Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· संविधानातील मूल्यांच्या आधारे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं लोकसभाध्यक्ष
ओम बिर्ला यांचं पीठासीन अधिकाऱ्यांना आवाहन
· प्रशासकीय इमारत तसंच नियोजन भवनाची कामं, टिकाऊ आणि दर्जेदार करण्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
· छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा
आणि
· सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीकडून विविध
उपक्रमांचं आयोजन
****
संविधानानं घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे
नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं
आहे, बिहारमध्ये पाटणा इथं ८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात
ते आज बोलत होते. विधीमंडळांचं पावित्र्य जपण्याकडे लक्ष देण्याचं सांगतानाच, विधीमंडळाच्या
माध्यमातून देशवासियांची सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर असल्याचं
बिर्ला यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
नये
संकल्पों के साथ, नये विचारों के साथ, देश के लोकतांत्रिक संस्थाओं को सशक्त मजबुत
करते हुये, देश के 140 करोड लोगों को इस लोकतांत्रिक संस्थांओं के माध्यम से उनके आकांक्षा
पुरी हो यह सारी जिम्मेदारी पीठासीन अधिकारी के रूप मे हमारी है।
संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्ष होत असताना
संसद आणि राज्य विधीमंडळांचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान या अनुषंगाने या संमेलनात
विशेष चर्चा होणार आहे.
लोकसभा तसंच राज्यसभेतले पीठासीन अधिकारी, महाराष्ट्र
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह देशाच्या विविध भागातून आलेले विधीमंडळांचे
अध्यक्ष आणि इतर अधिकारी यात सहभागी झाले आहेत. अशा संमेलनातूनच संसदीय लोकशाही अधिक
बळकट करण्याचं पाठबळ प्राप्त होत असल्याचं मत, नार्वेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना
व्यक्त केलं. ते म्हणाले –
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८५व्या या संमेलनात सहभाग घेताना मला अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत प्रभावशालीरित्या, सुंदर असा हा कार्यक्रम बिहार विधानसभा अध्यक्ष आणि बिहारचे विधान परिषदेचे सभापती
जे आहेत,
त्यांनी आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद
देतो. या संमेलनात भाग घेणाऱ्या सर्व पीठासीन अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो.
अशा संमेलनातूनच संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचं अधिक पाठबळ हे पीठासीन अधिकाऱ्यांना
प्राप्त होतं, त्याबद्दल सर्वांना मनापासून
शुभेच्छा.
****
कोलकाता इथल्या आर जी कार रुग्णालयातल्या
महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला दोषी संजय रॉय याला सियालदाहमधल्या
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबाला १७ लाख
रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही घटना
घडली होती.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला
आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीबाबत न्यायालयीन चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर
आज सादर करण्यात आला. अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचं, या
अहवालात म्हटलं आहे. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा
वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत, तसंच
पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचं, या
अहवालात म्हटलं आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या या चकमकीत अक्षय ठार झाला होता.
****
प्रशासकीय इमारत तसंच नियोजन भवनाची कामं, टिकाऊ
आणि दर्जेदार करावीत,
या कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे
निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज जालना इथं प्रशासकीय इमारत
तसंच नव्याने उभारण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या पाहणी प्रसंगी बोलत होते. जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कामाबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. सदर काम
पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीसह कार्यालय आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सूचना
उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
****
मुंबई महानगर क्षेत्रात बेकायदा वास्तव्य
करणाऱ्या २५ पेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर
आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सैफ अली खान
यांच्यावर हल्ल्यातला आरोपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समोर आल्यानंतर, ही
कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस
उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. त्यासाठी बांधकामांची ठिकाणं आणि मजूर वस्तीत शोधमोहीम
राबवली जाणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही
बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवली जाणार असल्याचा इशारा, पालकमंत्री
संजय शिरसाट यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी
आज सिल्लोड इथले उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घूसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी
विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार
असल्याचं शिरसाट म्हणाले –
पोलीस,
कलेक्टर आणि ग्रामीण एस पी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर
टू डोअर जाऊन या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती घेणार आहोत. आधार कार्ड बनवणारी, इलेक्शन
कार्ड देणारी सुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये बांगलादेशी
घुसखोर आहेत, त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत. आणि एकही बांगलादेशी
या शहरामध्ये राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.
****
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा
नऊ वाजता होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी साडे आठ ते दहा या दरम्यान ध्वजारोहणासह
इतर कोणताही समारंभ आयोजित करू नये, असं राजशिष्टाचार विभागामार्फत
कळवण्यात आलं आहे. राज्य सरकारचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क
इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट
यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, बीड
- दत्तात्रय भरणे,
नांदेड- अतुल सावे, लातूर- शिवेंद्रसिंहराजे भोसले, परभणी-
मेघना साकोरे बोर्डीकर,
हिंगोली- नरहरी झिरवाळ, तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्या
स्थापनेची ५० वर्ष पूर्ण करत आहे, या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने पर्यटकांना
आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज छत्रपती संभाजीनगर
इथे महामंडळाच्या कार्यालयासमोर रंगीत रांगोळी काढून दीप प्रज्वलन करून विविध उपक्रमाचा
प्रारंभ करण्यात आला. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी याबाबत अधिक
माहिती दिली –
सांस्कृतिक, ऐतिहासिक, ध्यार्मिक स्थांचे संवर्धन आणि प्रचार प्रसार महामंडळाने केला आहे. सुर्वणमहोत्सवी
वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम, विशेष
कार्यक्रम,
प्रदर्शन आणि पर्यटकांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. स्थानिक समृदाया सोबत भागीदारीतून पर्यटन
विकास यांचा समावेश आहे.
****
समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा
खरा उद्देश असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. अहिल्यानगर
जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात सहजानंदनगर इथं नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी
दूध उत्पादक संघाच्या कार्यक्रमात बागडे बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यावेळी उपस्थित होते, या दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त
विविध प्रकल्पांची आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन घरकुलांच्या बांधकामांची पायाभरणी, तसंच
विविध प्रकल्पांचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
भेसळमुक्त दूध उत्पादन ही काळाची गरज असून
त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राज्याच्या
पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आज नागपुरात महाराष्ट्र
पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘वर्ल्ड ॲनिमल न्यूट्रिशन
कॉन्फरन्स- वॅन्कॉन’च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण
हा राजकारणाचा नव्हे तर संवेदनशीलतेनं हाताळण्याचा विषय असल्याचं, मुंडे
यांनी म्हटलं आहे –
एखादा
पाशवी अत्याचार, निर्घृण हत्या ही समाजावर लागलेला कलंक आहे. आणि तो कलंक पुसण्यासाठी
सर्व लोकं त्या त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याबद्दल तेवढं दायित्व नक्कीच
आमच्या सर्वांचं आहे. आणि त्याविषयी संवेदनशीलता बाळगणं हे देखील आमचं दायित्व आहे.
****
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची
हत्या तसंच परभणी इथले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या
निषेधार्थ अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी
आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या २५ जानेवारीला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन मतदार जनजागृती करावी
असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मतदारांना शपथ, मतदार ओळख पत्रांचं वाटप, तसंच
शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन करावं, जनजागृती
प्रक्रियेशी निगडीत सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात यावं, असेही
स्वामी यांनी सांगितलं आहे.
****
श्रमसंस्कृती ही भारताच्या विकासाचे मूळ
स्त्रोत आहे,
श्रम संस्कृतीचा सन्मान झाला पाहिजे असं मत स्वच्छतादूत माधवराव
पाटील शेळगावकर यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील मौजे कृष्णापुर इथं नारायणराव
वाघमारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत
होते.
****
No comments:
Post a Comment