Friday, 28 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      रेडिओमुळे देश सामूहिक कर्तव्य शक्तीसोबत संलग्न-एफएम ट्रान्समीटर्स लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता.

·      राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण; उद्या मतमोजणी.

आणि

·      छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिवसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस.

****

रेडिओमुळे देश सामूहिक कर्तव्य शक्तीसोबत संलग्न राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशातली १८ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांत शंभर व्हॅट क्षमतेचे ९१ एफएम ट्रान्समीटर्स पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यान्वित झाले, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होत असून रेडिओ कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी, तसंच आकांक्षित जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या ट्रान्समीटर्समुळे, आकाशवाणीच्या एफएम सेवेचा विस्तार होणार असून, अतिरिक्त दोन कोटी लोकांपर्यंत संवाद पोहोचणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर हे लेह इथून या कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. या ट्रान्समीटर्समुळे देशभरात सुमारे ७५ टक्के जनतेपर्यंत आकाशवाणी पोहोचणार असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.

नंदूरबार इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित उपस्थित होत्या.

हिंगोली इथल्या ट्रान्समीटरचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन झालं, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार रामराव वडकुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार पाटील यांनी यावेळी बोलताना, हिंगोली जिल्ह्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

मनापासून या केंद्राला हार्दिक शुभेच्छा देतो यानिमित्तानं. हिंगोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या जनतेचे प्रश्न, त्यांच्या वेदना, अडचणी या केंद्राद्वारे सगळीकडे मांडण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. आमच्या भागातील संस्कृती बंजारा बहुल विभाग आहे, आदिवासी बहुल विभाग आहे. त्यांची सुद्‌धा संस्कृती यानिमित्तानं जगासमोर येईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी तीस एप्रिलला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रम मालिकेचा हा शंभराव्वा भाग असेल. तीन ऑक्टोबर २०१४ पासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी विविध मुद्यांवर संवाद साधला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या शतकपूर्ती निमित्त सांस्कृतिक मंत्रालय उद्यापासून देशभरातल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या स्मारकांसह तेरा प्रमुख ठिकाणी विशेष प्रक्षेपण होणार आहे. यामध्ये मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाचा समावेश आहे.

****

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. तीन जून २०१३ रोजी जिया खान हिचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाने सूरज पांचोली विरोधात लिहिलेल्या सहा पानी पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र न्यायालयानं सूरज पांचोलीची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.

****

महाराष्ट्र राज्य स्थापनेला येत्या एक मे रोजी ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात यावा, असं राजशिष्टाचार विभागानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. राज्याचा मुख्य समारंभ मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसंच विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे संपर्कमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील, असं यात नमूद केलं आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं, यासाठी या दिवशी सकाळी सव्वासात ते नऊ या वेळांत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा समारंभ आयोजित करू नये असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयानं, शहर सौंदर्यीकरण स्पर्धा घोषित केली आहे. शहराचं सौंदर्य राखण्याबरोबरच सार्वजनिक सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनवीन जागा निर्माण करायला स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्थांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटी ब्यूटी कॉम्पिटिशन डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून भाग घेता येईल.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अंतर्गत साठ वर्ष वयावरील नागरिकांसाठी नाकावाटे दिली जाणारी इन्कोव्हॅक ही वर्धक लसमात्रा लवकरच उपलब्ध होणार आहे. प्रत्येक नाकपुडीत ४ थेंब याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ८ थेंब देण्यात येतील. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्या आणि वर्धक मात्रा न घेतलेल्या साठ वर्षावरील नागरिकांना ही वर्धक मात्रा घेता येईल.

धाराशिव जिल्ह्यात, दोन मे पासून ही वर्धक लसमात्रा दिली जाणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

लातूर इथं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथल्या महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रात ही वर्धक लस उपलब्ध असेल.

****

धुळे इथं उद्या धुळे-दादर एक्सप्रेस या नवीन रेल्वेचा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ होणार आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून डॉ भामरे या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार आहे.

दरम्यान, जगन्नाथ पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुणे इथं हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरात धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी ही विशेष सेवा यात्रा सुरू करण्यात आली आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचं दर्शन घडवलं जाणार आहे.

****

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं. आज झालेल्या मतदानात जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीचा, बीड जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांचा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन या बाजार समित्यांचा तर धाराशिव जिल्ह्यातल्या आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. उर्वरित बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे.

 

धाराशिव जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज ९७ % मतदान झालं. आज सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मतमोजणी उद्या होणार आहे.

****

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर, पैठण आणि गंगापूर तालुक्यातील खडक वाघलगाव परिसरात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. छत्रपती संभाजी नगर शहरातही आज वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. शहरात काही रस्त्यांवर झाड उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, शहरात एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ताशी ४२ किलोमीटर नोंदवला गेला तर तेरा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

धाराशिव शहरातही सायंकाळी पाच वाजेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली.

धुळे शहरासह जिल्ह्यात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला असता तरी, शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळं फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील पाच ते सहा मे पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...