Saturday, 29 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 29.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

शांघाय सहकारी संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावं, आणि अशा कृत्यांना मदत करणार्या देशांवर त्याची जबाबदारी निश्चित करावी, असं आवाहन भारतानं केलं आहे. संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांना काल नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केलं. युवकांना दहशतवादाच्या दिशेनं वळवण्यात येत असल्यानं सुरक्षिततेसाठी एक मोठं आव्हान बनलं असल्याचं ते  म्हणाले.

****

नवी दिल्लीतल्या दिल्ली हाट इथं आजवरचं पहिलंच तृणधान्य अनुभव केंद्र कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सुरु करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार कृषी विपणन महामंडळानं कृषी मंत्रलायाच्या सहयोगानं हे तृणधान्य अनुभव केंद्र स्थापन केलं आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये तृणधान्याविषयी जागृती करुन त्याचा वापर वाढवण्याचा या केंद्राचा उद्देश आहे.

****

महिला कुस्तीपटुंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दोन प्राथमिक अहवाल दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कुस्तीपटुंच्या याचिकेवरुन केलेल्या कारवाईची माहिती सर्वोच्च न्यायालयात काल दिली. यासंदर्भात पुढची सुनावणी पाच मे रोजी होणार आहे.

****

महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुतंवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून, यासाठी मॉरिशसच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - एमआयडीसी यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. 'इंडो-मॉरिशस बिझनेस फोरम'च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना महाराष्ट्रातली बलस्थानं सांगत, त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.

****

विविध प्रकारच्या आगींचं नियंत्रण करताना लष्करी आणि नागरी यासह सर्व संयुक्त यंत्रणांच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी अग्नी दमन हा सराव देहू रोड इथं काल लष्कराच्या दक्षिण विभागातर्फे घेण्यात आला. 32 नागरी यंत्रणांसह 56 अग्निशमन यंत्रणांनी या सरावात सक्रिय सहभाग घेतला होता.

****

No comments: