Monday, 26 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 May 2025

Time 18.10 to 18.20 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

·      मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड इथल्या जाहीर सभेत माहिती

·      देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

आणि

·      मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

****

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं आज हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या शंखनाद या जाहीर सभेत ते बोलत होते. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

विकसित भारत बनवण्यात महाराष्ट्राचं महत्वाचं योगदान राहील, असा विश्वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना शहा यांनी, भारत, भारताची जनता आणि भारताची सेना, यावर हल्ला झाला, तर भारत सहजासहजी सोडणार नाही, असा संदेश या माध्यमातून संपूर्ण जगात गेला असल्याचं सांगितलं. ऑपरेशन सिंदूर आणि त्याची माहिती देण्यासाठी जगभरात गेलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळावर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकांचं त्यांनी खंडन केलं. नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचा मुद्दा देखील शहा यांनी उपस्थित केला. मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, ऑपरेशन सिंदूरबद्दल केंद्र सरकार तसंच भारतीय संरक्षण दलांचे आभार मानले. नांदेडच्या विकासाला गती देणार असून, वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.

खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा मोठ्या प्रमाणात विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

****

तत्पूर्वी, नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी अमित शहा यांच्या हस्ते झाली. गेल्या दहा वर्षात देशातलं वैद्यकीय क्षेत्राचं चित्र बदललं असल्याचं सांगून वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागाही वाढवण्यात आल्याची माहिती शाह यांनी दिली.

****

देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त गुजरातमध्ये दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असून, अनेक वस्तूंसह रेल्वे आणि मेट्रोचं तंत्रज्ञानही आपण इतर देशांना निर्यात करू लागलो असल्याचं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात देशानं दशकांच्या बेड्या झुगारणारे अभूतपूर्व निर्णय घेतल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

या कार्यक्रमात रेल्वे इंजिन प्रकल्पासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं.

****

झारखंडमध्ये लातेहार भागात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सीपीआय नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनीष यादव ठार झाला. त्याच्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं. तर या कारवाईत कुंदन खेरवार या अन्य एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर १० लाख रुपयांचं बक्षीस होतं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै तर दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. प्रवेशासाठी अंतिम अर्ज तीन जून पर्यंत भरता येणार आहे. विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी पाच जूनला प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास विद्यार्थी सहा आणि सात जूनला तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी आठ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती शिक्षण संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या ११२ शिक्षणक्रमांच्या परीक्षांना उद्यापासून सुरूवात होत आहे. राज्यभराल्या ५८० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, चार लाख २५ हजार २०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात १२१ जेष्ठ नागरिक आणि राज्यातल्या विविध तुरुंगातील तीन हजार १६ कैद्यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची एक जून रोजी होणारी पूर्वघोषित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

****

राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबई, ठाणे तसंच नवी मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबईत २४ तासात १३५ पूर्णांक चार मिलिमीटर पाऊस झाला.

कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, या भागात आज अतिवृष्टीची नोंद झाली. दौंडमध्ये ११७ मिलिमीटर, बारामतीत १०४ पूर्णांक ७५, इंदापुरात ६३ पूर्णांक २५ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

सोलापूरमध्ये ६७ पूर्णांक ७५ मिलिमीटर पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात सहा नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंढरपूर इथं भीमा नदी पात्रात तीन जण अडकले असून, बचावकार्य सुरु आहे.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झालं. तिथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. य़ावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पुढचे काही दिवस मुंबई आणि राज्याच्या अनेक भागांत सतत जोरदार पावसाचा अंदाज असून, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ८०व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात बाभळगाव इथं त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहरातल्या विलासबाग इथं देशमुख कुटुंबियांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. गायक आनंद भाटे यांनी यावेळी शास्त्रीय संगीत आणि भक्तीगीतं सादर केली.

****

बीड जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून कृषी विभागातल्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी संप सुरू आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे, खरीप हंगामात कृषी विभागाची पेरणी पूर्व कामं खोळंबली आहेत. मात्र, शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी, संप सुरू असतानाही पंचनामे करण्याचा निर्णय कृषी सेवक संघटनेनं घेतला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...