Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• अडीच लाख रुपये उत्पन्न गटातल्या लाभार्थींना लाडकी बहिण योजनेचे लाभ मिळणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण.
• छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा.
• प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दोन लाख कोटी रुपयांचा लाभ होणार.
• सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीकडून विविध उपक्रमांचं आयोजन.
आणि
• छत्रपती संभाजीनगर महापालिकेला माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये प्रथम क्रमांक, दीड कोटी रुपयांचं बक्षीस देऊन महापालिकेचा गौरव.
****
लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महिला आणि बालविकास खात्याकडे दिला असून, अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, जालना इथल्या प्रशासकीय इमारतीसह नियोजन भवनाच्या कामाची पाहणी करुन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात सुलभता आणण्याची सूचना, पवार यांनी केली.
****
बिहारमध्ये पाटणा इथं ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला काल प्रारंभ झाला. संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्ष होत असताना, संसद आणि राज्य विधीमंडळांचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान, या अनुषंगाने या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे. लोकसभा तसंच राज्यसभेतले पीठासीन अधिकारी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह देशाच्या विविध भागातून आलेले विधीमंडळांचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी यात सहभागी झाले आहेत.
****
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरु असलेल्या आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची काल भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झालं असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार तसंच विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.
****
कोलकाता इथल्या आर जी कार रुग्णालयातल्या महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला दोषी संजय रॉय याला सियालदाह इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबाला १७ लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीबाबत न्यायालयीन चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर काल सादर करण्यात आला. अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून, आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत, तसंच पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या या चकमकीत अक्षय ठार झाला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट यांनी, येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं...
पोलीस, कलेक्टर आणि ग्रामीण एस पी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती घेणार आहोत. आधार कार्ड बनवणारी, इलेक्शन कार्ड देणारी सुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत. आणि एकही बांगलादेशी या शहरामध्ये राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.
****
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला.
****
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांची भर पडणार असल्याची माहिती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. काल परदेशी पत्रकारांसमवेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी दिल्ली इथं संवाद साधला. महाकुंभमेळ्याला ४५ कोटी भाविक भेट देण्याची शक्यता आहे. यात १५ लाख परदेशी पर्यटक असतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. १३ जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
****
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या कॅडेटना काल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते रक्षामंत्री पदकाने गौरवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मनन शर्मा या छात्राचा समावेश आहे. काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात राजनाथसिंह यांनी, सर्व छात्रांना एकता आणि राष्ट्रीय अखंडतेला आपल्या जीवनात प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्या स्थापनेची ५० वर्ष पूर्ण करत आहे, या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळाच्या कार्यालया समोर रंगीत रांगोळी काढून दीप प्रज्वलन करून विविध उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली..
सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांचे संवर्धन आणि प्रचार प्रसार महामंडळाने केला आहे. सुर्वणमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम, विशेष कार्यक्रम, प्रदर्शन आणि पर्यटकांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. स्थानिक समृदाया सोबत भागीदारीतून पर्यटन विकास यांचा समावेश आहे.
****
भेसळमुक्त दूध उत्पादन ही काळाची गरज असून, त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल नागपुरात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 'वर्ल्ड ॲनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्स- वॅन्कॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण हा राजकारणाचा नव्हे तर संवेदनशीलतेनं हाताळण्याचा विषय असल्याचं, मुंडे यांनी म्हटलं आहे. वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं...
एखादा पाशवी अत्याचार, निर्घृण हत्या ही समाजावर लागलेला कलंक आहे. आणि तो कलंक पुसण्यासाठी सर्व लोकं त्या त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याबद्दल तेवढं दायित्व नक्कीच आमच्या सर्वांचं आहे. आणि त्या विषयी संवेदनशीलता बाळगणं हे देखील आमचं दायित्व आहे.
****
राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये प्रथम येण्याचा मान छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पटकावला असून, दीड कोटींचे बक्षीस देऊन महापालिकेचा गौरव करण्यात आला. विविध प्रकारच्या स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती, तसंच वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण, हवेची गुणवत्ता, खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामं करण्यात आल्यामुळे महापालिकेचा गौरव करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मंदिर समितीच्या जमिनीवर ३०० मेगावॅटचा क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी, तब्बल एक हजार ३५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, देशभरातल्या नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा च्या माध्यमातून धाराशिव इथल्या जयंत जगदाळे यांनी आपल्या शेती उत्पन्नात वाढ केली आहे. त्यांच्या यशोगाथेचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत...
या शेडनेटमधून त्यांनी मिरची, दोडका ही पिकं घेऊन उत्पन्न सुरू केलं आहे. एक एकर मध्ये २४ लाख रूपये खर्चून उभारलेल्या या शेडनेट साठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून जयंत जगदाळे यांना अठरा लाख रुपयांचं अनुदान देखील मिळालं आहे. दहा एकरमध्ये जेवढं उत्पन्न निघतं, तेवढं उत्पन्न एक एकरमध्ये निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून पाच अश्वशक्तीचा कृषीपंप देखील घेतला आहे. या सोलार युनिटमधून सर्व पिकांना दिवसा पाणी देण्याची सोय झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनांचा लाभ घेऊन शेती उत्पन्नात केलेली वाढ इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी २७ जानेवारीपासून जिल्हाभरात दोन आठवड्याचं शिबिर घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment