Wednesday, 28 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उपराष्ट्रपती जगदीप धनकड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातल्या सहा मान्यवरांचा समावेश

·      अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषानुसार नुकसानभरपाई

·      आयकर विवरण पत्र भरण्याला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश भागात अतिवृष्टीनं नुकसान, पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. उपराष्ट्रपती मुंबई इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या 65 व्या आणि 66 व्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले. यात राज्यातील सहा मान्यवरांचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना लोककार्यासाठी मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. तर डॉ. विलास डांगरे, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलं. कालच्या कार्यक्रमात ६८ मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात आले.

****

राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाई अनुदान देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार जालना महानगरपालिकेला पाच वर्षात ३९२ कोटी तर इचलकरंजी मनपाला ६५७ कोटी रुपये मिळणार आहेत.

राज्यातल्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदं निर्माण करण्याला, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मध्ये एक हजार तीनशे एक्कावन्न पदांच्या सुधारीत आकृतीबंधाला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणाला देखील राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

मुंबईत काल माधवबाग मंदिराचा दीडशेवा वर्धापन दिन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. देशात इंग्रजांचं राज्य असताना धार्मिक कार्य करुन देशाची सेवा करण्याचं कार्य दीडशे वर्ष चालवणं सोपं नाही, असं ते यावेळी म्हणाले. या संस्थेत वेद, उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करण्याचं कार्य करण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, या मंदीरात सेवाभाव जपला जात असून, गोसेवा असो किंवा समाजसेवा, माधवबागने नेहमीच पुढाकार घेतला असल्याचं सांगितलं.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आयकर विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ दिली आहे. आता करदात्यांना ही विवरणपत्रं येत्या १५ सप्टेंबरपर्यंत भरता येतील. अधिसूचित प्राप्तिकर विवरणपत्रात (आयटीआर) करण्यात आलेल्या व्यापक बदलांमुळे आणि कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी प्रणाली सज्जता आणि आयटीआर युटिलिटीजच्या अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, सीबीडीटीनं विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

****

राज्याच्या सांस्कृतिक विभागानं यावर्षीपासून सुरू केलेला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादि मी, अनंत मी’, या गीताला प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता, त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी झाडांवर वीज कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

बीड जिल्ह्यातल्या सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बहुतांश नदी, नाल्यांना पुर आला आहे. काल दुपारीही जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातल्या हादगाव तालुक्यात वरवट इथं काल झालेल्या मुसळधार पावसात एक महिला आणि दोन मुलींचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. लातूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागातही काल मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

दरम्यान, सरकारनं अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना एकरी वीस हजार रूपयांची मदत तातडीनं द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात असूनही या संकटावर काही बोलले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसामुळे पेरण्या करण्याची घाई न करता मॉन्सूनच्या एक दोन मोठ्या पावसापर्यंत थांबावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते म्हणाले....

बाईट - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

****

भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळवलेल्या विजयाबदल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेडमध्ये आज शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात येणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी सहभागी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना, नांदेडचे निवृत्त कर्नल प्रकाश कस्तुरे यांनी भारतीय सैन्य दलाबद्दल गौरवोद्गार काढले,

बाईट - निवृत्त कर्नल प्रकाश कस्तुरे

****

छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहायक दिलीप त्रिभूवन यांना पाच लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्ये करण्यासाठी त्यांनी १८ लाख रुपये लाच मागितली होती. त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. यापूर्वीही या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून सदर जमिनीबाबत २३ लाख रुपये लाच घेतल्याचं पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात येत्या एकोणीस जुलैला एकाच दिवशी पन्नास लाख वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन असून, वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सहा महिन्यांनंतर या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

देशभरात येत्या २९ मे पासून सुरु होणारं “विकसित कृषी संकल्प अभियान” महाराष्ट्रातल्या प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामधून राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात, तुळजापूर इथल्या कृषि विज्ञान केंद्राकडून राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असं आवाहन, या केंद्राचे प्रमुख डॉक्टर सचिन सूर्यवंशी यांनी केलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातही नव्वद गावांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून किसान रथ फिरवून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, विविध पिकांच्या सुधारित जाती, नवीन कृषि अवजारं, यासह अन्य कृषीविषयक माहिती दिली जाणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...