Monday, 20 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 January 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन 

स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये आजपासून होणार विविध क्षेत्रासंबंधी सामंजस्य करार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करुन देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन

पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद 

आणि

दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

****

संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रम मालिकेच्या ११८ व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने, संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं...

‘‘जब संविधान सभा ने अपना काम शुरू किया, तो बाबासाहब आंबेडकर ने परस्पर सहयोग को लेकर एक बहुत महत्वपूर्ण बात कही थी | 

“Our difficulty as I said is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today, take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.”

ये audio डॉ. राजेंद्र प्रसाद जी का है -

“हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है| अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे |”

  अब मै आपको डॉ. श्याम प्रसाद मुखरजी की आवाज सुनाता हूं| ’’


येत्या २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा पराक्रम दिवस, २५ जानेवारीला साजरा होणारा राष्ट्रीय मतदार दिन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचा अंतराळात दोन उपग्रह परस्परांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान `स्टार्ट-अप` कंपनीकडून देशातल्या पहिला खाजगी उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण, स्टार्टअप उपक्रमाची यशस्वी वाटचाल, वन्यजीव संवर्धन, आदी विषयांवर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. महिला बचत गटांच्या प्रेरणादायी यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना ऐकवल्या.

यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करुन, हा कुंभमेळा डिजीटल माध्यमांतून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असल्याचा, प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंच २०२५ ला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार असून, ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस इथं दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. 

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस्य त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल्याचा दिनांक, समाप्ती दिनांक आदी तपशील कुठल्याही कागदपत्रांशिवाय अपलोड करू शकतात. या सुविधेचा लाभ तीन लाख ९० हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी धारकांना होणार असल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे.

****

राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

‘‘या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकं येतात. जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाडा लगतच्या जिल्ह्यांतील गरीब माणसं इथं येतात. त्यांना बाहेरच्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात पैसा देणं परवडत नाही. त्यांचीसुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं अतिशय आवश्यक आहे. खाजगी दवाखान्यामध्ये तिकडे लोकांचा कल जास्त असतो पैसे भरायचा. पण मी म्हणतो आपण शासकीय रूग्णालयांमध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिवर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून माझं हे स्वप्न आहे की अशा शासकीय महाविद्यालयांमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय मी राहणार नाही.’’


जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व सुविधांचा विकास करणं ही जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार, अशी घोषणा शिरसाट यांनी केली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने आणि डॉक्टर झोयेक शेख यांच्या गटानं केलेल्या संशोधनाला, अमेरिकेचं पेटंट प्राप्त झालं आहे. या संशोधनाद्वारे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थांची निर्मिती करुन त्याचा वापर हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी करता येत असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. या यशाबद्दल डॉ. माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अभिनंदन केलं आहे.

****

पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८ विरुद्ध ४० असा, तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचाच ५४ विरुद्ध ३६ असा पराभव केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होते. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालकधनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांना काल प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरुपाचा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना डॉ कांगो म्हणाले..

‘‘माझा सत्कार हा माझा व्यक्तीश: सत्कार नसून, माझं सतत म्हणणं आहे की माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होऊन गेले, त्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, अनेक कार्यकर्ते आहेत जे अजुनही माझ्याबरोबर काम करत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळेच मी काहीतरी करु शकलो. आणि म्हणून त्यांचाही हा सत्कार आहे.’’

****

बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ काल सकाळी एसटी बसच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारे युवक दिसले नाहीत, असं चालकाचं म्हणणं आहे.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणी इथं कोठडीत निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच अंमलबजावणी महाशिबीर घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं.

****

हिंगोली इथल्या बौद्ध संस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं उद्घाटन काल प्रसिद्ध व्याख्याते डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. चळवळीच्या पुनर्मांडणीची गरज-अर्थात चळवळी बांधारे, या विषयावर बोलताना कांबळे यांनी, समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन लढे उभे केल्यास चळवळ उभी राहील, असं मत व्यक्त केलं.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दगावलेले कावळे 'एव्हीयन इन्फल्युएन्झा एच 5 एन 1' विषाणुजन्य रोगामुळं मृत झाल्याचं, तपासणीत आढळलं आहे. यामुळं उदगीर शहरातला संबंधित परिसर हा अलर्ट झोन - सावधानता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातल्या कोंबड्यांच्या सर्वेक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...