Thursday, 27 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 27.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय मंत्रीमंडळानं यावर्षीच्या राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरणाला मंजुरी दिली आहे. भारतातल्या वैद्यकीय उपकरण क्षेत्र अतिशय वेगानं वाढत असून, २०२० मध्ये या क्षेत्रातली उलाढाल अंदाजे ९० हजार कोटी रुपये होती. या धोरणामुळे पुढील पाच वर्षांमध्ये वैद्यकीय उपकरण क्षेत्राची उलाढाल सध्याच्या ११ बिलियन डॉलर्सवरुन ५० बिलियन डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे.  

***

उत्तराखंडमधल्या श्री बद्रीनाथ मंदीराचे दरवाजे आज सकाळी भाविकांसाठी वैदिक मंत्रोच्चारात उघडण्यात आले. मंदिराला झेंडूंच्या फुलांनी सजवलं असून मंदिर परिसरात हलकी बर्फवृष्टी होत आहे. मोठ्या संख्येनं भाविक बद्रीनाथ इथं पोहोचले आहेत. गंगोत्री, यमुनोत्री तसंच केदारनाथ मंदीराचे दरवाजे यापूर्वीच उघडण्यात आले आहेत.

***

जम्मू काश्मीरमधल्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. आज पहाटे शोधमोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या दहशतावद्याकडून दहशत पसरवणारी सामग्री आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आलं. जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सहयोगी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.  

***

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत ३६० भारतीयांना घेऊन आलेलं पहिलं विमान, काल संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचलं. दरम्यान, सुदानी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात राजधानी खार्टूममध्ये सुरु असलेली धुमश्चक्री अधिक तीव्र झाली आहे.

***

किरगीझस्थानमधल्या बिश्केक इथं सुरु असलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या आशियाई फुटबॉल स्पर्धेत काल भारतीय मुलींनी आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यांनी यजमान किरगीझस्थानला एक - शून्य असं पराभूत केलं. भारताचा पुढचा सामना उद्या म्यानमारसोबत होणार आहे.

***

पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी श्री शिवछत्रपती मैदानावर झालेल्या सहाव्या रोलबॉल स्पर्धेत पुरुष गटात भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला केनियाकडून सात - चार असा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी दिव्यांगांच्या सामन्याचा प्रयोग काल करण्यात आला.

//***********//

  

No comments: