Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 November
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
दिवाळीचा सण देशभर उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. आज अश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल. या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्याची दुकानं सजली आहेत. रोषणाईच्या विविध प्रकारच्या माळा आणि दिवे, तसंच कृत्रिम फुलांची तोरणं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ दिसून येत आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध
राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार असून, त्यातली
पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होत आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधीदेखील ६ नोव्हेंबर
रोजी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित
कार्यक्रमांना हजेरी लावतील, असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मध्य रेल्वेतर्फे सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त २८ ऑक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत दक्षता
जागरूकता सप्ताह पाळण्यात येत आहे. "राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची
संस्कृती" ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहात चर्चासत्र, ‘मस्त कलंदर’ हा लघुपट, ‘सुबोध’ या विशेष वृत्त बुलेटिनचे अनावरण, तसंच वादविवाद, निबंध, रेखाचित्रे, घोषवाक्य, स्किट्स
आणि लघुपट यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
विविध राज्यं, तसंच
केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि
केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं
प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या
क्षेत्रात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी १
फेब्रुवारीपासून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पुरस्कार देण्याची सुरुवात झाली आहे.
दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर
रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊपैकी तीन विधानसभा क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार, तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी, तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रशिक्षणादरम्यान गैरहजर असलेल्या २०१ कर्मचाऱ्यांपैकी खुलासा सादर न करणाऱ्या ८२ जणांवर
तात्काळ गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे निवडणूक
निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत. आजपर्यंत २४ मतदान
केंद्राध्यक्ष, ३२ प्रथम मतदान अधिकारी आणि ६३ इतर मतदान अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे.
****
कोल्हापूर उत्तर विधानसभा
मतदारसंघातल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आणि उद्योजक
सत्यजित जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली
आहे.
****
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात काल दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३२४ दखलपात्र तक्रारींमधून ३०६ तक्रारींचं १०० मिनिटांच्या आत निराकरण करण्यात आलं असून, उर्वरित तक्रारींचंही निराकरण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान काही अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाच्या घटना आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून १०० मिनिटांच्या आत तक्रारीचं निवारण केलं जातं.
****
भारत आणि न्यूझीलंड
यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना
आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं, तोपर्यंत न्यूझीलंडच्या २ बाद ५९ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने
या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****s
No comments:
Post a Comment