Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची राज्य सरकारची
घोषणा; वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.
·
भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू; बचावकार्य सुरू.
·
मन की बात चा उद्या शंभरावा भाग; ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
होण्याचं आवाहन.
आणि
·
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निवडणूक निकाल जाहीर; मतदारांचा
संमिश्र कौल.
****
येत्या एक आणि दोन जून २०२३ रोजी रायगडावर ३५० सावा शिवराज्याभिषेक
सोहळा राज्य शासनाकडून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक
जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, राज्यातल्या प्रमुख किल्ल्यांवर
शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत आज मुंबईत
आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आग्रा इथं छत्रपती शिवाजी
महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे, राज्यात अकृषक विद्यापीठस्तरावर
छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक
सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचं आवाहन शिंदे
यांनी यावेळी केलं. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा
यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी असे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी
दिले आहेत. देशभरात विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती
शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार असल्याचं शिंदे यांनी
सांगितलं.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात आज वर्धमान
ही तीन मजली इमारत कोसळली, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली
दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढण्यात आलं
आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी आणि पोलीस, तसंच पालिका प्रशासन दाखल
झालं असून, बचावकार्य सुरू आहे.
****
वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला
प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी म्हटलं
आहे. विखे - पाटील यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि अप्पर
जिल्हाधिकाऱ्यांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या नवीन वाळू
धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध
वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने
करावी, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.
****
मुंबईतल्या वरळी, घाटकोपर आणि वांद्रे या तीन ठिकाणांहून आज
४० लाख रुपयांचे एमडी मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहेत. मुंबई अंमली पदार्थविरोधी
पथकाने केलेल्या कारवाईत एकूण पाच अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. गोरेगाव आणि
माहिम परिसरात छापे टाकून या तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प डिसेंबर २०२४ पासून
कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सिडकोच्या वतीनं सुरू आहेत. हे विमानतळ मुंबईतील छत्रपती
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी मेट्रो मार्गाने जोडण्यात येणार आहे. या मार्गातून
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत मेट्रो टर्मिनलकरिता प्रवेश दिला जाणार असल्याची
माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारकडून राज्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करुन देणार असून, आगामी काळात रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लागतील असं, केंद्रीय रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. धुळे -दादर एक्सप्रेस या नवीन रेल्वेचा
दानवे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे स्थानकावर या रेल्वेगाडीला हिरवा
झेंडा दाखवला. सन २०२३ पर्यंत रेल्वेच्या सर्व मार्गांचं विद्युतीकरण करण्याचा निर्धार
करण्यात आला असून, देशातील एक हजार दोनशे पन्नास रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात
येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा शंभरावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
दरम्यान, मन की बातच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं
आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात या कार्यक्रमातून जनसंवाद, जनसहभागाचा
अनोखा प्रयोग केल्याचं, गोयल यांनी म्हटलं आहे,
****
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने
पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश
महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि
गारपिटीनंतर जिल्ह्यातील सुमारे ३६ हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी ३० कोटी ५२
लाख १२ हजार रुपये निधी शासनाकडे मागितला आहे. याला शासन निर्णयान्वये मंजुरीही देण्यात
आली असून, बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे
मदत वाटप करण्याची कार्यवाही चालू असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यभरात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत
मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा आणि शिवसेना
पुरस्कृत पॅनलने १५ पैकी ११ जागांवर विजय मिळवला, उर्वरित चार जागांवर महाविकास आघाडीचे
उमेदवार विजयी झाले आहेत.
वैजापूर बाजार समितीवरही भाजप शिवसेना गटानं विजय मिळवला. आमदार
रमेश बोरनारे यांच्या नेतृत्चात या भाजप शिंदे गटाच्या पॅनलने या बाजारसमितीत दहा जागांवर
विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावं लागलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर धनंजय मुंडे
यांच्या नेतृत्वातल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकल्या, परळी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास
पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकल्या असून, उर्वरित सात जागांवर याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर
आहेत.
गेवराई इथं माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी
काँग्रेस पुरस्कृत पॅनलने तसंच वडवणी इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी
आणि महाविकास आघाडीने सर्व १८ जागा जिंकल्या आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या
नेतृत्वात महाविकास आघाडीने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला.
आष्टी इथली निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली असून, इथे सुरेश
धस गटाचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भीमराव धोंडे गटाचे तीन तर शिवसेनेचा एक
उमेदवार विजयी झाला आहे.
केज बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला १४ जागांवर विजय मिळाला
आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा
हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचं, या निकालातून सिद्ध
झालं, असं म्हटलं आहे.
****
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे माजी आमदार गजानन
घुगे विजयी झाले.
धाराशिव जिल्ह्यातल्या भूम बाजार समितीत एकूण १८ पैकी ११ जागांवर
मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या
निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय किसान पॅनलने सर्व १८ जागा जिंकल्या आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस
पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ जागांवर विजय मिळवला,
भाजप प्रणित विखे पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
****
येत्या १ मे ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त, नांदेड जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे, जिल्ह्यातल्या सर्व माध्यामांचे
सर्व विद्यार्थी आपापल्या शाळेत सामुहिक राज्यगीताचं गायन करणार होते, मात्र शाळेला
सुट्या जाहीर झाल्याने हा निर्णय तुर्तास रद्द करण्यात आला आहे. आता १५ ऑगस्ट २०२३
ला स्वातंत्र्य दिनी हे सामुहिक राज्यगीत गाण्यात येणार आहे.
****
लातूर इथं आज विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स
अंतर्गत चालणाऱ्या व्हि.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी महाविद्यालयात काल बी.फार्मसी आणि एम.फार्मसीचं
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्य आणि सॉफ्ट स्किल या विषयावर परिसंवाद
पार पडला. संवाद तज्ञ राहुल बुलानी यांनी या परिसंवाद व्यवसायामध्ये इतरांसोबत काम
करण्याची क्षमता कशी सुधारता येईल या विषयी मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment