Tuesday, 1 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मराठा समाजाबाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं उपोषण मागे

·      नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता जप्त

·      कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानं राज्यात भारनियमन लागू करण्याचे ऊर्जामंत्र्याचे संकेत

·      राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची तर मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती

·      राज्यातकोविड संसर्गाचे ४०७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३३ बाधित

आणि

·      महाशिवरात्रीनिमित्त वेरुळच्या घृष्णेश्वर, परळीच्या वैद्यनाथ आणि औंढ्याच्या नागनाथ ज्योर्तिलिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

****

मराठा समाजाबाबत केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं उपोषण काल मागे घेतलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल उपोषण स्थळी जाऊन संभाजीराजे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी केलेल्या सर्व १५ मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

सारथीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येतील, तसंच रिक्त पद १५ मार्च २०२२ पर्यंत भरण्यात येतील, आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला, चालू आर्थिक वर्षातील २० कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्जावरील व्याज परताव्याबाबत शासन धोरण ठरवेल, जिल्हा स्तरांवरच्या वसतिगृहांचं उद्घाटन गुडीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याबाबत, १५ दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत गृहमंत्रालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेण्यात येईल, आणि मराठा आंदोलनात मृत पावलेल्याच्या वारसदारांना कागदपत्रांची पुर्तता करून नोकरी देण्यात येईल, आदी निर्णय शासनानं घेतल्याचं, मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता, सक्तवसुली संचालनालय- ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं काल ट्.विट करुन ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लिलावात हा साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकला गेला होता. अहमदनगर जिल्ह्यातले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा साखर कारखाना विकत घेतला होता. या कारवाईत ईडीनं साखर कारखान्याच्या मालकीची ९० एकर शेत जमिन आणि जवळपास साडेचार एकर अकृषिक जमिनही जप्त केली आहे.

****

राज्यातल्या औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं, राज्यात भारनियमन करावं लागू शकतं, असे संकेत, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी आणि घोटा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या सहा लाख ७५ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. राज्यातल्या सात वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये, रोज एक ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो, मात्र तुटवडा झाल्यास भारनियमन होऊ शकतं तसंच ग्राहकांनी वीज देयकं त्वरीत भरावीत अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलतांना, आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्याबाबत आपण सुरुवातीच्या काळात जे वाचलं होतं, त्यावरून समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत अशी आपल्याला माहिती होती. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला सांगण्यात आली आहेत. आपण ती तथ्यं तपासून घेऊ असं ते म्हणाले.

****

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलेली आहे. मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती काल नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

****

सध्या राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४०७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६ हजार ७०५ झाली आहे. काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ७०१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ९६७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ११ हजार ३४३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९ पूर्णांक ०४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात ११ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद सात, उस्मानाबाद चार, लातूर पाच, जालना तीन, परभणी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एका नव्या रुग्णाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथलं घृष्णेश्वर मंदीर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ मंदीर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीराच्या गाभाऱ्यात, भाविकांना दर्शन घेता येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळ तसंच महापुरुषांचे पुतळे, आदि ठिकाणी जवळून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन स्थळांवर पर्यटकांना ऑनलाईनबरोबरच आता ऑफलाईन तिकीट विक्री करण्याचे निर्देशही, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तीनांच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, महाशिवरात्री निमित्तान घृष्णेश्वर मंदीरात देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादहून कन्नड - धुळे कडे जाणारी सर्व जड वाहनं, दौलताबाद - माळीवाडा - कसाबखेडा फाटा मार्गे जातील आणि  फुलंब्री मार्गे खुलताबादला येणारी सर्व वाहनं औरंगाबाद मार्गे वळवण्यात आली आहेत.

महाशिवरात्री निमित्त नांदेड जिल्ह्यातल्या मरळक, काळेश्वर आणि गंगणबीट थल्या शिवमंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

****

गोरगरीबांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठीच नांदेड इथं शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर दिला, आणि नांदेड हे शिक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र साकारु शकलो, असं मत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलासह इतर विविध कामांचं भूमिपूजन, काल चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड महानगरच्या गरजा लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा-सुविधाही भक्कम करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना-नांदेड या १७८ किलोमीटर द्रुतगती महामार्गाचा पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना इथं आढावा घेतला. जिल्ह्यात महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणी दरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेत शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रतवारीनुसार अधिकचा दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, सं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या २९ गावांमधून जाणाऱ्या ६६ पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या महामार्गाच उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी पालकमंत्र्यासमोर सादरीकरण केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं, सुगंधित सुपारी आणि गुटखा बनवण्याचं साहित्य असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. 

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा ‘लोटू पाटील नाट्य पुरस्कार’ प्रसिद्ध रंगकर्मी दिलीप जगताप यांना, आणि ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार’, ‘भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय’, या पुस्तकासाठी, डॉ. प्रकाश पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २० मार्च ला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी, तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीनं, काल नांदेड - हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्यावेळी विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर यांनी भेट देत तालुका निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासान दिलं. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

****

विज्ञान व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. या विज्ञानाचा हेतू विश्वकल्याण असल्याचं प्रतिपादन, आरोग्य क्षेत्रातले संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयात आयोजित विज्ञान प्रसार महोत्सवाचा' समारोप, काल राष्ट्रीय विज्ञान दिनी, डॉ. बावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण आठवडाभर घेण्यात आलेल्या विविध विज्ञानकेंद्री स्पर्धांच्या विजेत्यांना, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करुन गौरवण्यात आलं.

****

परभणी तालुक्यातल्या दुधना नदीवरच्या हिंगला गावाजवळच्या अर्धवट पुलाचं बांधकाम पुर्ण करण्याची मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं आहे. पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून प्रवास करावा लागत असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

****

No comments: