Saturday, 29 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 29.04.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ एप्रिल  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मराठवाड्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट;विभागात दहा ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

·      राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण

·      स्थानिकांच्या इच्छेविरूद्ध प्रकल्प पुढे न्यायचा नाही-बारसू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

·      देशात ९१ एफएम ट्रान्समीटर्स पंतप्रधानांच्या हस्ते कार्यान्वित;राज्यात हिंगोलीसह सात ट्रान्समीटर्सचा समावेश 

·      छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या जलयोजनेच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

·      मराठवाडा वैधानिक विकास मंडळास मुदतवाढ देण्याची जनता विकास परिषदेची मागणी

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा पंजाब किंग्जवर ५६ धावांनी विजय

 

 

 

सविस्तर बातम्या

मराठवाड्यात काल सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. विभागात  दहा ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वधिक १३५ पूर्णांक २५ मिलीमीटर पाऊस लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या बोरोळ गावात झाला आहे.  कालच्या पावसामुळे मराठवाड्यातली १५३ गावं यामुळे बाधित झाली आहेत. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर ६८ जनावरं दगावली.

या पासावमुळे विभागातले चार हजार ४३३ शेतकरी बाधीत झाले आहेत. जिरायत, बागायत आणि फळबाग मिळून एकूण दोन हजार ५७० हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वैजापूर, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या खडक वाघलगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. सोयगाव शहरातल्या ६५ घरावंरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाली. फर्दापूर इथल्या वाघूर नदीला पूर आला होता. छत्रपती संभाजी नगर शहरातही काल दुपारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. शहरात काही रस्त्यांवर झाड उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ताशी ४२ किलोमीटर नोंदवला गेला तर तेरा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

धाराशिव शहरातही काल सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भूम तालुक्यात हाडोंग्री इथं वीज पडून दोन गायी दगावल्या. या पावसामुळे फळ पिकासह भाजीपाला आणि राशीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दिवसभरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातल्या विविध भागात वीज कोसळून १८ जनावरांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री इथं सहा ठिकाणी वीज कोसळली. यामध्ये तीन म्हशी, दोन बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. या पावसामुळे कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी, आंबा फळबागांचं नुकसान झालं.

परभणी शहरातही काल सायंकाळी अवकाळी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, लासलगावसह काही भागात काल दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सिन्नर तालुक्यातल्या काही भागात विजेचे खांब पडले तर लासलगाव इथं कांदा आणि मका भिजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं.

****

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल पहिल्या टप्प्याचं मतदान झालं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर बाजार समितीत ९८ पूर्णांक ८४ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९५ पूर्णांक २९ टक्के, कन्नड ९६ पूर्णांक १३ टक्के, आणि लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये ९७ पूर्णांक ५१ टक्के मतदान झालं.

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी बाजार समितीसाठी ९५ पूर्णांक ५०, तर परतूर बाजार समितीसाठी ९५ पूर्णांक ३५ टक्के मतदान झालं.

धाराशिव जिल्ह्यातल्या आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी सुमारे ९७ टक्के मतदान झालं. मतमोजणी आज होणार आहे. राज्यातल्या उर्वरित बाजार समित्यांसाठी उद्या ३० तारखेला मतदान होणार आहे. 

काही बाजारसमित्यांमध्ये काल मतमोजणी झाली,

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री अमित देशमुख प्रणीत कृषी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले. चाकूर बाजारसमितीत भाजपचे १० तर महाविकास आघाडीचे आठ उमेदवार विजयी झाले. बीड जिल्ह्यात वडवणी बाजार समितीत शेतकरी महाविकास आघाडीचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले.

नांदेड जिल्ह्यात पाच पैकी नायगाव बाजारसमितीची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित चार बाजार समित्यांसाठी सरासरी ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के मतदान झालं.

****

रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करून, स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेण्याचं आणि गावकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांची दिलं आहे. बाहेरून आलेलेल लोक तिथं आंदोलन करत असल्यामुळे हे आंदोलन चिघळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी काल आंदोलकांची भेट घेतली. यावेळी तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी काही काळ राऊत यांना ताब्यात घेतलं होतं. काही आंदोलकांवरही पोलिसांना कारवाई करावी लागली. सरकारने स्थानिकांचं म्हणणं ऐकून घ्यावं तसंच गावकऱ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

दरम्यान स्थानिकांच्या इच्छेविरूद्ध प्रकल्प पुढे न्यायचा नाही, ही सरकारची भूमिका असल्याचं,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले...

Byte…

हे सर्व आपले भूमीपुत्र आहे. आणि शेवटी कुठला ही प्रकल्प त्यांच्या इच्छेविरूध किंबहुना त्यांच्यावर अन्याय करून आपल्याला पुढे न्यायचा नाही ही भूमिका सरकारची आहे. कुठल्याही परिस्थीती मध्ये शेतकऱ्यांच्यावर अन्याय करून किंबहुना जोरजबरदस्तीने कुठलंही काम, कुठलीही प्रक्रिया  होणार नाही आणि उद्योगमंत्री देखील स्वत: तिथल्या शेतकऱ्याशी बोलत आहेत, त्या भागातल्या लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आहे म्हणून सत्तर टके पेक्षा जास्त लोक त्या बाजूने आहेत. ही देखील वस्तुस्थिती विचारात घेतली पाहीजे.

****

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल त्यांचं नियुक्तीपत्र जारी केलं. सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उद्या निवृत्त होत आहेत, त्यांच्याकडून उद्या पदभार घेण्यास सौनिक यांना सांगण्यात आलं आहे.

****

देशातली १८ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांत शंभर व्हॅट क्षमतेचे ९१ एफएम ट्रान्समीटर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यान्वित करण्यात आले. यामध्ये राज्यात हिंगोली, सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी उभारलेल्या ट्रान्समीटर्सचा समावेश आहे. देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी, तसंच आकांक्षित जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या ट्रान्समीटर्समुळे, आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार होणार असून, अतिरिक्त दोन कोटी लोकांपर्यंत संवाद पोहोचणार आहे.

 

हिंगोली इथल्या ट्रान्समीटर लोकार्पण सोहळ्याला खासदार हेमंत पाटील, माजी खासदार रामराव वडकुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना, हिंगोली जिल्ह्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

Byte…

मनापासून या केंद्राला हार्दिक शुभेच्छा देतो यानिमित्तानं. हिंगोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या जनतेचे प्रश्न, त्यांच्या वेदना, अडचणी या केंद्राद्वारे सगळीकडे मांडण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. आमच्या भागातील संस्कृती बंजारा बहुल विभाग आहे, आदिवासी बहुल विभाग आहे. त्यांची सुद्‌धा संस्कृती यानिमित्तानं जगासमोर येईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रम मालिकेचा हा शंभराव्वा भाग असेल. तीन ऑक्टोबर २०१४ पासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या शतकपूर्ती निमित्त सांस्कृतिक मंत्रालय आजपासून देशभरातल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या स्मारकांसह तेरा प्रमुख ठिकाणी विशेष सादरीकरण करणार आहे. यामध्ये मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाचा समावेश आहे.

****

गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयानं, शहर सौंदर्यीकरण स्पर्धा घोषित केली आहे. शहराचं सौंदर्य राखण्याबरोबरच सार्वजनिक सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनवीन जागा निर्माण करायला स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्थांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटी ब्यूटी कॉम्पिटिशन डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून भाग घेता येईल.

****


अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग -सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.

****

छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या महत्त्वाकांक्षी जलयोजनेच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत या जलयोजनेचं काम संथगतीने सुरु असल्याबद्दल पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. या जलयोजनेअंतर्गत शहरात जलकुंभ उभारण्यासाठी जवळपास ४० हजार ब्रास वाळू लागणार आहे. मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याची माहिती कंत्राटदार कंपनीच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. पैठण ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील दोन ग्रामपंचायतींनी योजनेच्या कामात अडथळा निर्माण केला, तसंच एका धार्मिक संस्थानानेही वाळू देण्यास विरोध दर्शवल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. अडथळे आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी नऊ जून रोजी होणार आहे.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत साठ वर्ष वयावरील नागरिकांसाठी नाकावाटे दिली जाणारी इन्कोव्हॅक ही वर्धक लसमात्रा लवकरच उपलब्ध होणार आहे. प्रत्येक नाकपुडीत चार थेंब, याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आठ थेंब देण्यात येतील. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या आणि वर्धक मात्रा न घेतलेल्या साठ वर्षावरील नागरिकांना ही मात्रा मोफत देण्यात येईल.

धाराशिव जिल्ह्यात, दोन मे पासून ही वर्धक लसमात्रा दिली जाणार असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

लातूर इथं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथल्या महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रात ही वर्धक लस उपलब्ध असेल, असं महानगरपालिकेडून सांगण्यात आलं.

****

मराठवाडा वैधानिक विकास मंडळास मुदतवाढ देण्यासह इतरही मागण्यांसाठी, जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं, काल उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. मराठवाड्याचा विविध क्षेत्रातील विकासाचा आणि निधी तरतुदीचा अनुशेष भरून काढावा, तसंच मराठवाड्याच्या विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी परिषदेच्या वतीनं यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली, परंतु अद्याप पर्यंत शासन पातळीवरून याची दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली. या मागण्याचं निवेदनही परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

जनता विकास परिषदेच्या वतीनं काल हिंगोली इथंही अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी हुतात्मा स्मृती स्तंभ उभारण्याची मागणी, हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे जिल्हा संयोजक, युवराज नळे यांनी केली आहे. यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात बारा ठिकाणी शासनातर्फे हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे. आता चिलवडी, आंबेजवळगे, आळणी आणि तुळजापूर तालुक्यात केशेगाव इथं, हुतात्मा स्मृती स्तंभ उभारण्याची मागणी केली जात आहे.

****

दुबई इथं सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा २१ - ११, २१ - १२ असा पराभव केला. एकेरीमध्ये भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत पी व्ही सिंधुचा दक्षिण कोरियाच्या खेळाडुकडून, तर पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयचा जपानच्या खेळाडुकडून पराभव झाला.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्जवर ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्सनं दिलेल्या २५८ धावांचं आव्हान पार करताना पंजाबचा संघ २०१ धावांवर सर्वबाद झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात वरवंडी तांडा इथल्या जिल्हा परिषदच्या शाळेत, शाळा पूर्वतयारीच्या पहिलं पाऊल या उपक्रमाचा, काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुलांना घरी शिकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचं यावेळी वितरण करण्यात आलं. शाळेत उभारलेल्या डिजिटल खोल्यांची मीना यांनी पाहणी केली. नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, तसंच निजामकालीन शाळा खोल्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

****

धुळे -दादर एक्सप्रेस या नवीन रेल्वेला राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज शुभारंभ होणार आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, ते या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार आहे.

दरम्यान, जगन्नाथ पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला काल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुणे इथं हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरात धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी ही विशेष सेवा यात्रा सुरू करण्यात आली असल्यचं दानवे यांनी सांगितलं .

****

No comments: