Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज
गुजरातच्या सूरत इथं, जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान
दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या
अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक
सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, ब्रूनेई आणि सिंगापूर देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेन संकटावर
भारत, ब्राझील आणि चीन मध्यस्थाच्या
रुपाने तोडगा काढू शकतात, असं म्हटलं आहे. पुतीन ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या सत्राला संबोधित करत होते.
युक्रेन मुद्यावर रशिया भारत, ब्राझील आणि चीनच्या संपर्कात असल्याचं पुतीन यानीं म्हटलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या कपिल परमारने काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या स्पर्धेत
ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला १०-० ने पराभूत करून कांस्यपदक जिंकलं आहे.
ज्युदोमध्ये भारताचं हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी कपिल परमारचं ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केलं आहे. कपिलने अनेक अडथळ्यांवर
मात केली असून, पॅरालिम्पिकमध्ये
ज्युडो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे, असं राष्टपती द्रोपदी मुर्मू
यांनी सामाजिक माध्यमाच्या एका संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही कपिलचं अभिनंदन केलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी इथल्या
जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यातून
प्रथम क्रमांक मिळवत ११ लाख रुपयांचे बक्षीस पटकावलं आहे. तसच ही शाळा अमरावती
विभागातून उत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम ठरली आहे. बोर्डी इथं इयत्ता पहिली ते सातवी
पर्यंतचे वर्ग भरतात. शालेय परसबाग, शाळेतील पर्यावरण पूरक वृक्ष, शाळेत राबवण्यात आलेले विविध संस्कृतीक उपक्रम, तसच विद्यार्थ्यांना
आर्थिक साक्षरतेसाठी धडे देण्यात येतात.
****
केंद्र सरकारनं आजपासून ३५ रुपये किलो अनुदानित
दरानं कांद्याची विक्री सुरु केली आहे. दिल्ली इथं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय
भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रावर ही विक्री
केली जात आहे, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला असून
या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे
बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष
त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं
आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण
साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते.
****
आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या
वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी
विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे. आदिवासी विकास महामंडळाची 51वी वार्षिक
सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. त्यावेळी ते दूरस्थ माध्यमातून बोलत
होते.
****
राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी
मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस
कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल
स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर
आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment