Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
मातोश्रीवर आरोप करणाऱ्या भाजपसोबत पुन्हा सत्तेत बसणार नाही-शिवसेना
पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती.
·
शिवसेना गटनेते पदी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष
नरहरी झिरवळ यांची मान्यता.
·
राज्यातल्या राजकीय हालचालींशी भाजपचा काहीही संबंध नाही-प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील.
·
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची कारवाई; साखर कारखान्याची
२०० एकर जागा, इमारत आणि यंत्रसामग्री जप्त.
आणि
·
अग्निपथ योजनेअंतर्गत वायूदलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी
नोंदणी प्रक्रियेला सुरवात.
****
मातोश्रीवर
आरोप करणाऱ्या भाजपसोबत पुन्हा सत्तेत बसणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज शिवसेना पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांची मुंबईत
बैठक झाली, या बैठकीला दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलताना, पक्षप्रमुख
ठाकरे यांनी, भाजपने कायमच फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले...
Byte…
मी एकदा त्यांना थेट विचारलं
की असं असं कानावर येतंय, नाही नाही नाही मी असा कसा वागेन, नाही म्हटलं खोटं असेन
खोटं असावं असं माझं म्हणन आहे. ते असेल तर स्पष्ट सांगा. आपण भाजपसोबत जायला पाहिजे
असा काही आमदारांचा माझ्यावरती एक दबाव आहे. म्हंटल ठिक आहे. मी जनतेबरोबर जाईन पण
भाजपासोबत जाणार नाही. ज्या भाजपाने माझ्यावरती, मातोश्रीवरती वेडेवाकडे काही बोलल्यानंतर
तुमच रक्त गरम होतं नाही का? कसले शिवसैनीक तुम्ही? एक साध्या आजी त्यांना नाव पडलय
फायर आजी, ती त्या तळपत्या उन्हामध्ये तापलेल्या रस्त्यावरी बसते, मातोश्रीवरती कोन
येतोय बघते. आणि बाकी सगळे मोठी झालेली षंढ भाजपसोबत जा म्हणून सांगताय. म्हंटल माझ्याकडुन
होणार नाही, ज्यांना जायचं त्यांना जावू द्या. पण एक लक्षात घ्या म्हंटल, वापरा आणि
फेका ही त्यांची नीती आहे. तुम्हाला सुद्धा ते वापरतील आणि फेकून देतील.
शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली, नेहमीच
मुख्यमंत्र्यांकडे असलेलं नगरविकास खातं दिलं, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधत, बाळासाहेबांच्या
नावाशिवाय शिवसेना चालवून दाखवण्याचं आव्हान बंडखोरांना दिलं...
Byte…
बाळासाहेबांची शिवसेना आता
संपली. बर संपली शिवसेना. त्याच्यानंतर शिवसेना एकदा नाही तर दोनदा सत्तेत आली. आणि
दोन्ही वेळेला यांना आपण मंत्रीपद दिलं. आणि मंत्रीपद कुठल, जे खातं नेहमी सीएम नेहमी
स्वत:कडे ठेवतात, ते खातं मी त्यांना दिलं. २०१२ नंतरची जी काही तिकिट वाटप केली होती,
बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती. आणि तसं शेवटच्या मनोगतात बाळासाहेबांनी
तुम्हाला सर्वांना आवाहन केलं आहे की, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. मग त्या
जबाबदारी मध्ये मी तुम्हाला ही उमेदवारी दिली होती. त्या उमेदवारीनंतर तुम्ही निवडून
आलात. आणि तुम्ही सांगताय की ती शिवसेना बाळासाहेबांची नाही. अहो ठाकरे आणि शिवसेना
ही दोन नावं, दोन शब्द वेगळे करुन तुम्ही शिवसेना चालवून दाखवाचं. माझं आज सुद्धा आव्हान
आहे.
या
बैठकीला पर्यावरण मंत्री तथा युवा सेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष
नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.
****
महाविकास
आघाडीचं सरकार मजबूत असुन पुढील अडीच वर्ष आमचं सरकार पूर्ण करेल असा विश्वास शिवसेना
प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बंडखोर आमदारांना दिलेली वेळ निघून गेली
आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू असंही ते म्हणाले. आज सकाळी मुंबईत यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
दरम्यान,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी
उभं राहायचं आणि सरकार टिकवायचं, या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचं
म्हटलं आहे.
****
शिवसेना
विधिमंडळ गटनेते पदी आमदार अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या
बंडानंतर त्यांना पक्षाच्या गटनेते पदावरून हटवत, त्यांच्या जागी अजय चौधरी यांना गटनेता
करण्याची विनंती शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना करण्यात आली. तर, संख्याबळ आपल्याकडे
असून गटनेतेपदही आपल्याकडेच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटानं केला होता. त्यासाठी ३४
आमदारांच्या सहीचं पत्रही विधानभवनाला पाठवण्यात आलं होत. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष
झिरवळ यांनी अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला मान्यता दिली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मुंबईहून आज सकाळी हिंगोलीत
परतले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी बंडखोर आमदारांना
परतीचं आवाहन करताना बांगर यांना भावना अनावर झाल्या. आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांचंच नेतृत्व मान्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. बंडखोरिच्या कारवाया घडत असताना
त्यांनी मुंबई सोडली नव्हती. त्यानंतर ते आज हिंगोलीत परतले आहेत.
****
राज्यात
सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध
नाही, असा खुलासा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला
नसून, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असं ते म्हणाले. शिवसेनेतल्या बंडामागे
कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील म्हणाले.
****
जालना
जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर
सक्तवसुली संचालय- ईडीने आज मोठी कारवाई करत कारखान्याची २०० एकर जागा, कारखान्याची
इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही
महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी
संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेते
किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकर यांच्यावर
१०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता.
****
अग्निपथ
योजनेअंतर्गत भारतीय हवाईदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची नोंदणी प्रक्रिया
आज सकाळी दहा वाजेपासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ वायु डॉट सी डी ए सी
डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची
ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही प्रक्रिया
या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया एक जुलैपासून
सुरू होणार आहेत.
****
चालु
शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन २०२२-२३ पासून इयत्ता पहिली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम
लागू करण्यास शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी दिली आहे. मार्च २०२० पासून कोविड कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा
ताण कमी व्हावा म्हणून इयत्ता पहिली ते १२ वी चा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला
होता. गेल्या शैक्षणिक वर्षासाठी तोच अभ्यासक्रम कायम ठेवण्यात आला होता. मात्र या
वर्षीपासून शंभर टक्के अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे.
दरम्यान,
शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणणं तसंच बालकांची शाळेतील गळती शून्यावर
आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत शासनातर्फे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
ही मोहिम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
****
नांदेड
- वाघाळा शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना आराखडा जाहिर
करण्यात आला असून या आराखड्यात ९१ सदस्यांसाठी एकूण ३० प्रभाग प्रकाशित करण्यात आले
आहेत. प्रभाग रचना प्रारुप आराखड्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी आज शेवटची मुदत होती. आज
शेवटच्या दिवसांपर्यत ५९ आक्षेप दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना
शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. जिल्ह्याची पावसाची
एकूण सरासरी ६०३ पुर्णांक १० शतांश मिलिमीटर असून आज सकाळपर्यंत जिल्ह्यात ८९ पूर्णांक
९० शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे
रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.
****
नांदेड
तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे काल पासून सोयाबीन, मुग,
उडीद, तूर आणि सुर्यफुल या खरीप पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील लिंबगाव,
विष्णुपुरी, तरोडा, नाळेश्वर, कासारखेडा मसूल मंडळात शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment