Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September
2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक
गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्यानव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य
असून तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं
फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महान
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेल उत्सव 2024 चं आयोजन केलं होतं. यात विविध
मंत्रालयातील दोनशेपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध
स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि जपान यांच्यातल्या डिजीटल संबंधाना बळकट करण्यासाठी
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे मंत्री
तारो कोनो यांच्यासोबत बैठक घेतली. भविष्यात होऊ घातलेल्या तांत्रिक विकासाच्या मुद्यावर डिजीटल
क्षेत्रात उभय राष्ट्रात मदत कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यात वैष्णव यांनी जपानच्या रेल्वे तसंच दळणवळण मंत्र्यांशी
चर्चा करत रेल्वे, पर्यटन आणि परिवहन क्षेत्रातल्या
मुद्यांवर भर दिला आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू
कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता
लष्कर तैनात करण्यात आलं आहे. राज्य
सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना
हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही
तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. शहरातल्या गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून
कोणती तत्कालिक व्यवस्था करण्यात आली, याबाबतची माहिती महाजन यांनी घेतली.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या
मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची
माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री
रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत
बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या ठिकाणी पर्यायी मार्गांचं काम
करण्यात आलं आहे, जेणेकरुन पर्यायी
मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल, असं चव्हाण म्हणाले.
कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी
करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, रायगड- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या
दिशेने येणाऱ्या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त
अनेक चाकरमानी आपल्या गावाकडं जात आहेत. मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी
झाल्यानं अनेक जण पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून
विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, असं प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे
सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या श्री शारदा भवन अध्यापक
महाविद्यालयात काल शिक्षक दिनानिमित्त
झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून
पुस्तकांकडे वळवण्याचं आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचही वाघमारे म्हणाले.
****
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव - २०२३
अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठीच्या पारितोषिकांचं काल वितरण
करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जिल्ह्यातल्या छत्तीस उत्कृष्ट आणि वीस
उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ज भारतीय खेळाडू
ऍथलेटीक्समध्ये पदकांसाठी खेळणार आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
दीपेश कुमार खेळणार आहे. तर, उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमार, भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामनी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉट पूट
एफ-५७ प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी मैदानात उतरतील.
****
No comments:
Post a Comment