Thursday, 27 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      जनतेच्या प्रगतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं आवाहन.

·      मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची मागणी.

·      राज्यात हिंगोलीसह सात ठिकाणी उद्यापासून एफएम सुरू होणार.

आणि

·      ‘सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी’ पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर.

****

‘प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर इथं या संबंधी महोत्सवा अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं, त्यावेळी कराड बोलत होते. महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरुकता वाढवण्यासाठी सबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असं ते म्हणाले. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महापालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नगरपालिके अंतर्गतही यासाठी मेळावे घेण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले –

या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका आहेत. ही योजना जशी महानगरपालिकेला आहे तशी नगरपालिकेला सुद्धा आहे. म्हणून कन्नड असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल याठिकाणी सुद्धा ही योजना चालू आहेच. पण त्याचं रिव्ह्यू मिटींग आपण लवकरात लवकर घेऊ. म्हणून जिल्हा परिषदेचे असिस्टंट सीईओ जिल्हा परिषदेमार्फत मी त्यांना सूचना करतो की लवकरात लवकर तुम्ही आढावा घ्या. आणि एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कन्नड किंवा वैजापूर असा मेळावा ठेवा. आणि त्यात एसबीआय बँक असेल सर्व बँक असेल सर्व सहकार्य करतील.

****

येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केली आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यासंदर्भात पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्या वतीनं २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तेव्हापासून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, असंही पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी आहे, याकडेही अजित पवार यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधलं आहे.

****

कर्करोग मुक्त भारतासाठी नागपूर इथली राष्ट्रीय कर्करोग संस्था महत्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये जामठा इथं या संस्थेचं आज लोकार्पण झालं, त्यावेळी गडकरी बोलत होते. जागतिक स्तरावरच्या अद्ययावत तंत्रज्ञानासोबत सहकार्य करुन यामध्ये संशोधन व्हावं. कर्करोगावर उपचारांसाठी मदत होईल, असे प्रयत्न करायला हवेत, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

दक्षिण मुंबईतल्या फोर्टमधल्या हॉर्निमन सर्कल इथं ‘चार्जिंग बुल’, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ‘गाँग’ आणि ‘कॉमन मॅन’ शिल्पाचं आज पर्यटन, कौशल्य विकास, उद्योजकता आणि महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या समृद्ध प्रवासातला महत्वाचा दिवस म्हणून मानला जाईल, कारण आज आपला प्रसिद्ध ‘चार्जिंग बुल’ सर्वसामन्यांपर्यंत पोहचत आहे. ‘चार्जिंग बुल’ आणि ‘गाँग’ची प्रतिकृती सार्वजनिक रिंगणात ‘कॉमन मॅन’ सोबत ठेवून आपला वारसा अधिक बळकट केला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोकांना आर्थिक बाजारपेठांशी संबंध ठेवण्याची संधी मिळेल, अशी भावना मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांनी यावेळी व्यक्त केली.

****

देशात एफएम सर्वदूर पोहचवण्याबाबत सरकार आग्रही असूनं नव्यानं उभारलेल्या एक्क्याण्णव एफएम ट्रान्समीटरचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. अठरा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात मिळून ८४ जिल्ह्यांत हे ट्रान्समीटर उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सटाणा, नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी या ट्रान्समीटरचं लोकार्पण होणार आहे. यामुळं देशातल्या ज्या लोकसंख्येला आतापर्यंत एफएम जोडणी नव्हती त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचणार आहे.

****

देशामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६९ शतांश टक्के आहे. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. गेल्या २ आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ टक्के घट झाली आहे. राज्यात काल ७८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि १ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ५ हजार २३३ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज दुपारपर्यंत दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ६६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे.

****

कोविड-19 लसीकरणा अंतर्गत इन्कोव्हॅक ही नाकवाटे घ्यावयाची लस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. ही लस फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या वर्धक मात्रेसाठीच वापरण्यात येणार आहे. इन्कोव्हॅक लस ही जिल्हा रुग्णालय चिकलठाणा इथं उपलब्ध झाली असून लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. वर्धक मात्रेसाठी पात्र असलेल्या सर्व ६० वर्षांवरील नागरिकांनी जिल्हा रुग्णालय औरंगाबाद इथून इन्कोव्हॅक लस घ्यावी, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी केलं आहे.

****

मुंबई इथल्या ‘आफ्टरनून व्हॉईस’च्या १५ वा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड’ २०२३ मधला ‘सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी’चा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर झाला आहे. जलील यांची संसदेतली भाषणं हा लोकांचा आवाज असल्यानं त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं या संदर्भातली घोषणा करताना संयोजक डॉ. वैदेही तमन यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्र दिनी - येत्या एक मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलील यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

****

मुंबई-पुणे महामार्गावर आज सात वाहनं एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. खोपोली जवळ झालेल्या या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे इथल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती. राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत असून, वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

 नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उष्माघाताच्या त्रासामुळं १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. आता या याचिकेवर येत्या आठ जूनला सुनावणी होणार आहे. विरारच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम करण्यात आला. तसंच कार्यक्रमावर झालेला खर्च आयोजकांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात आज अवकाळी पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह पाऊस पडला.

****

समलिंगी विवाह कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज धाराशिव इथं धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. असे विवाह आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध असून हा विषय अनैसर्गिक आहे. त्यामुळे समलिंगी विवाह कायदा होऊ नये असं धारासूर मर्दिनी महिला फेडरेशननं म्हटलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. जयपूर इथल्या सवाई मानसिंह मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा ३७वा सामना आहे. चेन्नईचा संघ १० गुण मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थानी असून राजस्थानचा संघ आठ गुण मिळवत तिसऱ्या स्थानी आहे.

****

No comments: