आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
शिक्षण मंत्र्यांची दोनदिवसीय परिषद आज गुजरातमध्ये
होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री आणि राज्य
तसंच केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत
२०२० च्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून देशातल्या शैक्षणिक परिसंस्था बळकट करण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा
आहे.
****
अयोध्येत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराच्या गाभा-याच्या बांधकामाला आजपासून सुरुवात होत आहे. उत्तरप्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहाच्या पायाभरणी सोहळ्यात सहभागी झाले. त्यांच्या हस्ते पहिला कोरीव दगड ठेवून गाभा-याची पायाभरणी
झाली.
****
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदा प्रथमच राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाच्या नऊ तुकड्या
राज्याच्या सात जिल्ह्यांमधे तैनात करण्यात येणार आहेत. मान्सूनपूर्व
आढाव्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ही
माहिती देण्यात आली.
****
कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा घरोघरी जाऊन देण्याच्या हर घर दस्तक मोहिमेचा दुसरा
टप्पा आजपासून सुरू होत आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस मिळावी या उद्देशानं
ही मोहीम राबवली जात आहे. १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांना
लस देण्याकरता शाळांमधूनही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
****
केंद्र सरकारनं यावर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच
वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम काल राज्यांना जारी केली. विविध राज्यांसाठी
केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची
भरपाई रक्कम काल वितरीत केली. यामध्ये महाराष्ट्राला १४ हजार
१४५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे.
****
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मंकीपॉक्स रोगाच्या व्यवस्थापनाबाबत
मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या रोगासंदर्भातले सर्व नमुने संबंधित जिल्हा आणि
राज्याच्या रोगावर देखरेख ठेवण्याच्या एकात्मिक कार्यक्रमांतर्गत पुण्यातल्या भारतीय
आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पोहोचवावेत
असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment