Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· मराठवाड्यात
अनके भागात गारपिटीसह पाऊस
· बारसू
रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, पोलिस बळाचा वापर करून रिफायनरीसाठी सर्वेक्षण
न करण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन
· शालेय
अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला
· येत्या
महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार -महसूल मंत्री राधाकृष्ण
विखे- पाटील
· 'पहिले
पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
· छत्रपती
संभाजीनगरमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्स संघावर ५५ धावांनी विजय
सविस्तर
बातम्या
मराठवाड्यात अनके भागात काल गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात दुपारच्या
सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा, वरूड, दांडेगाव,
दिग्रस बुद्रुक, या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, तर वसमत तालुक्यातल्या
कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे
तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात
केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांची
मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही
भागात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे
झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या
आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथं शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
झाला. अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, किनवट, कंधार, लोहा, हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस
पडला. लोहा तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल वादळी वार्यासह पाऊस
झाला. या पावसामुळे आंबा, हळद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान, येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या
जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या
नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालिन
रजायपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, सत्तांतर झाल्यानंतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून आमदारांची नवीन यादी तयार करण्यात येत आहे. याविरोधात
सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला दोन
आठवड्यांनी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी तेल
शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे,
असा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल कर्नाटकात विजयापुरा
इथं माध्यमांशी बोलत होते. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात
निश्चित झाल्याचं ते म्हणाले. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही
हानी होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शांततापूर्ण आंदोलकांशी आपण चर्चा करू,
मात्र फक्त राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी
दिला.
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे स्थिर असून, एकनाथ शिंदे
हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
२०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार असल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं.
****
बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात
असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. ही
रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं
होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न
असून, माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही
दाखवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या
विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय
करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण
करू नये, अस आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केलं आहे. या बाबत केलेल्या
एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष
वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं
आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी काल ताब्यात
घेतलं.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही,
सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे
व्यक्त केलं आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात सरकारवर
टीका केली आहे. सरकार दडपशाही करत असून, सर्वेक्षण थांबवण्याची मागणी त्यांनी केली.
प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, एक जाहीर सादरीकरण द्यावं आणि अंतिम मान्यता
ही भूमिपुत्रांची असावी, अशी महाविकास आघाडी सरकारची अट होती, असं ते म्हणाले. तेलशुद्धीकरण
प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याची मागणीही आदित्य
ठाकरे यांनी केली.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक
अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला असून, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा
आराखडा निश्चित केला जाणार असल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ते
काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल
काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून, या अभ्यासक्रमाचा आराखडा
तयार करावा, असं केसरकर यांनी सांगितलं. तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य
आणि मदत लागेल, ते देण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचं अब्दुल सत्तार यांनी आश्वस्त
केलं.
****
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी
सुरू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. यासंदर्भात
काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनानं जाहीर केलेल्या नव्या वाळू
धोरणानुसार वाळूचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार
असून, सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळू मिळणार असल्याची माहितीही, विखे
पाटील यांनी दिली. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना
प्रति ब्रास सहाशे रुपये, म्हणजेच एकशे तेहतीस रुपये प्रति मेट्रिक टन दरानं वाळू उपलब्ध
होईल.
****
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा काल शालेय शिक्षणमंत्री
दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस शाळेतून
या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात
येईल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय
संवाद साधण्याची भाषा असून, प्रगती करणाऱ्या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं,
हे वास्तव लक्षात घेत, येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम
इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकवले जाणार असल्याचं केसरकर यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या दोन
हजार दोन उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात
येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर
पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण
असलेल्या, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी, शासनानं सत्तर कोटी रुपयांचा
निधी दिला असून, या निधीतून चांगले रस्ते होणार असल्यानं उद्योगांची भरभराट होणार आहे,
असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत
चिकलठाणा आणि शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातल्या, विविध विकास कामांचं भूमिपूजन काल सामंत
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक
क्षेत्रास चालना देणारं पोषक वातावरण असल्यानं, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरता
शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. पालकमंत्री संदिपान भुमरे तसंच सहकार
मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मराठवाडा लघू उद्योजक आणि कृषी संघटना -मसिआचे
अध्यक्ष किरण जगताप यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
पाच अभ्यास मंडळाची निवडणूक काल घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या १९ सदस्यांसह
४२ जण आता विद्या परिषदेचे सदस्य बनले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान
साखळे यांनी ही माहिती दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मराठीसाठी
डॉ. सर्जेराव जिगे, हिंदी - डॉ. अपर्णा पाटील, इतिहास - डॉ. हरी जमाले, वनस्पतीशास्त्र
- डॉ. अरविंद धाबे, तर रसायनशास्त्रासाठी डॉ. मोहम्मद आरेफ अली पठाण विजयी झाले.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या
रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याची सूचना, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं राज्य सरकारला दिली असल्याची माहिती, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज
जलिल यांनी दिली आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात
जनहित याचिका दाखल केली असून, ते स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी
रुग्णालय उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत
नसल्याकडे जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं.
जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात
देखील खासदार जलील यांनी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठानं संबंधित
संस्थांना नोटीस बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
उस्मानाबाद पंचायत समितीअंतर्गत, २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये झालेल्या २४ कामांमध्ये,
आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार
नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात ही बाब नमूद आहे. या कामांवर हजेरीपटांवरील मजूरांची,
एकूण ६३ लाख ७७ हजार ७६७ रुपये एवढी मजूरी, त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा न होता,
इतर खात्यांवर जमा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच याशिवाय कामांच्या प्रत्यक्ष स्थळ
पाहणीत, १७ कामांमध्ये मूल्यांकनापेक्षा १९ लाख ४५ हजार रुपये जास्तीचा खर्च झाल्याचं
निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
बजावून, ही रक्कम त्यांच्याकडून वसूल का करण्यात येऊ नये, असं विचारण्यात आलं आहे.
संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील निर्देश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक वसाहतींच्या क्षेत्रात
अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, त्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या भागात सुरू असलेल्या
गुटखा विक्री, मटका, मुरुम चोरी, बिअर शॉप, रेती व्यवसाय आणि गॅस रिफिलींग अशा अवैध
व्यवसायांवर कारवाई करावी, अशा मागणीचं पत्र दानवे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री,
पोलीस महासंचालक, संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तसंच लाललुचपत विभागाच्या महासंचालकांना
लिहिलं आहे. या अवैध व्यवसायिकांकडून पोलीस प्रशासन वसुली करत असल्याचा आरोपही दानवे
यांनी यात केला असून, त्याबद्दलचे पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद
इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सवर ५५ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात २०७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
आलेला मुंबईचा संघ १५२ धावातच सर्वबाद झाला.
****
चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात
वसमत इथं काल आसना नदी जनसंवाद यात्रेचा समारोप
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाला. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी
तिथली जैविक सभ्यता नष्ट होत असते, त्यामुळे सभ्यता टिकवण्यासाठी सर्वानी पाऊल उचलण्याची
गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
बीड तालुक्यातल्या कोळवाडी गावानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक
पटकावला. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर विभागीय आयुक्त
यांच्या हस्ते, कोळवाडीचे सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचातय सदस्य आणि
ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १०
लाख रुपये असा हा पुरस्कार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं उद्या रोजगार मेळाव्याचं
आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनींसाठी मुलाखती घेण्यात येणार असून,
स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात
येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी नायगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
उपस्थित रहावं, असं आवाहन, नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment