Monday, 24 April 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २४ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातल्या रीवा इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून, सुमारे १७ हजार कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. देशभरातल्या सर्व ग्रामसभा आणि पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींना ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

****

देशाच्या जलशक्ती मंत्रालयानं पहिल्या जलस्रोतांची गणना केली आहे. या गणनेत देशभरातून सुमारे २४ लाख २४ हजारांहून अधिक जलस्रोतांची सर्वसमावेशक यादी देण्यात आली आहे. यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांचा समावेश असून, त्यापैकी २३ लाखांहून अधिक ग्रामीण भागात, तर ६९ हजार जलस्त्रोत शहरी भागांमध्ये आहेत.

****

मुंबईत काल एकोणपन्नासाव्या भारतीय रत्न आणि आभूषणं पुरस्कारांचं वितरण केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झालं. जागतिक बाजारातल्या संधींचा लाभ घेऊन व्यावसायिकांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

जागतिक ग्रंथ दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं काल पुण्याच्या मराठी प्रकाशक यांच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्थाया विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे, यांनी आपले विचार मांडले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण अचूक टिपणारे लेखक मराठीत आहेत, याचा गौरव केला पाहिजे, असं मत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या आदिलाबाद इथून सुटणारी रेल्वेगाडी आदिलाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस, येत्या ३० तारखेपर्यंत दादर पर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे हा निर्णय घेण्यात आला.

****

पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा सुरू आहे. काल झालेल्या सामन्यात पुरुष विभागात भारतीय संघांनं इजिप्तला सहा - चार असं पराभूत केलं. महिला गटात श्रीलंका संघानं फ्रांसवर दोन - एक असा विजय मिळवला.

//***********//

 

No comments: