Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 24 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ एप्रिल
२०२३ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या
विकासासाठी पंचायती राज व्यवस्था बळकट करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिवस आज साजरा होत आहे.
यानिमित्त मध्यप्रदेशात रीवा इथं बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते
पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी एकात्मिक ई ग्राम स्वराज आणि जेम
पोर्टलचं उद्घाटन झालं. पंचायतींना ई-ग्रामस्वराज
मंचाचा लाभ मिळावा यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
या
कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे १७ हजार कोटी रूपये खर्चाच्या
विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण, तसंच जलजीवन मिशन अंतर्गत
सुमारे सात हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणीही
करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आज पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा पाणी
आणि स्वच्छता मिशन कक्ष तसंच पंचायत विभागाच्या वतीनं कार्यशाळा
घेण्यात आली, या कार्यशाळेत संत गाडगेबाबा पुरस्कार, महाआवास अभियान आणि इतर योजनेतल्या पुरस्कारांचं वितरण
पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं. २०१९ - २० या वर्षीच्या
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत कन्नड तालुक्यातल्या हस्ता ग्रामपंचायतीनं
प्रथम, सिल्लोड तालुक्यातल्या पिंपळगावपेठ ग्रामपंचायतीनं द्वितीय, तर वैजापूर तालुक्यातल्या
पालखेड ग्रामपंचायतीनं तिसरा क्रमांक पटकावला. २०१९-२० आणि २०२१-२२ या वर्षासाठी घेण्यात
आलेल्या स्वच्छ ग्राम स्पर्धेत लाडगाव ग्रामपंचायतीला प्रथम, सोनखेडला द्वितीय, तर
वाकी ग्रामपंवायतीला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सांडपाणी
व्यवस्थापनासाठीचा वसंतराव नाईक पुरस्कार वैजापूर तालुक्यातल्या परसोडा ग्रामपंचायतीला,
पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पैठण तालुक्यातल्या
आवडे उंचेगाव ग्रामपंचायतीला, तर शौचालय व्यवस्थापनासाठीचा आबासाहेब खेडकर पुरस्कार
सोयगाव तालुक्यातल्या गोंदेगाव ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.
****
देशात
गेल्या २४ तासात सात हजार १७८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ
हजार रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६५ हजार ६८३ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे
होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के इतका आहे.
****
अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला शासन
मान्यता देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. अहमदनगरच्या जिल्हा क्रीडासंकुलात छत्रपती शिवराय
केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम
सामना महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाला. यात
महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली. त्यांना ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलो सोन्याची गदा प्रदान करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यभरातून जवळपास एक हजार कुस्तीपटू
सहभागी झाले होते.
****
मुंबई
मेट्रो अंतर्गत भरती सुरू असल्याच्या बनावट संदेशाला बळी न पडण्याचं आवाहन महा मुंबई
मेट्रो संचलन महामंडळानं केलं आहे. मुंबई मेट्रो अंतर्गत भरती सुरू आहे, अशा आशयाचे
संदेश गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून प्रसारित होत आहे. मात्र, ही जाहिरात
बनावट असून अशी कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचं, महामंडळाव्दारे सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी अशा
बनावट जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाव्दारे करण्यात
आलं आहे.
****
शेतकऱ्यांनी
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर टाळून, जैविक खतं आणि जैविक कीटकनाशकांचा
वापर करावा, असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीड नियंत्रण विभागाचे
प्राध्यापक डॉ. दिंगबर पटाईत यांनी केलं आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या
पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथं विशेष प्रचार कार्यक्रमात ते बोलत होते. जैविक खतांच्या
वापरामुळे प्रदूषण कमी होऊन शेतीची सुपिकता वाढेल, शेतीला फायदेशीर असलेल्या मित्र
कीटकांना संरक्षण मिळून पिकांची उत्पादकता वाढेल, असंही पटाईत यांनी सांगितलं.
****
नंदुरबार
जिल्ह्यात धानोरा - नंदुरबार रस्त्यावर अवैध गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पोलिसांनी
पकडला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा
दाखल केला आहे.
****
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स
यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं राजीव गांधी मैदानात संध्याकाळी साडे सात वाजता
सामन्याला सुरुवात होईल.
//************//
No comments:
Post a Comment