Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
बिहारच्या चौफेर विकासासाठी डबल इंजन सरकार
सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून आज काराकाट इथं आपल्या हस्ते हजारो
कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होत आहे, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये आज
४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आलं.
पहलगाममध्ये निर्दोष व्यक्तींना दहशतवाद्यांनी
ठार करण्यात आलं. या कृत्याचं चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असं
आपण बिहारमध्ये येऊन देशाला वचन दिलं होतं. ते वचन पूर्ण केल्यानंतर आता आपल्या भेटीला
आलो आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
देशातून नक्षलवादाचं उच्चाटन लवकरच होईल, असं
पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात उत्तर प्रदेश दौऱ्यासाठी
रवाना होणार आहेत. कानपूर इथं त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी
करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूंछ
भागाचा दौरा केला. भारतानं दहशतवादाविरोधात हल्ला केला होता, मात्र
पाकिस्ताननं तो स्वतःवर ओढवून घेतला, असं शहा नागरीक समाज सदस्य कार्यक्रमात
म्हणाले. पूंछ हल्ल्यात मृत व्यक्तींच्या परिवारातील सदस्यांना सरकारी नोकरी दिल्याचं
शहा यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर यापुढे असंच कठोर दिलं जाईल, असं
ते म्हणाले.
****
ई-कॉमर्स संकेतस्थळांवर वॉकी टॉकीसह रेडिओ
उपकरणांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी सरकारनं नियम जारी केले आहे. ग्राहकांच्या
सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या, वैधतेबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि कायद्याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवांदरम्यान वापरल्या
जाणाऱ्या महत्त्वाच्या संप्रेषण नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणाऱ्या वायरलेस उपकरणांच्या
अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न
आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नियम जारी केले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते
आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात १५ नर्सना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल
पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश
नड्डा, राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर
गवई यांनी आज न्यायमूर्ती निलय अंजारिया, न्यायमूर्ती विजय बिष्णोई आणि
न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली.
सर्वोच्च न्यायालय परिसरात आज झालेल्या कार्यक्रमात तीन नव्या न्यायाशीधांना शपथ देण्यात
आली.
****
खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळानं सौदी अरबचा दौरा काल पूर्ण केला. शिष्टमंडळानं सौदी
अरबमधील विचारवंत,
तज्ज्ञ आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांनी दहशतवादाविरोधातील
भारताची भूमिका स्पष्ट केली.
****
भारतीय जनता पक्षानं काँग्रेस नेते राहुल
गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात केलेल्या
वक्त्याप्रकरणी काँग्रेसवर टीका केली. अशाप्रकराचे वक्तव्य करुन काँग्रेस सशस्त्र दलांचे
मनोबल कमी करत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार
परिषदेत केला.
****
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण
इथं गावालगत असलेल्या एका खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली.
निखील वाढवे आणि संघर्ष पडघणे अशी या मुलांची नावं आहेत. एका लग्न समारंभानंतर गावालगत
असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं बुडाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यात लाखनी कृषी उत्पन्न बजार
समितीच्या कृषी केंद्रात १२९ मॅट्रिक टन बोगस खत आढळल्यानं कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी सचिवाला अटक करण्यात आली आहे.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या २६ व्या आशियाई
ॲथलेटीक्स स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक
पटकावलं. अविनाश साबळेच्या यशस्वी कामगिरीनंतर अविनाशच्या मांडवा गावात आनंदोत्सव साजरा
करण्यात आला. अविनाशची आई वैशाली साबळे आणि वडील मुकुंद साबळे यांनी त्याच्या कामगिरीबद्दल
आनंद व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment