Friday, 30 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ, विकसित भारतासाठी कृषीचा विकास आवश्यक-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्यात साडेचार हजार गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवणार, कृषी विद्यापिठांनी उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक

·      १२ जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, हवामान विभागाची माहिती

आणि

·      २६ व्या आशियाई ॲथलेटीक्स स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक

****

देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ काल ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाला. आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असून, शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगशाळांमधून बाहेर पडून शेतकर्यांपर्यंत पोहोचत आहेत. आणि आपल्या नव्या संशोधन आणि कृषीविषयक घडामोडी यांची माहिती त्यांना देत आहेत, असं चौहान यांनी सांगितलं.

दरम्यान, विकसित कृषी संकल्प अभियानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. भारताला विकसित देश बनवण्यासाठी सुरवातीला कृषी क्षेत्राला विकसित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. शेतकर्यांच्या शेतमाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि कृषी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या अभियानाबद्दल बोलताना ते म्हणाले:

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

विकसित कृषि संकल्प अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाला. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभत असून, त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी अभियानाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि ५० कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून चार हजार ५०० गावांमध्ये राबवलं जाणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवड करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया तसंच कीड आणि रोग नियंत्रण जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबत कृषी हवामान केंद्राचे संचालक सचिन सूर्यवंशी यांच्यासह कृषी शास्त्रज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

अमेरिकन कपाशीच्या तीन सरळ वाणांचं लोकार्पणही परभणी कृषी विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, कृषी संशोधनाच्या माध्यमातूनही शेतकर्यांना मार्गदर्शन केलं जात असल्याचं ते म्हणाले.

****

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटनही काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून, राज्यातल्या कृषि विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचं मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रस्तावित नविन इमारतीचं ई-भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. गंगाखेड रोड वरील ब्राम्हणगाव आणि ब्रम्हपुरी या गावाच्या शिवारात या महाविद्यालयासाठी २० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर ४३० खाटांचं रुग्णालय आणि १०० विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

****

हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या २७१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि महिला मेळाव्याला संबोधित केलं. शासनाच्या सर्व प्रकारच्या साडे बाराशे सेवा ऑनलाईन देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या सेवा नागरीकांना घरबसल्या वॉट्सॲपच्या माध्यमातून मिळवता येतील, असं ते म्हणाले. आगामी दिडशे दिवसांच्या कार्यक्रमात ई - गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची ताकद जगाला दिसली, भारतीय सैन्यानं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपलं सामर्थ्य दाखवून दिलं, असं ते म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावला तालुका करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

हिंगोली इथल्या वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव तसंच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, वसमत इथल्या हरिद्रा संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्वप्रकारचे सहकार्य करू असंही त्यांनी आश्र्वासित केलं.

****

प्रसार भारती - प्रसारण आणि प्रसारासाठी सामायिक ऑडिओ - व्हिज्युअल, पीबी शब्दने यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स आणि व्हिडिओ संपादकांना नि:शुल्क सेवा देण्याच्या उद्देशानं नोंदणी करण्यास आमंत्रित केलं आहे. पीबी शब्द, कॉपीराईट मुक्त, प्रामाणिक आणि वापरासाठी सुरक्षित असं व्यासपीठ आहे. देशभरातले वृत्त विषयक पोर्टल शब्दच्या माध्यमातून दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या विश्वासार्ह स्त्रोतांपर्यंत पोहोचू शकतात.

****

गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक ३२ टक्के अधिक आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याची ही घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी, जनतेचं अभिनंदन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा २०२५-२६ वर्षाकरता, ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा पतआराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल या पत आराखड्याचं विमोचन करण्यात आलं. शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज पुरवठा होण्यासाठी बॅंकांनी कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आशिव ते उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्सचा अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. पुणे - उदगीर आणि मुंबई - उदगीर धावणार्या या खासगी ट्रॅव्हल्स होत्या. जखमींना लातूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई बस स्थानकावर बसने चिरडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास मृत अंकुश मोरे, हे बस मध्ये चढत असताना शेजारी उभी असलेली बस प्रवाशाच्या अंगावरून गेली. याप्रकरणी पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, पुढचे दोन आठवडे राज्यात कोकण वगळता इतर भागात पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित राहीलेली कामं पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल. १२ जून पासून राज्यात मान्सून परत येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

****

दक्षिण कोरियात सुरु असलेल्या २६ व्या आशियाई ॲथलेटीक्स स्पर्धेत बीडचा अविनाश साबळे आणि ज्योती याराजी यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. अविनाशनं तीन हजार मीटर अडथळ्यांची शर्यत हंगामातला नवा विक्रम नोंदवत आठ मिनिटं २० सेकंदात पूर्ण केली. या कामगिरीसह अविनाश या स्पर्धेत गेल्या ३६ वर्षात अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ॲथलीट ठरला आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत, अंतिम फेरीत प्रवेश केला. काल चंदीगढ मध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १०१ धावा केल्या. बंगळुरुच्या संघाने केवळ दहा षटकं दोन चेंडुत हे लक्ष्य साध्य केलं. दुसर्या क्वालिफायर सामन्यात आज मुंबई इंडयन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments: