Thursday, 5 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला-उदगीरच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन- आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण

·      एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ-राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे तीन पर्याय-संप मागे

·      अतिवृष्टीग्रस्त भागात पंचमाने न करता नियमानुसार आर्थिक मदतीची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल दोन सुवर्णपदकांची कमाई-सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्यपदक

****

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलतांना राष्ट्रपतींनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु राज्यात सुरू असलेल्या महिला आर्थिक विकासाच्या योजनांचं कौतुक केलं. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून, महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या...

‘‘प्रायः मातायें और बहनें परिवार के स्वास्थ का ध्यान तो देती है, लेकिन अपने भोजन और स्वास्थ का ध्यान नही रखती है। मै सभी बहनों से कहना चाहती हूं, की आप लोग अपने स्वास्थ पर भी ध्यान दें। बच्चों और परिवार की देखभाल करने मे अपने स्वास्थ को अनदेखा नही करना है। आपको आपने और आपके परिवार के भविष्य के लिये भी अपने स्वास्थ का ध्यान रखना होगा।’’

राजमाता जिजाबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या महान स्त्रियांचा महाराष्ट्राला वारसा लाभला आहे, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन महिला निरंतर वाटचाल करत राहतील, आणि देशाची विकासगाथा लिहितील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकारने २५ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दीष्ट ठेवलं, त्यापैकी १३ लाख महिला लखपती दिदी झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होते.

उदगीर इथं उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. तणावपूर्ण जीवनात ध्यानधारणेचं महत्त्व अनन्यसाधारण असून, या बुद्ध विहारात उभारलेल्या ध्यान कक्षाबद्दल त्यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं.

सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपतींनी नांदेड इथं तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट दिली. यावेळी झालेल्या विशेष प्रार्थनेतही त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर आपला तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून नांदेड विमानतळावरुन राष्ट्रपतींनी दिल्लीकडे प्रयाण केलं.

****

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. देशभरातल्या ८२ शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील. दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या आवारातलं अमृत उद्यान आज सर्व शिक्षकांसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातल्या उपक्रमशील आणि आदर्श १२८ शाळांचा आज सन्मान करण्यात येणार आहे.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ईपीएफओद्वारे देण्यात येणारी पेन्शन येत्या जानेवारीपासून देशभरातल्या कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून मिळणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही घोषणा केली. ईपीएफओच्या ७८ लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.

****

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, या निर्णयानंतर, एसटी कर्मचारी कृती संघटनेने आपला संप मागे घेतल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करता येणार आहे. काल मुंबईत राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत नियोजित संप संस्थगित करण्याची घोषणा केली.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनाप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी काल अटक केली. जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून तो फरार होता.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे तत्काळ करण्यात येतील, तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून, त्यांना योग्य ती मदत त्वरीत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतीपिकाच्या नुकसानाचे पंचमाने न करता, अतिवृष्टीच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही घोषना केल्याचं आमचे वार्ताहरने कळवलं आहे.

दरम्यान, परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बैठक घेत, नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. परभणी जिल्ह्यातही पिकांच्या नुकसानाची मुंडे यांनी काल पाहणी केली.

**

दरम्यान, जे शेतकरी पीकविमाची तक्रार ऑनलाईन दाखल करू शकले नाहीत, त्यांनी ऑफलाईन तक्रार किंवा नोंदणी करावी, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. सैन्य दलाच्या तुकडीने ३० गावातल्या अनेक पूरग्रस्त नागरिकांचे जीव वाचवल्याबद्दल गावडे यांनी या तुकडीचा सत्कार केला.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ करावे अशा सूचना, जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांनी काल दुरदृष्यप्रणालीद्वारे यासंदर्भात आढावा बैठक घेतली.

**

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची काल छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पाहणी केली. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरगाव पूल इथं त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

**

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २८५ गावातल्या सहा हजार ५४० शेतकऱ्यांचं सहा हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं तर बीड जिल्ह्यात ६११ गावांत दोन लाख ३ हजार ४१५ हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसानं झालं आहे.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. तिरंदाजी मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंहने सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला तीरंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्लब थ्रो एफ - 51 प्रकारात धर्मवीर याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत प्रणव सुरमानं रौप्य पदक जिंकलं.

गोळाफेक एफ 46 प्रकारात सचिन खिलारीनं रौप्यपदकाची कमाई केली. सचिन हा सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्याने १६ पूर्णांक ३२ मीटर अंतरावर गोळा फेकत रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि दहा कांस्य पदकं, अशी एकूण २४ पदकं जिंकली आहेत. भारत पदक तालिकेत १३व्या स्थानावर आहे.

****

धाराशिव इथं प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यात १०१ ठिकाणी लसीकरण सत्र राबवण्यात आलं, यामध्ये एक हजार ३५८ लाभार्थ्यांनी लस घेतली. ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना ही लस देण्यात येत असून, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे इतर लोक, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, त्यांच्या सहवासातल्या व्यक्ती, कुपोषित, मधुमेही आणि धूम्रपान करणारे, अशा व्यक्तींना त्यांची संमती घेऊन लस देण्यात येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही लस घेवून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केलं आहे.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढच्या टप्प्यात पाच लाख उद्योजक घडवणार असल्याचं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळ कर्जमेळावा आणि उद्योजकीय प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर जिल्ह्यात १० हजार उद्योजक तयार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजातल्या तरुणांनी व्यवसायाचं अर्थकारण समजून घेवून अर्थकारणात प्रगती करावी असं ते यावेळी म्हणाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...