Tuesday, 3 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं अशक्य-महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राष्ट्रपती उद्या उदगीर दौऱ्यावर

·      जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार

·      विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर-उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखराची ५० मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत धडक

****

महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं शक्य नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी समारोहात त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या

यहां के मुख्यमंत्री ने महिलाओं को आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक विकास के लिये बहेत सारी योजनायें हम लोगों के सामने उल्लेखित की है। महिलाओं के आर्थिक, सामाजिक या शैक्षणिक विकास बिना देश का विकास शायद जितना होना चाहिये वैस नही हो पायेगा। इसलिये इस दिशा मे आगे बढना, उनको सहयोग करना, अभी हम सहयोग कर रहे है, आगू चल के खूद अपने आप चलेंगे, दौडेंगे और उडेंगे और देश की सेवा मे आगे बढेंगे।

 

महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणं, त्यात सुधारणा करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन विकसित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात २०१८ पासूनचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बाळासाहेब थोरत, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, सतीश चव्हाण, दिवंगत विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संजय शिरसाट, प्रशांत बंब, गोपीकिशन बाजोरीया, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, प्रज्ञा सातव, अभिमन्यू पवार, रमेश बोरणारे, राम सातपुते, आदी मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं.

 

दरम्यान, आज सकाळी पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण गरज त्यांनी व्यक्त केली. दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या ११ जणांपैकी ८ विद्यार्थिनी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात उद्या लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.

****

ई गव्हर्नन्समुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात बोलत होते. विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरणअशी या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेला देशभरातील प्रतिनिधी, विविध राज्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. ई गव्हर्नन्स प्रणाली राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून याकरिता माहिती तंत्रज्ञान धोरण राबवलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी विविध सात कंपन्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख चौदाहजार कोटीं रुपयांची गुंतवणूक आणि ७२ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बिजापूरच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात आज सकाळी झालेल्या चकमकीत ९ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

****

महिला आणि बालकांवरच्या लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, पश्चिम बंगाल विधानसभेनं अपराजिता-महिला आणि मुले विधेयक २०२४मंजूर केलं. अशा प्रकरणाचा तपास ३६ दिवसात पूर्ण करून, गुन्हेगाराला १० दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यासाठीचं रेल्वे मंत्रालयानं ना हरकत पत्र दिलं आहे. या नावाचे देशभरात कोणतेही रेल्वेस्थानक नसल्याचंही मंत्रालयानं या पत्रात नमूद केलं आहे. नामांतराची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते, रेल्वे मंत्रालयाच्या या पत्रामुळे अहमदनगरच्या नामांतरचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत बसच्या ३८५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या, सांगलीतही बहुतांश कर्मचारी आणि कामगार आंदोलनात सहभागी झाले. सातारा जिल्ह्यातील विविध आगारातही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बस सेवा ठप्प झाली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये बससेवा ठप्प आहे. बुलडाणा जिल्ह्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, सकाळी काही आगारातून बस धावल्या, मात्र दुपारनंतर काही आगारामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा ५० मीटर रायफल प्रकारात अंतिम फेरीत पोहचली आहे, आज सायंकाळी साडे सात वाजता तिचा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे.

तीरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत पूजाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अंतिम आठमध्ये आज रात्री तिचा सामना चीनच्या वू चुनयानशी होईल. पदकतालिकेत भारत ३ सुवर्ण पदकांसह १५ पदकं मिळवतं सध्या १५ व्या स्थानावर आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातल्या रेणापूर इथं आज सुधा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण वाहून गेले. अन्य एक जण पोहत असतांना गाळात रुतल्याने त्याला काढण्याच्या प्रयत्नात नदीत उतरलेले भरत मुळेकर आणि यश भगत हे दोघे वाहून गेले, त्या दोघांचा शोध घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी यावेळी दिलं.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये झालेल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यातल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली. दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणारं घाणेवाडी जलाशय १२ फूट इतकं भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

भोकरदन तालुक्यात शेलूद इथलं धामणा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं, पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातल्या २५ गावांचा पाणीप्रश्न मिटला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात अनेक जलप्रकल्प भरले आहेत, यामध्ये मासोळी धरण शंभर टक्के, लोअर दुधना ६२ तर येलदरी धरण ५३ टक्के भरलं आहे. आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांशी संवाद साधला.

दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या जिंतूर, सोनपेठ, मानवत, पालम तसंच सेलू तालुक्यातल्या अनेक गावांशी आज सकाळपर्यंत संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला नव्हता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...