Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
छत्तीसगडमध्ये
नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ सैनिकांना वीरमरण.
·
आकाशवाणी
ही भारतीय जनतेच्या आत्म्याचा आवाज-केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा.
·
देशातील जलाशयांच्या
गणनेचा पहिला अहवाल जाहीर-महाराष्ट्राचा देशात पहिला
क्रमांक.
आणि
·
जालना जिल्ह्यात
सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस.
****
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी
केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ सैनिकांना वीरमरण आलं
आहे. आज दुपारी अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत,
हा हल्ला झाला.
नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत असलेल्या,
डीस्ट्रीक्ट
रिझर्व्ह गार्ड -जिल्हा राखीव रक्षक दलाचं वाहन,
नक्षलवाद्यांनी
भूसुरुंगाचा स्फोट करून उडवलं. त्यात दहा सैनिक आणि एक वाहन चालक,
अशा ११ जणांचा
जागीच मृत्यू झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी,
या भ्याड हल्ल्याचा,
तीव्र शब्दात
निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या हल्ल्याची
गंभीर दखल घेत तत्काळ मुख्यमंत्री बघेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नक्षलवाद्यांच्या
विरोधात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही शाह यांनी दिली आहे.
****
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह आज रात्री नागपूर दौऱ्यावर येत आहेत. जामठा परिसरातल्या
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं शाह यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
होणार आहे. शाह यांचा या महिन्याला हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे.
****
आकाशवाणी ही भारतीय जनतेच्या
आत्म्याचा आवाज असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या
शंभराच्या भागानिमित्त प्रसारभारतीनं नवी दिल्लीत आज आज सकाळपासून सुरू असलेल्या 'मनकीबात@हंड्रेड' या राष्ट्रीय परिषदेचा सायंकाळी समारोप झाला, त्यावेळी शाह बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसंवादासाठी आकाशवाणीची
निवड केली, ही आनंदाची बाब असल्याचं अमित शाह यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
लोकतंत्र के
अंदर जनसंवाद के अनेक माध्यम होते हैं।
और मोदीजीने मेरे जैसे व्यक्ती के लिए बहोत आनंद की बात है, की आकाशवाणी को जनसंवाद
के लिए चुना हैं. क्यौंकी मै बचपन से आकाशवाणी का बहोत बडा प्रशसंक रहा हूं. मै हमेशा
मानता हुं के, आकाशवाणी भारत की जनता की आत्मा की आवाज हैं, और ए बात मैं इसलिए कहता हूं की ढेर सारी महत्वपूर्ण
यादे मैने आकाशवाणी पर ही सुनी हैं।
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर, सचिव अपूर्व चंद्रा, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गृहमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमात मन की बात च्या शताब्दीप्रित्यर्थ
१०० रुपये दर्शनी मूल्याचं विशेष नाणं तसंच एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं.
****
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात
महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचं अभिनंदन केलं आहे.
हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश असून आता जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुद्धा सर्वांनी यशस्वी करण्याचं आवाहनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त
शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचं हे यश आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असले तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या
क्रमांकावर आला आहे. २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली होती. यापैकी बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील असल्याचं फडणवीस यांनी
सांगितलं.
****
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत
सुविधांचा विकास महत्त्वाचा असल्याचं, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथंल्या, तापोळा - महाबळेश्वर रस्त्याचं भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या, बामणोली - दरे पुलाचं काम लवकरच सुरू होणार असल्याचंही शिंदे यांनी
सांगितलं.
दरम्यान, महाबळेश्वर, पाचगणी ही गिरिस्थाने
प्लास्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या
आहेत. महाबळेश्वर इथं महाबळेश्वर, पाचगणी आणि
इतर परिसरातील पर्यटन विषयक कामांबाबत त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत
होते. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, वन
विभागाने परवानगी विचारू नये, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाने एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, अशी माहिती, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील
यांनी दिली आहे. मुंबई इथं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज
देण्याची योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला असून वैयक्तिक कर्ज व्याज
परतावा योजनेअंतर्गत असलेली १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून परतफेड
कालावधी ७ वर्षांपर्यंत करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजातील
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असून याबाबतचा शासन
निर्णय निर्गमित होणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
येत्या
सहा मे रोजी पुण्यात आकुर्डी इथं मराठा आरक्षण एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या एल्गार परिषदेच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडणार असल्याचं, मराठा आरक्षण समन्वय
समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी सांगितलं. ते आज पिंपरी इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका जावळे यांनी केली.
प्रामाणिक इच्छा असेल, तर आरक्षण देता येईल, त्यासाठी वेगळा आयोग नेमण्याची गरज नसल्याचं,
जावळे यांनी नमूद केलं.
****
राज्य
सरकार हे लफंग्यांना पाठीशी घालणारं सरकार असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे
खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दौंड इथं साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी कृती
समितीने बोलावलेल्या सभेस जाण्यासाठी पुण्यात आले असता, राऊत पत्रकारांशी बोलत होते.
दौंड कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अहवाल दिला आहे, या प्रकरणी गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस कारवाई करणार की नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. आपल्याला दौंडला
जाता येऊ नये, यासाठी जमावबंदी कलम लावलं, पोलिस बंदोबस्त बोलावल्याची आरोपही राऊत
यांनी केला.
****
सोलापूर जिल्ह्यात ५०० एकर परिसरात वनउद्यान अर्थात
ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा, राज्याचे वन आणि सांस्कृतिक
कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत
होते. या संदर्भात शहर वासियांच्या आणि जिल्ह्यातल्या तज्ञांच्या काही सूचना असतील
तर त्या शासनाला तातडीने कळवाव्यात, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे. पंढरपूर
इथं उभारण्यात येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांचा निधी
खर्च केला असून आणखी २० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी
दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यापर्यंत त्यांची ब्रिटनमध्ये
असलेली भवानी तलवार आणि वाघ नखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
जालना तालुक्यात काही भागात आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. माळशेंद्रा गावात
झालेल्या गारपीटीमुळे कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी, आंबा फळबागांचं नुकसान झालं आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये
सुद्धा मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अनेक
ठिकाणची झाडे उन्मळून पडली असून घरांवरील छपरे
उडाली आहेत. खामगाव तालुक्यातील दिवठाणा, रोहणा, काळेगाव या भागांमध्ये गारपीट होऊन
वादळी वारा झाला असून शेतातील कांदा, आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
****
लातूर जिल्ह्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार उष्णतेची
लाट असू शकते, त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास दुपारी १२ ते ४ या कालावधीत
उन्हात जाणं टाळावं, या दरम्यान अंग मेहनतीची कामं करू नयेत, असं आवाहन
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत
विविध शासकीय विभागांच्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील आरोग्य सेवा, विलासराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उष्माघात विरोधी औषधांसह सर्व सज्जता
ठेवावी, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात सर्व शाळांमधून भारत माझा देश आहे, हा प्रतिज्ञा प्रबोधन उपक्रम
राबवण्यासाठी, सर्व शिक्षकांनी पुढाकार
घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
लक्ष्यवेध फाउंडेशन आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्ह्यातल्या सर्व मुख्याध्यापकांसाठी, नांदेड इथं काल एक
दिवसीय प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते. आपला देश बहुआयामी देश असून, प्रतिज्ञा
हे महाकाव्य आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगून हे अभियान गतिमान करावे,
असं अवाहनही राऊत यांनी केलं.
****
संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून
महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आज विनापरवाना आणलेलं १६
किलो सोनं, परकीय चलन आणि अतिरिक्त भारतीय चलन जप्त केलं. मुंबईच्या छत्रपती शिवाजी
महाराज विमानतळावर हे प्रवासी येणार असल्याची माहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली होती.
हे सोनं तुकडे, दागिन्याच्या स्वरुपात तर काही सोनं प्रवाशांच्या अंगावर पेस्ट स्वरुपात
लपवलेलं होतं. या प्रकरणी १८ सुदानी महिला आणि त्यांचा भारतीय म्होरक्या यांना अधिकाऱ्यांनी
ताब्यात घेतलं असून, त्यांच्या कडून अंदाजे १० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट
रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरु इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment