Saturday, 29 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 29.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५ पैकी ११ जागा भारतीय जनता पक्ष - शिवसेना शिंदे गटाच्या युतीनं जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त चार जागांवर विजय मिळवता आला. ग्रामपंचायत सर्वसाधरण मधून कैलास उकिरडे, अनुसूचित जाती गटातून महेंद्र खोतकर विजय झाले.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे माजी आमदार गजानन घुगे विजयी झाले.

धाराशिव जिल्ह्यातल्या भूम बाजार समितीत एकूण १८  पैकी ११ जागांवर मंत्री तानाजी सावंत यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

नाशिक जिल्ह्यातल्या पाच बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन पॅनल अकरा तर शेतकरी उत्कर्षला पाच जागा मिळाल्या. देवळा बाजार समितीत भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यात आणि माजी सभापती योगेश आहेर यांच्या युतीमुळे सत्ता पुन्हा अबाधित राहिली. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी सभापती धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला १५, तर मविप्र संचालक रविंद्र देवरे यांच्या परिवर्तन पॅनलला तीन जागा मिळाल्या. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलला १६, तर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या. सिन्नर बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाला नऊ जागा तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याही गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत. फेर मतमोजणीतही निकाल कायम राहिला.

राज्यातल्या उर्वरित बाजार समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे.

****

देशात काल सात हजार १७१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ हजार ६६९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ५१ हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७० शतांश टक्के इतका आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा शंभरावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

नांदेड जिल्हा परिषदेनं यावर्षी ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी गाव स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं. केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी ग्रामीण भागात अंमलबजावणी सुरू आहे. ही मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एक मेपासून सर्व गावांमध्ये कचरा मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. गाव कचरामुक्त करण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी गाव पातळी करण्यात येणार असून, यासंदर्भात ग्रामसभेत आणि मासिक सभेत ग्रामस्थांना माहिती दिली जाणार असल्याचं घुगे यांनी सांगितलं. 

****

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज विभागस्तरावरील खरीप हंगामपूर्व बैठकीचं  आयेाजन करण्यात आलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक डॉ.डी.एल. जाधव यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं वीज ग्राहकांसाठी महावितरण कार्यालयाकडून उद्या लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेली दाखल पूर्व प्रकरणं आणि वीज चोरी संबंधित प्रकरणं तडजोडीसाठी ठेवता येणार असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीत निकाली निघाल्यास वीज चोरीच्या प्रकरणातील रक्कमेवरील मुल्यांकनात पंधरा टक्के पर्यंत सवलत मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय हवामान विभागानं आजपासून एक मे पर्यंत मराठवाड्यात हिंगोलीसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या शक्यतेचा इशारा आणि वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.

****

दुबई इथं सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं बावन्न वर्षांनंतर पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करुन इतिहास रचला आहे. उपान्त्य फेरीत त्यांचा सामना चीनी तैपेईच्याली यांग आणि वांग शिलिन यांच्यासोबत होणार आहे.

****

No comments: