Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
डिजिटायझेशन
आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनातील पारदर्शकतेत वाढ - राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
·
राज्यांचा
विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
·
शालेय
अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला.
आणि
·
हिंगोली
तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी.
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा
वितरणामुळे नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी केलं आहे. भारतीय नागरी लेखा सेवेतील २०१८ च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी
आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रशासन
प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे
प्रशासनाचा साचाच बदलला आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोणत्याही विभागात झाली तरी, आपल्या कामाच्या मूळ उद्देशाची जाणीव ठेवून, जनतेचे कल्याण
आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देशाने काम करावं, असा सल्ला राष्ट्रपतींनी
भावी अधिकाऱ्यांना दिला.
****
राज्यांचा विकास हेच देशाच्या
विकासाचं सूत्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज केरळमधल्या
तिरुवनंतपुरम स्थानकातून वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर
बोलत होते. वंदे भारत रेल्वे गाड्या पर्यावरणपूरक असून, देशभरात अशा चारशे गाड्या सुरू
करण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी
मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम
सुरु आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. केरळ मधल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या
विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज
पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत
होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला
दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा
प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता,
रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं. या
प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा
प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी
म्हटलं आहे.
दरम्यान,
या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या
आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती
होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध
करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं
आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त
केलं आहे.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक
अहवाल आज शिक्षण विभागानं स्वीकारला आहे, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा
आराखडा निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते
आज मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल आज
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन
परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा,
असं केसरकर यांनी म्हटलं, तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल,
ते देण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी
सांगितलं.
दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या
खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी
कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते आज बोलत
होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश
सत्तार यांनी दिले. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर
कडक कारवाई करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याची
सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
****
राज्य
सरकारच्या वतीनं राज्यातल्या शाळांसाठी आता वर्चुअल क्लासरूम अर्थात आभासी वर्ग, ही
संकल्पना राबवली जाणार असून, यंदा मे महिन्यामध्ये या आभासी वर्गांच्या माध्यमातून
इयत्ता दहावीसाठी उन्हाळी वर्ग घेतले जाणार आहेत. तसंच, येत्या जूनपासून वर्षभर आभासी
वर्गांद्वारे राज्यातल्या सातशे एकसष्ट शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी
या शाळांमध्ये विशेष वर्ग तयार करण्यात आले आहेत. आभासी वर्ग घेण्याच्या या उपक्रमासाठी
बालभारती इथे या महिन्याच्या दहा तारखेपासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांना या नियोजनाची जबाबदारी देण्यात
आली आहे.
****
मराठवाड्यात आज हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस
झाला.
हिंगोली
जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट
झाली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक आदी या भागात
वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तर वसमत तालुक्यातील कवठा, किन्होळा, कुरुंदा
या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून
गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं
मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात
आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे
झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या
आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथे शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात इतरत्र ढगाळ वातावरण असून, दमटपणा वाढल्याचं, तसंच हवामान विभागानं
जिल्ह्यात येत्या २९ एप्रिलपर्यंत ऑरेंज अर्लट जारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत
काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली
रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिल्या असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे खासदार
इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार
जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं
शस्त्रक्रिया होत नसल्याकडे खासदार इम्तियाज जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. केंद्र
सरकार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार
आहे, मात्र यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असं मत जलील
यांनी न्यायालयासमोर मांडलं.
जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी
कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार जलील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याची
माहितीही जलील यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment