Monday, 24 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू ई-पंचनामे - मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये - मुंबई उच्च न्यायालयाची सूचना.

·      पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या चार महाविद्यालयांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची नोटीस.

आणि

·      धाराशिव जिल्ह्यातल्या ११३ शाळांमध्ये इंटरऍक्टिव्ह बोर्ड या संकल्पनेवर अध्यापन.

****

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू ई - पंचनामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत राज्यातले विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जून महिना सुरु झाला की वीज पडून होणारे मृत्यू तसंच तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्व विभाग आणि जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या परिषदेत उष्णतेची लाट, पेजयल पुरवठा, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण तसंच चर्चा झाली. मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही या परिषदेत करण्यात आलं.

****

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा औद्योगिक वसहतीतील सोनेगाव निपाणी इथं आज सकाळी एका कंपनीला भीषण आग लागल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला तर दोन कामगार जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या सुमारे दहा बंबांनी ही आग नियंत्रणात आणली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

****

खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याच्या दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं भेट घेतली. राज्याचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले –

अजूनही सरकारने याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका, प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आणि या विषयावर न्याय मागण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ आज आम्ही सगळेच्या सगळी मंडळी महामहीम राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर खरं तर आजही आकड्यांबाबत संभ्रम आहे. हे झाल्यानंतर अजूनही पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कमिशनरेटकडे याचा किमान अपमृत्यू झाल्याचीसुद्‌धा नोंद आहे की नाही हा प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारलेला आहे.

****

तीन अपत्यं असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते बारामती इथं एका कार्यक्रमात बोलत होते. लोकसंख्येच्या आकडेवारीत भारत जगात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तशी कारवाई का झाली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत १० जूनपर्यंत पोस्ट ऑफिस, ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावे बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं. पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे.

****

बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणं हा केंद्र शासनाच्या विविध योजनांचा उद्देश असल्याचं केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं पश्चिम महाराष्ट्राच्या बँकिंग क्षेत्राच्या आढावा बैठकीत बोलत होते. लोकांना आर्थिक साक्षर करणं ही बँकांची जबाबदारी आहे. आर्थिक शिक्षणासोबतच डिजीटल व्यवहारांची माहितीही जनतेपर्यंत पोहचवावी, अशा सूचना कराड यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. ग्रामीण भागात बँकांचा प्रसार व्हावा तसंच कर्ज वाटपासाठी प्रतिक्षा कालावधी कमी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ग्रामीण भागात बँकांच्या संख्या वाढवण्यात वाव असून बँकांनी त्या दिशेने काम करणं आवश्यक असल्याचं कराड म्हणाले.

****

रोजगार हमी योजनेचे सर्वात जास्त काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालं असून त्यातून शेतकरी सुखी होणार असल्याचा विश्वास रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. पंचायत राज दिनानिमित्त आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना भुमरे यांनी, जिल्ह्यातल्या ग्रामपंचयातीसाठी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

दुसरा एक निर्णय मी घेतो आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाला गावाचा कारभार करत असतांना त्यांना एक इमारत असली पाहिजे. भव्य इमारत जर असेल तर त्यांना काम फास्ट करता येतं. संचालकाची बैठक असेल, ग्रामसेवकाचं ऑफिस असेल, सरपंचाचं ऑफिस असेल, उपसरपंच असेल, मी निर्णय घेतो की, जिल्ह्यात गसळ्या ग्रामपंचायती आपल्याला जिथं जागा असेल तिथं ग्रामपंचायत इमारत नवीन घ्यायचा असा एक निर्णय घेतो आहे.

****

पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळा अभावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चार महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शेंद्रा इथले वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, देवळाई इथलं डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय, कोळवाडी इथले गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय, सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन या महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनी उद्या २५ एप्रिलपर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश शैक्षणिक विभागानं दिले आहेत. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. गुणवत्ता आणि दर्जा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या ११३ शाळांमध्ये इंटरऍक्टिव्ह बोर्ड या संकल्पनेवर आधारित शिक्षण दिलं जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चित्र आणि आकृत्यांच्या सहाय्याने शिकवलं जात असून, यूट्यूबवरील चित्रफितीच्या माध्यमातून विविध विषयांमध्ये कौशल्य विकसित होत आहे. या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी अधिक माहिती दिली –

इंटरॲक्टीव्ह बोर्डचा आता एक फायदा एक आहे की आता जुनी जी पद्‌धत होती चॉक आणि बोर्ड ची त्याच्यामध्ये आणखी एक पद्‌धत आहे इंटरॲक्टीव्ह बोर्डची ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेटचे सर्व साधन वापरून आणि जे शिक्षक आहेत ते पण सर्व व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत किंवा ऑडिओ इनपूटस्‌ आहेत, त्याला सर्वांला वापरून आणि त्यांचे जे स्वतःचे जे तज्ञ आहेत त्याला वापरून मुलांना शिकवू शकतात. इंटरॲक्टीव्ह बोर्ड म्हणजे की मुलं शिक्षकांबरोबर आणि या इंटरनेटवर जे कंटेंट आहेत त्याच्याबरोबर ते इंटरॲक्ट करू शकतात. आणि जास्तीत जास्त जे ज्ञान आहे म्हणजे जे पुस्तकात उपलब्ध होत नाही, काहीतरी शंका वगैरे असतील ते इंटरॲक्टीव्ह बोर्ड मध्ये ते इंटरनेटमध्ये लगेच शोधु शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात.

****

हिंगोली इथल्या संत नामदेव मार्केट यार्डात आज मराठवाड्यासह विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, जळगाव जिल्ह्यातून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सोळा हजार कट्ट्यांची आवक झाल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आलं. राज्यभरातील जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात तर परजिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येनं खरेदीसाठी येतात.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं राजीव गांधी मैदानात संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: