Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ एप्रिल
२०२३ दुपारी १.०० वा.
****
पॉप्युलर
फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या १७ ठिकाणांवर आज मंगळवारी छापे
टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए आणि अंमलबजावणी संचालनालय -ईडी यांनी संयुक्तपणे
बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली. केंद्र सरकारने २०२२ मध्ये पीएफआयवर
पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. तरीही, पीएफआय सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश,
कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी १५ राज्यांमध्ये सक्रीय असल्याचं सांगितलं जात आहे.
****
देशात गेल्या
२४ तासात सहा हजार ६६० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार २१३
रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६३ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा
दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के इतका आहे.
दरम्यान,
राज्यात गेल्या २४ तासांत २२६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०५
रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात पाच हजार ७७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री
उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी
लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले.
माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही
दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं.
दरम्यान,
या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नये, अशी विनंती
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये
पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या
दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या
सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
भाजप नेते
राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार
संजय राऊत यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या
कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असून, ही रक्कम कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या
कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचा राऊत यांचा आरोप आहे. आपण गृहमंत्री फडणवीस
यांच्याकडे यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे
राऊत यांनी म्हटलं आहे.
****
'स्वच्छता
मॉनिटर' उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं, त्यांचं
हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी
व्यक्त केला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या, 'स्वच्छता
मॉनिटर' उपक्रमात, सर्वोत्तम कामगिरी करणारे पाच जिल्हे, पाच समन्वयक तसंच ३० शाळा
आणि विद्यार्थ्यांचा, केसरकर यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत
होते.
सत्कारार्थीमध्ये
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फातेमा गर्ल्स उर्दू हायस्कूल, जालना जिल्ह्यात अंकुशनगर
इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल, जनता हायस्कूल, मत्स्योदरी विद्यालय, तसंच मोतीगव्हाण
इथल्या नेत्रदीप विद्यालयाचा समावेश आहे.
****
अपघातग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुटुंबाना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून
मदत दिली जाते. याआधी ही योजना विमा कंपन्यांच्या मार्फत राबवण्यात येत होती, मात्र
त्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन, अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी,
शासनाच्या वतीनं, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत प्रस्ताव मंजूर करून शेतकरी
कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे.
****
इंडियन प्रिमियर
लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना
होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला
सुरुवात होईल.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं
काम पूर्ण झालं आहे. येत्या एक मे रोजी या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं
पैठण नगरपरिषदेनं कळवलं आहे.
****
जागतिक हिवताप
दिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथल्या सहायक संचालक आरोग्य
सेवा आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण
कार्यक्रमाअंतर्गत, हिवताप जनजागृती साठी प्रदर्शनी लावण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment