Monday, 20 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

जागतिक आर्थिक मंचाची ५५वी वार्षिक बैठक आज स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरु होत आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात समावेशक विकास आणि डिजिटल क्रांतीच्या भारतीय मॉडेलविषयी विशेष चर्चा केली जाईल, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, जलशक्ती मंत्री सी आर पाटील, नागरी विमान वहातूक मंत्री के राम मोहन नायडू हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारताच्या प्रभावी आर्थिक विकास दराने प्रमुख क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय विकासासह, संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि देशाला जागतिक स्तरावर एक अग्रगण्य स्थान मिळाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं तसंच विविध संस्थांच्या वतीने त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत, मराठी गौरवगीत सादर केलं. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मराठी बंधू-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.

****

समाजातल्या प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचं सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने, पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने आयोजित पर्पल जल्‍लोष कार्यक्रमाचा समारोप राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

महाराष्ट्राचा विकास हेच आपलं ध्येय असून, त्यापासून तसूभरही मागं हटायचं नाही, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शिर्डी इथं पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या समारोप सत्रात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे, हे कृतीतून दिसावं, हा पक्ष नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा आहे, हे ठसवण्यासाठी काम करा, असा सल्लाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

****

रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये ५८६ बांगलादेशी नागरिक आणि ३१८ रोहिंग्यांना पकडलं आहे. आसाममधून भारतात बेकायदा पद्धतीनं येणारे बहुतांश लोक रेल्वेने देशाच्या इतर भागात जातात. हे थांबवण्यासाठी सीमासुरक्षा दल, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर पथकांच्या मदतीनं रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.

****

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी या दिवशी सकाळी साडे आठ ते दहा या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असं राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. मुंबई इथल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादर इथल्या शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण सोहळा आणि समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

****

भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांचं संवर्धन करत राष्ट्रीय एकतेच्या पुनर्स्थापनेचं कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं, असं प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी नुकतंच पुण्यात केलं. एकता मासिक आणि राष्ट्र सेविका समितीच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीपराव करंबळेकर, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यादेवींनी त्या काळात केलेलं असामान्य कर्तृत्त्व आजही दीपस्तंभासारखं आहे असं राम शिंदे यावेळी म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारण्याकरता पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परवा शनिवारी राबवलेल्या मोहिमेत ४१० अर्ज निकाली काढण्यात आले.

****

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कराडची सात दिवसांची पोलिस कोठडी आज संपत आहे.

****

पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८ विरुद्ध ४० असा, तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचाच ५४ विरुद्ध ३६ असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...