Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ मार्च २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं
चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत
वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू
शकता.
****
· राज्य विधीमंडळाचं उद्यापासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन,
सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा
न घेतल्यास अधिवेशन चालू न देण्याचा विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाचा इशारा
· औरंगाबाद शहरात निवासी
आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी - नैसर्गिक वायू
वाहिनी टाकण्याच्या कामाचा आज शुभारंभ
· कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या महावितरणच्या
ग्राहकांसाठी 'विलासराव
देशमुख अभय योजनेची ऊर्जामंत्र्याची घोषणा
· राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे नवे १०४ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातल्या १४, तर जालना जिल्ह्यातल्या
आठ रुग्णांचा समावेश
· कोविड संसर्गाचे
राज्यात ६७५ नवे रुग्ण, मराठवाड्यात
एकाचा मृत्यू तर २५बाधित
आणि
· महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा
****
राज्य विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात
अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाची रणनिती
निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्तवसुली
संचालनालयाच्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित
घ्यावा अन्यथा विधिमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक
यांच्या राजीनाम्यास नकार देऊन मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरतं,
हे धक्कादायक असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या
वीजबील प्रकरणी भाजपानं यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन केल होतं, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत आंदोलन सुरू
केलं असून, यास भाजपचा पाठिंबा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात निवासी
आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी - नैसर्गिक वायू
वाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ, आज
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
करणार आहे. सकाळी ११ वाजता शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर
होणाऱ्या या सोहळ्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. वातावरणातील प्रदूषण कमी करुन, माफक दरात सीएनजी
आणि घराघरात घरगुती गॅस पोहोचवण्याची ही योजना आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या
वतीनं हे काम करण्यात येत आहे.
दरम्यान, कराड यांनी काल औरंगाबाद इथं
या संदर्भातल्या कामाचा आढावा घेतला. येत्या
डिसेंबर पर्यंत शहरातल्या पहिल्या ग्राहकाला गॅस देणार असल्याची माहिती त्यांनी वार्ताहरांशी
बोलताना दिली. शहरातल्या दोन लाख घरापर्यंत या वाहिनीद्वारे गॅस पोहोचवण्याचं
उद्दिष्ट आहे.
दरम्यान, खासदर इम्तियाज जलील यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि
शहरी विकास मंत्री हरदिप सिंह पूरी यांना यावेळी काळे झेंडे दाखवून करण्यात येणारे
आंदोलन रद्द केलं असल्याचं सांगितलं. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं पंतप्रधान आवास योजनेसाठी
डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी आणि अतिक्रमण असलेली विवादग्रस्त जागा दिली होती.
त्यामुळे खासदार जलील हे आंदोलन करणार होते. मात्र, जिल्हा प्रशासनानं आंदोलनाची गंभीर
दखल घेवून चोवीस तासाच्या आत पंतप्रधान आवास योजनेसाठी सुंदरवाडी आणि चिकलठाणा इथं
33 हेक्टर जमीन दिली आहे. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आल्याचं खासदार जलील यानी
सांगितलं आहे.
****
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या महावितरणच्या
ग्राहकांना थकित रकमेत सवलत आणि त्यांना पुन्हा वीज जोडणी देणाऱ्या,'विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा,
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल केली. ते बुलडाणा इथं बोलत
होते. एक मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही योजना राबवली
जाणार असून, कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतल्या ग्राहकांना ही योजना लागू असेल. या योजनेअंतर्गत थकबाकीदार ग्राहकांनी
मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यावरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ होईल. थकबाकीदार
ग्राहकांनी मुद्दलाच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास, उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के आणि लघुदाब
ग्राहकांना १० टक्के अधिकची सवलत थकीत मुद्दल रकमेत मिळणार आहे. जर ग्राहकांना
रक्कम सुलभ हप्त्यानं भरावयाची असल्यास मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणं
अत्यावश्यक आहे आणि यानंतरच त्यांना उर्वरीत रक्कम सहा
हप्त्यात या योजनेच्या माध्यमातून भरता येणार आहे. ज्या ग्राहकाला हप्त्यानं थकीत
रक्कम भरावयाची आहे, वीज जोडणी चालू केल्यावर चालू देयकाच्या
रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्त्याची रक्कम भरणं अनिवार्य असेल. राज्यातल्या ३२ लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळवण्याची संधी या योजनेमुळे
प्राप्त झाल्याचं, नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले नवे १०४ रुग्ण आढळले. यामध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातले १४, तर जालना जिल्ह्यातल्या आठ रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात
४१, सिंधुदूर्ग १२, मुंबई ११, नवी मुंबई आठ, ठाणे पाच, मीरा भाईंदर तीन तर सातारा जिल्ह्यात
काल ओमायक्रॉन संसर्गाचे नवे दोन रुग्ण आढळले. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या
आता चार हजार ७३३ झाली असून, यापैकी चार हजार ५०९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६७५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६६ हजार ३८० झाली आहे. काल पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ७०६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल एक हजार २२५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख १२ हजार ५६८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८
पूर्णांक ०४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात सात रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात पाच, लातूर
चार, तर नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांची नोंद झाली.
हिंगोली आणि जालना जिल्ह्यात काल एकही नवा
रुग्ण आढळला नाही.
****
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल
जाहीर केल्या. जेईई परीक्षेचं पहिल सत्र एप्रिलमध्ये तर
दुसरं सत्र मे महिन्यात होणार आहे. १६ ते २१ एप्रिल आणि २४ ते २९ मे दरम्यान या
परीक्षा होणार आहेत. यासाठी ३१ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील.
****
महाशिवरात्रीचा उत्सव काल सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. मराठवाड्यात
बीड जिल्ह्यातलं परळी वैद्यनाथ, हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तसंच औरंगाबाद जिल्ह्यात
वेरुळ इथं भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्याचं दिसून आलं. महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातून आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातले भाविक दर्शनासाठी दाखल
झाले आहेत. कोविड प्रतिबंधामुळे गेली दोन वर्ष मंदिरं बंद असल्यानं, यंदा भाविकांचा
दर्शनासाठी उत्साह दिसून आला.
परळी इथं मध्यरात्रीच्या सुमारास वैद्यनाथाला दुग्धाभिषेक करून
भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं संस्थान
सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, आमदार प्रज्ञा सातव, संस्थानचे अध्यक्ष
तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटेपूर्वी २ वाजता
भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. दरम्यान दिवसभरात हजारो भाविकांनी नागनाथाचं
दर्शन घेतल्याचं संस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं.
वेरुळ इथं घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी
गर्दी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी घृष्णेश्वर मंदीरात दर्शन घेत अभिषेक केला.
यावेळी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री पल्लम राजीव उपस्थित होते.
जालना, लातूर तसंच परभणी जिल्ह्यातही भाविकांनी शिवमंदिरांमध्ये
दर्शनासाठी गर्दी केली. स्वच्छता अभियान, अन्नदान, शोभायात्रा आदी कार्यक्रमातून महाशिवरात्र
साजरी झाली.
राज्यातल्या बारव संवर्धन उपक्रमात काल महाशिवरात्रीला अनेक
बारवांच्या पायऱ्यांवर दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. औरंगाबाद जवळच्या शेकटा
गावातल्या नागरिकांनी या दीपोत्सवात सहभागी होत, गावातल्या बारवेवर शेकडो दिवे प्रज्वलित
केले.
नांदेडमधील संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात १०१ जणांनी
रक्तदान करुन महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला. याचबरोबर आश्रमात ज्ञानेश्वरी पारायण
आणि सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात
आली, त्यानंतर मध्यरात्री आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक यांच्या हस्ते अभिषेक करण्यात
आला, अशी माहिती पाचलेगावकर महाराजांचे अनुयायी दत्तोपंत डहाळे यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या खरीप २०२० च्या पिक विम्याचा प्रश्न सरकारला
एक बैठक घेवून मार्गी लावता आला असता, मात्र याबाबतीत शिवसेना आणि इतर स्थानिक सत्ताधारी गप्प का, असा प्रश्न तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी
उपस्थित केला आहे. ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते. जिल्ह्यातल्या ७५ हजार ६३२ शेतकऱ्यांनाच पीक विमा मंजूर झाला असून, उर्वरित शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत. तसंच
विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी एकूण ६३९ कोटी रुपये प्राप्त झाले होते, यापैकी ८८ कोटी रुपयांचे दावे विमा कंपनीने मंजूर केले असून, फक्त ५५ कोटी ६८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित ३२ कोटी रुपये अद्याप वितरित करण्यात आले नसल्याचं पाटील म्हणाले.
यासंदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही काहीही साध्य झालं नाही, असं त्यांनी
सांगितलं.
****
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विजय
राठोड यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातल्या २३ हजार ७६४ लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा लाभ मिळत
नसल्यानं, अशा
लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांकाचा तपशील तपासून आवश्यक दुरुस्ती तातडीनं
करावी, त्यासाठी गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी
सहायकांनी मेळावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राठोड
यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या
कागबन इथं पाच एकरातील ऊस काल शॉर्टसर्किटनं लागलेल्या आगीत खाक झाला. अग्निशामक दलाच्या
अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, मात्र यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
****
No comments:
Post a Comment