Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
स्विझर्लंडमधल्या दावोस इथं आजपासून
जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला सुरुवात होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री
अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व
करत आहे. बुद्धिमान युगासाठी सहकार्य या संकल्पनेखाली दावोस गुंतवणूक परिषद होत असून, या परिषदेत ६५ हून अधिक भारतीय व्यावसायिक
देखील सहभागी झाले आहेत. २४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत भारताची उल्लेखनीय
प्रगती तसंच भारताचं विकासाचं मॉडेल त्याचबरोबर समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनासाठी
भारताचा दृष्टिकोन भारतीय शिष्टमंडळ अधोरेखित करेल. या परिषदेत सहभागी होऊन,
भागीदारी मजबूत करणं, गुंतवणूक आकर्षित करणं,
तसंच शाश्वत विकास आणि तंत्रविषयक नवोन्मेशामध्ये अग्रगण्य देश म्हणून,
आपली प्रतिमा जगासमोर आणण्याचा भारताचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याच्या
दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, तसंच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडकोच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ या परिषदेत
सहभागी झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना
आकर्षित करण्याच्या दृष्टीनं भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं असून,
मुख्यमंत्री अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. डेटा सेंटर्स,
सेमिकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, अन्नप्रक्रिया,
वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी
क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौत अपेक्षित आहेत. या परिषदेदरम्यान,
राज्यात मोठी गुंतवणूक येईल, असा विश्वास,
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात
लाखो भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावं यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक
प्राधिकरणाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, फिरती अन्न चाचणी प्रयोगशाळा आणि जागरूकता मोहिमा
सुरु केली आहेत. या माध्यमातून, प्राधिकरण महाकुंभ मेळ्यादरम्यान
अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आघाडीवर आहे.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ७० जागांसाठी ७१९ उमेदवार निवडणूक रिंगणात
आहेत. एक हजर ५२२ अर्जांपैकी ४७७ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी
दिली. निवडणुकीच्या प्रचाराला ही वेग आला असून, सर्व पक्षांकडून ताकदीनिशी प्रचार सुरु आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
****
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा
नऊ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी
होता यावं यासाठी या दिवशी सकाळी साडे आठ ते दहा या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर
कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असं राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात
आलं आहे. मुंबई इथल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत दादर इथल्या शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण सोहळा आणि समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम
होईल. प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
****
नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेनं
‘जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट
लिमिटेड’ या कंपनीसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या कराराचा
उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून ज्ञानाची देवाण-घेवाण
करणं हा असल्याचं संस्थेचे प्राचार्य डॉ. एन एल. जानराव यांनी सांगितलं. या करारामुळे
उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातली तफावत कमी होऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची
मोठी संधी निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी
कंपनीमार्फत विद्युत अभियांत्रीकी विभागाला ट्रान्सड्यूसर प्रदान करण्यात आले. या उपकरणांच्या
सहाय्याने संस्थेत एक अद्ययावत प्रयोगशाळा तयार केली जाणार आहे.
****
नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक
अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतल्या
खेळाडू तसंच संघ प्रशिक्षकांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष
अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला
संघाचं नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलं.
****
बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या
जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत
परवा २१ तारखेला २०२४-२५ या वर्षी शालेय स्पर्धेत खेळलेले राष्ट्रीय आणि एकविध क्रीडा
संघटनेमार्फत आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गुणगौरव आणि सत्कार करण्यात येणार आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य
संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी बीड केंद्रावर
येत्या २३ ते २५ जानेवारी दरम्यान होणार आहे. या फेरीत एकूण १७ बालनाट्य होणार आहेत.
या बालनाटकांना रसिक प्रेक्षकांनी आणि शाळेतल्या मुलांनी उपस्थित राहून प्रोत्साहन
द्यावं, असं
आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment