Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28 May 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ आणि ३० मे रोजी
सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिक्कीम इथं सिक्कीम ऍट फिफ्टी कार्यक्रमात
पंतप्रधान सहभागी होतील. तर, उत्तर प्रदेशातील कानपूर इथं पंतप्रधानांच्या
हस्ते २० हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात
येणार आहे. बिहारमध्ये पंतप्रधान करकत इथं ४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विकासकामांचं
उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तर, पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत
अलिपूरदूर इथं शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे.
****
आज स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची १४२
वी जयंती साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली
अर्पण केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी
राजभवन इथं सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांना अभिवादन केलं. राष्ट्रभक्तीचा हुंकार, स्वातंत्र्यवीर
सावकर यांना कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं
आज स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. समर्थनगर
इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला उपआयुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद
चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या
वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं. मी सावरकर प्रेमी मित्रमंडळ, जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था यांच्यावतीनं
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
याठिकाणी संध्याकाळी व्याख्यान आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.
धाराशिव शहरात जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीनं
छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी आमदार कैलास पाटील,
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह
राजे निंबाळकर,
यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील
सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ २८ ते ३१ मे दरम्यान इंडोनेशियाला भेट देत आहे. शिष्टमंडळ
आज सकाळी जकार्ता इथं पोहोचले. दहशतवादाविरुद्ध भारताची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी
सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहेत.
****
राज्यात तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे
आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. पुणे इथं तीन जालना इथं दोन जणांचा
तर आणि मुंबई,
रायगड आणि अहिल्यानगर इथं प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद
आहे. लातूर इथं गेल्या दिवसांत सरासरी २०६ पूर्णांक ५ मिलीमीटर पाऊस झाला. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १५५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून फुलंब्री तालुक्यात
सर्वाधिक १७७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं
आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात
सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात गेल्या
२४ तासांत लांजा इथं सर्वाधिक ११८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सिंधुदुर्ग जिल्हयात आज सकाळपासून मुसळधार
पाऊस सुरू असून याठिकाणी रेड अलर्ट देण्यात
आला आहे.
पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना
आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं
वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड
आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात कृषी चिकित्सालय आणि कृषी
तंत्रज्ञान माहिती केंद्रात जवळपास १३० मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळला आहे.
संशयित मिश्र खताची अमरावती इथं तपासणी करण्यात आली त्यानंतर हा साठा बोगस असल्याचे
उघडकीस आले आहे. संबंधित खत उत्पादन कंपनी आणि वितरकांकडे यासंबंधीचे कोणतेही परवाने
नसल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रेल्वे विभागातर्फे २८ जून पासून ‘भारत-भूतान दरम्यान गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन’ विशेष
रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे विभागाचे प्रसिद्धी कार्यकारी संचालक दिलीप
कुमार यांनी ही माहिती दिली. दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानक इथून ही रेल्वे सुटणार
असून १४ दिवसांच्या दौऱ्यात विविध ठिकाणांना भेटी देणार आहे. या रेल्वेत १५० पर्यटक
प्रवास करू शकणार आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज दुसऱ्या
फेरीत कॉर्लोस अल्कराज,
इगा स्विएटेक आणि आर्यना सबालन्का यांचे सामने होणार आहेत. पहिल्या
फेरीतल्या सामन्यात नोवाक जोकोविचनं अमेरिकेच्या मॅकन्जी मॅकडोनाल्डवर ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment