Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 28 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ एप्रिल
२०२३ दुपारी १.०० वा.
****
रेडिओमुळे
देश सामूहिक कर्तव्य शक्तीसोबत संलग्न राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. देशातली १८ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांत शंभर
व्हॅट क्षमतेच्या ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे
उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होत असून रेडिओ कनेक्टिव्हिटीला
प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना
देण्यासाठी, तसंच आकांक्षित जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं
हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या ट्रान्समीटर्समुळे, आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार
होणार असून, अतिरिक्त दोन कोटी लोकांपर्यंत संवाद पोहोचणार आहे.
दरम्यान
हिंगोली इथल्या ट्रान्समीटरचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, खासदार हेमंत
पाटील, माजी खासदार रामराव वडकुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नंदूरबार इथं
झालेल्या कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि खासदार
डॉ हिना गावित उपस्थित होत्या.
***
देशात
गेल्या २४ तासात सात हजार ५३३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११
हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. देशात सध्या ५३ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
***
जगन्नाथ
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला आज
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुणे इथं हिरवा
झेंडा दाखवून रवाना केलं. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक
दरात धार्मिक स्थळांना भेट देता यावी, याकरता भारतीय
रेल्वेच्या वतीनं ही विशेष सेवा यात्रा सुरू करण्यात आली
असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं. 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या
उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली
आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि
प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचं दर्शन घडवलं जाणार आहे.
***
राज्यातल्या
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं
मतदान आज होत आहे. जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी, बीड जिल्ह्यातल्या
बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या छत्रपती
संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी
आज मतदान होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील
आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या
संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उर्वरित बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला
मतदान होणार आहे.
***
उद्धव
बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं रिफायनरी
विरोधात आंदोलकांची भेट घेण्यास दाखल झाले. प्रथम पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला,
मात्र राऊत यांनी रस्त्यावर ठाण मांडलं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्याची
परवानगी दिली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग क्षेत्राला
येणाऱ्या अडचणी जिल्हा उद्योग मित्र समितीनं दूर कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा उद्योग मित्र समितीचे अध्यक्ष अस्तिक
कुमार पाण्डेय यांनी केलं आहे. उद्योग मित्र समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते.
विविध संघटनेच्या प्रतिनिधींनीही याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,
असं आवाहन त्यांनी यावेळी समितीच्या सदस्यांना केलं.
***
महाराष्ट्र दिनानिमित्त धाराशिव जिल्हयातल्या दोन
हजार ७९ अंगणवाडी केंद्रातल्या सहा वर्षाच्या आतील एक लाख २८ हजार २४ बालकांचं वजन आणि उंची घेऊन श्रेणीनिहाय वर्गीकरण करण्यात
येणार आहे. महिला आणि बालविकास विभागामार्फत सहा मे पर्यंत
हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये आढळून आलेल्या कुपोषित बालकांची तपासणी करुन
उपचार आणि औषधोपचार करण्यात येणार आहे.
***
अहमदनगरची
भाग्यश्री फंड, कोल्हापूर इथं झालेल्या महिलांच्या महाराष्ट्र केसरीची विजेती ठरली
आहे. भाग्यश्री आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यात काल झालेली अंतिम लढत दोन
- दोन अशा समान गुणांवर सुटली असताना, पंचांनी तांत्रिक सरशीच्या
जोरावर भाग्यश्रीला विजेती घोषित केलं.
तिला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री
दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि चारचाकी
भेट देण्यात आली.
***
छत्रपती
संभाजी नगर जिल्ह्यात वैजापूर, पैठण आणि गंगापूर तालुक्यातील खडक वाघलगाव परिसरात आज
जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. छत्रपती संभाजी नगर शहरातही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
सुरू आहे.
***
दुबई
इथं सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधू
आणि एच.एस.प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीत सत्विक साइराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी,
यांनी देखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment