Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 March 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना युक्रेनसह
देशातल्या इतर घडामोडींविषयी माहिती दिली.
दरम्यान,
युक्रेनहून भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सुरु असलेल्या ऑपरेशन
गंगा मोहीमेंतर्गत आज दोन विमानं भारतात दाखल झाली. १८२ प्रवाशांसह एक विमान मुंबईत, तर २१८ प्रवाशांसह दुसरं विमान रोमानियामधून
दिल्लीत उतरलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत प्रवाशांचं स्वागत केलं.
ऑपरेशन
गंगा मध्ये वायू सेनेनं देखील सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं
आहे. वायुसेनेचे सी १७ विमानं या मोहीमेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साडेसहा एकरहून अधिक
जागेत विकसित केलेल्या आयोग्यवनम् चं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यावेळी उपस्थित होते. आरोग्यवनम् मध्ये विविध जातींची २१५ फुलं आणि
वनस्पतींची झाडं, जल योग प्रवाह, योगमंच,
कमल सरोवर, सुगंध उद्यान तसंच दर्शक गॅलरी साकारण्यात
आली आहे. उद्यानातून फिरण्यासाठी पायवाट असून मोरपंखाच्या आकारात
फळझाडंही लावण्यात आली आहेत.
****
महाशिवरात्र
आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथलं घृष्णेश्वर
मंदीर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ मंदीर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नगनाथ
इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त इतरही धार्मिक कार्यक्रम
आयोजित करण्यात आले आहेत.
****
लसीकरण झालं नसलं तरी लहान मुलांनी शाळेत जाणं सुरक्षित आहे, असं बाल आरोग्य विषयावरच्या राज्य सरकार आणि युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार, डॉ. मृदुला फडके यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घसरत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी मास्क घालणं, सुरक्षित अंतर पाळणं आणि वारंवार हात धुणं, या गोष्टी करत रहाव्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
पत्र सूचना कार्यालयामार्फत आयोजित वेबिनारमध्ये त्या काल
बोलत होत्या. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आजारानं गंभीर स्वरुप धारण
करण्याचं प्रमाण १० हजार मुलांमध्ये एक इतकं आहे. त्यामुळे लहान मुलांचंही लसीकरण गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.
****
नाशिक मधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त
विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. नाशिक
तालुक्यातल्या सामनगांव इथल्या शासकीय
तंत्रनिकेतन इथं ते काल बोलत होते. शिक्षणाचा विस्तार
करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातल्या विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मीती करण्यात येत आहे, त्यानुसार नाशिक इथल्या
उपकेंद्राचं काम करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असल्याचं
सामंत यांनी सांगितलं.
****
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या २३ हजार ७६४
लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याने, अशा लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांकाचा तपशील तपासून आवश्यक
दुरुस्ती तातडीनं करावी. त्यासाठी गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक
आणि कृषी सहायकांनी मेळावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तहसिल कार्यालयाकडे विज वितरणचे सात लाख ४५ हजार थकबाकी असल्यानं, विज वितरण कंपनीनं रविवारी तहसिल कार्यालयाची
विज जोडणी बंद केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून महसूल विभागानं काल वीज वितरण विभागाच्या तीन
कार्यालयांकडे नऊ लाख ५४ हजार रुपयांचा
अकृर्षीक कर थकल्याचं सांगून महावितरणच्या
तिन्ही कार्यालयं सील केली. विज जोडणी बंद केल्यामुळे
काल तहसिल कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं होतं.
****
तुळजापूर
इथल्या श्री तुळजा भवानी मंदीराचा गाभारा सोन्याचा करण्याचा
प्रस्ताव असल्याचं, मंदीराचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. ते काल तुळजापूर इथं बोलत होते.
राज्याचे पुरातत्व विभाग प्रमुख डॉ तेजस गर्गे यांच्या नेतृत्वाखाली पथक येऊन पाहणी करेल, त्यांनी दिलेल्या अहवालानंतर गाभारा सोन्याचा
करण्यात येईल, असं ते म्हणाले. तुळजापूरचा सर्वांगिण विकास करण्यावर भर देण्यात येणार
असून, पापनाश तलावाचं सौंदर्यीकरण, लाइट शो, बोटिंग, कारंजे यासह मनोरंजनात्मक कार्यक्रम
सुरु करण्याचा विचार असल्याचं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment