Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
November 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता
१२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १
नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये
मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी
आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात
आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी
होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही
मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे
माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९
वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू
पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी
सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व
होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी
ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या
शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि
मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या
नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक
गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या
दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले
माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा
म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता
पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर
सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं
प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू
दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे.
विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे
नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता
परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर
करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात
देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ.
विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या
तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे
स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं
वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने
या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या
अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं
वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी
जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या
मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी
मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
No comments:
Post a Comment