Thursday, 27 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 27.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date :  27 April  2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

येणाऱ्या काळात कर्करोगावर दर्जेदार उपचार सहज आणि परवडणारे उपलब्ध करुन देण्याचं आव्हान आपल्यासमोर असून, त्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं राष्ट्रीय कर्करोग संस्था आणि रुग्णालयाचं लोकार्पण आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष, महात्मा फुले योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून रुग्णांना दिलसा देण्याचं काम सरकार करत असून, अशा संस्थांच्या पाठिशी कायम उभं असल्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं. हे आरोग्य मंदीर असून, इथं आलेला प्रत्येक रुग्ण पूर्ण बरा होऊन जाईल, याची शाश्वती असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाला भेट देऊन, आपापल्या भागात असं अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ही सामान्य माणसासाठी उभारलेली व्यवस्था असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. मध्य भारतातल्या कर्करोगांच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय उभारण्यात आलं असून, यामध्ये बालकांसाठी नि:शुल्क उपचार केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्करोगाच्या निदानासाठी असलेल्या अत्याधुनिक यंत्रणा, किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असून, रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा याठिकाणी उभारल्या जातील, थॅलसेमिया, सिकलसेल या आजारावर देखील इथं संशोधन होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे उभारलेल्या या रुग्णालयात ४७० खाटा आहेत. या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन २०१७ मध्ये झालं होतं.

***

संघर्षग्रस्त सुदानमध्ये सुमारे तीन हजार पाचशे भारतीय आणि एक हजार भारतीय वंशाचे नागरीक असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. भारतीय नागरीकांच्या मदतीसाठी सुदानमध्ये भारतीय दूतावासाने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे तीनशे भारतीय नागरिकांनी स्वतःची नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणंलं जात असल्याचं ते म्हणाले.

***

उत्तराखंडमधलथा श्री बद्रीनाथ मंदीराचे दरवाजे आज सकाळी भाविकांसाठी वैदिक मंत्रोच्चारात उघडण्यात आले. मंदिराला झेंडूंच्या फुलांनी सजवलं असून मंदिर परिसरात हलकी बर्फवृष्टी होत आहे. मोठ्या संख्येनं भाविक बद्रीनाथ इथं पोहोचले आहेत. गंगोत्री, यमुनोत्री तसंच केदारनाथ मंदीराचे दरवाजे यापूर्वीच उघडण्यात आले आहेत.

***

देशात गेल्या २४ तासात नऊ हजार ३५५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात सध्या ५७ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

***

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी ३० तारखेला प्रसारित होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यातल्या सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी आपापल्या विभागातल्या सर्व शाळांची कागदपत्रं तपासून त्यांच्या वैधतेविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्यातल्या शिक्षण आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत. राज्यात बनावट ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे किमान आठशेहून अधिक अनधिकृत शाळा सुरु असून, त्यापैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर आणखी किमान ७७ शाळा अनधिकृत असल्याचं शिक्षण विभागाकडून जाहीर होऊ शकतं. येत्या आठवडाभरात हा अहवाल आल्यानंतर राज्यातल्या अनधिकृत शाळांची नेमकी आकडेवारी समोर येणार असून, पुढील कारवाईची दिशा देखील निश्चित होणार आहे. सर्व प्रकारची माहिती घेऊनच पालकांनी या शाळांमधून आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घ्यावा असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे.

***

लातूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वतर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात जाणं टाळावं, या दरम्यान अंग मेहनतीची कामं करू नयेत, असं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत विविध शासकीय विभागांच्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातली आरोग्य सेवा, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उष्माघात विरोधी औषधांसह सर्व सज्जता ठेवावी, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

***

दुबई बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयनं उप - उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात प्रणॉयनं म्यानमारच्या खेळाडुचा २१ - १४, २१ - नऊ असा पराभव केला. पुरुष दुहेरीतही भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करुन, उप - उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतनं देखील आपापल्या सामन्यात विजय मिळवले.

 

//**********//

 

No comments: