Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 November 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०१ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लक्ष्मीपूजनानिमित्त आज सर्वत्र
उत्साह-फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळी साजरी.
· नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वं जारी.
· रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवे नियम लागू-प्रवासाच्या ६० दिवस आधी आरक्षण करता
येणार.
· सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा सीना नदीत बुडून
मृत्यू.
आणि
· न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारत १४९ धावांनी
पिछाडीवर.
****
दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण आज साजरा होत
आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी
नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी
आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं आज
फुलून गेल्या होत्या. आत्ता सायंकाळी घरोघरी पारंपरिक
पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जात असून, हौशी नागरिक, विशेषत: युवा वर्ग आणि लहान मुलं फटाके फोडण्यात गुंग आहेत. मंद तेवणाऱ्या
पणत्यांसह,
विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना
तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य
आतिषबाजीने आसमंत उजळून गेला आहे.
****
मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज
लक्ष्मीपूजना निमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नव वर्ष विक्रम संवत २०८१
च्या प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होत आहेत. आजच्या दिवशी सायंकाळी सहा
वाजेपर्यंत आरंभपूर्व सौदे करण्याचा तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुहूर्ताचे सौदे
करण्याचा प्रघात आहे.
****
नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारने
मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार
प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे. या समितीमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, आणि खतं तसंच रसायन विभागाच्या सचिवांचा समावेश असेल, असं
सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२
रुपयांनी वाढ झाली. आजपासून हे नवे दर लागू झाले. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF
च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. घरगुती
गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आजपर्यंत
एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी
निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने
ही माहिती दिली. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या
कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली
आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी
आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा
होणार असून त्यातली पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले
विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील ६ नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर
येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेस
पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर
यांनी,
आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून
उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं
त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी
माध्यमांना सांगितलं.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊ पैकी तीन विधानसभा
क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा
अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये
सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी
दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत
मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं
आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या
निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात
वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नांदेड
जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले. आता
रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे.
मात्र,
३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती
रेल्वेनं दिली आहे. विदेशी पर्यटकांना
रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, म्हणजेच १ वर्ष आधी आरक्षित
करावी लागतात. यात मात्र काहीही बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण
प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी
होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती
करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या
प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे लाच लुचपत
प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे.
लाच
लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक
२८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी
कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर
यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा
कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल
तर तात्काळ संपर्क करावा.
****
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा
नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथं जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून
आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण आज दुपारी अंघोळीसाठी
खैराव इथं सीना नदीवर गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने
चौघांचा बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच, माढा
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे.
मुंबईत वानखेडे मैदानावर आज सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं
पाच,
वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. आज
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात
खेळणाऱ्या भारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ
पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून
न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी
हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे.
२०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं
होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद
पटकावलं आहे.
****
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा
प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं वंचितांना दिवाळी
फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या
नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांना वाटप
करण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने आज
दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले
केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त
प्रवीण पवार यांनी आज दिवाळी साजरी केली.
****
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती
संख्या पाहता,
मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा,
तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला
आहे. उद्या आणि परवा या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment