजारो भाविकांनी नागनाथाचं दर्शन घेतल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात

वेरुळ इथं घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी घृष्णेश्वर मंदीरात दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री पल्लम राजीव उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यातही भाविकांनी शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. स्वच्छता अभियान, अन्नदान, शोभायात्रा आदी कार्यक्रमातून महाशिवरात्र साजरी झाली

****

औरंगाबाद शहरातल्या घरांसाठी आणि उद्योगधंद्याच्या वापरासाठीच्या पीएनजी - नैसर्गिक वायू वाहिनी कामाचा शुभारंभ उद्या केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा सोहळा होणार आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यासंदर्भातील कामाचा आढावा घेतला. शहरातल्या दोन लाख घरापर्यंत या वाहिनीद्वारे गॅस पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे.

****

लातूर शहरातल्या विविध विकास कामांसाठी २२ कोटी ५८ लाख रुपये निधी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. लातूर शहरातल्या सर्व प्रभागात रस्ते, गटारी, सामाजिक सभागृहांची उभारणी तसंच इतर विकासकामं या निधीतून राबवण्यात येणार आहेत.

****

No comments: