Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 27 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून मध्ये गांधीनगर इथं ते ‘शहरी विकास २०२५’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विकास
कामांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांचं गांधीनगर इथे
आगमन झाल्यानंतर त्यांचा एक भव्य रोड शो होत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर होत असलेल्या
या रोड शोमध्ये नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकावत पंतप्रधानांचं स्वागत केलं.
****
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत
पुदुच्चेरी इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या २५ दिवसीय कार्यक्रमाचं आज
उद्घाटन करण्यात आलं. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंटडाऊन कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात येत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर असून
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन
केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील
मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमित शहा यांचं विशेष
व्याख्यानही आज होणार आहे. याशिवाय, छत्रपती संभाजी महाराज
राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान कार्यक्रमही आज शहा यांच्या उपस्थितीत होणार
आहे.
****
पुढच्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचं समूळ
उच्चाटन केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी दिली. ते काल नांदेड इथे झालेल्या शंखनाद जाहीर सभेत बोलत होते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह
अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारत आपल्या सीमांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून, ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं जगाला हाच स्पष्ट संदेश दिला आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं
राबवलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे मराठवाड्याला आगामी पाच वर्षात पाणी
मिळेल,
असं शहा म्हणाले. मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी एक
लाख कोटी रुपये खर्चून नदीजोड प्रकल्प सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
मुंबई पुणे ठाणे, रायगड, सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. येत्या दोन
दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा हवामान
खात्याचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी पावसानं एकशे सात वर्षांचा विक्रम मोडत राज्यात
वेळेआधीच प्रवेश केला आहे. आज परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपला शेतमाल आणि पशुधन सुरक्षित स्थळी ठेवण्याचं
आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
यांची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांना आदरांजली
अर्पण केली आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या
पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २४ जून
ते १६ जुलै तर दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्य
मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यात शैक्षणिक वर्ष
२०२५-२६ साठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला कालपासून सुरूवात झाली.
प्रवेशासाठी अंतिम अर्ज तीन जून पर्यंत भरता येणार असून, अंतिम
गुणवत्ता यादी आठ जून रोजी प्रसिद्ध होईल.
****
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यात
झालेल्या अपघातात गेवराई तालुक्यातले सहा जण मृत्युमुखी पडले असून अन्य एक जण
गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. हा अपघात गेवराई पासून पाच किलोमीटर अंतरावर
असलेल्या गढीच्या उड्डाणपूलावर काल रात्री उशिरा झाला. रविवारी रात्री झालेल्या
एका किरकोळ अपघातात महामार्गाच्या दुभाजकात गाडी अडकली होती, ती काल काढत असताना एका भरधाव कंटेनरनं सात तरुणांना चिरडल्यामुळे हा अपघात
झाला.जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी शहरातल्या एस एस मोबाईल शॉपी मध्ये चौतीस लाख रुपये
किमतीच्या मोबाईल आणि इतर साहित्याची चोरी करून फरार झालेल्या चोरांना परभणी
पोलिसांनी अटक केलं आहे. या कारवाईत ८१ मूल्यवान मोबाईल आणि एक बोलेरो पिक अप वाहन
जप्त करण्यात आलं आहे.न्यायालयानं या सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली आहे.
****
स्वित्झर्लंडच्या नॉटविल शहरात सुरू असलेल्या जागतिक पॅरा
ॲथलेटिक्स ग्रँड प्री क्रीडा स्पर्धेत भारतीय पॅरा ॲथलीट महेंद्र गुर्जरनं
पुरुषांच्या एफ फॉर्टी टू भालाफेक प्रकारात ६१ पूर्णांक १७ मीटर भालाफेक करून नवा
जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलं आहे. याशिवाय सुमित अंतिल या भारतीय पॅरा
ॲथलिटनंही एफ सिक्स्टी फोर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे.
****
No comments:
Post a Comment