Sunday, 24 November 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय-भाजप १३२, शिवसेना ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा

·      महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३९ तर महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा

·      नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी

आणि

·      बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर

****

राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने १३२, शिवसनेनं ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसने १६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्यशक्ती पक्षानं प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम., मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहु विकास आघाडी यांचा समावेश आहे.

****

या विजयातून महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे...

आज नेगेटिव पॉलिटिक्स की पराजय हुई है। परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है। मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ।

हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले...

लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.

****

मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेने पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा...

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तटकरे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, दिलीप वळसे पाटील, आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. 

****

अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.

****

काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.

****

****

राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, अदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नितेश राणे यांचा समावेश आहे.

****

जळगाव जिल्ह्यात सर्व ११ तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, नाशिकमधल्या १५ पैकी १४, तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

अहिल्यानगर जिल्ह्यात १२ जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत 

****

मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पोवळे, देविदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा...

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.

****

बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले. 

****

परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.

****

लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा- भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमितदेशमुख विजयी झाले

****

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी विजयी झाले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.

****

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं ३४ तर काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं २० जागा जिंकल्या.

केरळ मधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार ९३१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

****

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉक्टर संतुक हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला.वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिस-या स्थानी राहिले.

****

क्रिकेट

बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यात,यशस्वी जैस्वालच्या नव्वद तर, के एल राहुलच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. त्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला १०४ धावांवर आटोपला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

****

 

No comments: