Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
May 2025
Time 18.10 to
18.20 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे
२०२५ दुपारी १८.०० वा.
****
·
अतिवृष्टीमुळे प्रभावित
झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या
दस्तासाठी लागणारी नोंदणी फी माफ करण्यास मान्यता
·
छत्रपती संभाजी
महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादि मी, अनंत मी’ या गीताला
प्रदान
·
राज्याच्या बहुतांश
भागांत पावसाचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
आणि
·
आशियायी ॲथलेटिक्स
अजिंक्यपद स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगला सुवर्ण पदक
****
राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय
आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली.
शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय
देखील यावेळी घेण्यात आला. जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाई
अनुदान देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार जालना महानगरपालिकेला पाच वर्षात
तीनशे ब्याण्णव कोटी तर इचलकरंजी मनपाला सहाशे सत्तावन्न कोटी रुपये मिळणार आहेत.
****
मुंबईत आज माधवबाग मंदिराचा दीडशेवा वर्धापन दिन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. देशात इंग्रजांचं राज्य असताना धार्मिक कार्य करुन
देशाची सेवा करण्याचं कार्य दीडशे वर्ष चालवणं सोपं नाही, असं ते यावेळी म्हणाले. या संस्थेत वेद, उपनिषद आणि गीतेचा
अभ्यास करण्याचं कार्य करण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, या मंदीरात सेवाभाव जपला जात असून, गोसेवा असो किंवा
समाजसेवा, माधवबागने नेहमीच
पुढाकार घेतला असल्याचं सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, माधवबाग ट्रस्टचे
ट्रस्टी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राज्याच्या सांस्कृतिक विभागानं यावर्षीपासून सुरू केलेला छत्रपती संभाजी महाराज
राज्य प्रेरणा गीत पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादि मी, अनंत मी’, या गीताला प्रदान
करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी, सावरकर यांचे नातू
रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह, असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे.
****
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन
आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत
झालं. सावरकरांनी कधीही संघर्ष सोडला नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या कार्याचा
आढावा घेतला.
****
दरम्यान, यशवंत पंचायत राज
अभियानांतर्गत अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसंच गुणवंत अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांना आज मुंबईत
राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचा विकास सर्वसमावेशक
होण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा विकास होणं आवश्यक
असून, या कार्यात पंचायत
राज संस्थांची भूमिका महत्वाची आहे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.
****
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू
यांना आदरांजली अर्पण केली. राज्याच्या विधान भवनात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत पुदुच्चेरी इथं आंतरराष्ट्रीय
योग दिनाच्या उलटगणतीच्या २५ दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. २१ जून रोजी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या
कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंटडाऊन
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध
मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करत आहेत. या वर्षी सरकारनं १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
आजच्या कार्यक्रमात ६८ मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येतील.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आयकर विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ दिली आहे. आता
करदात्यांना ही विवरणपत्रं येत्या १५ सप्टेंबरपर्यंत भरता येतील.
****
राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम असून, बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत
आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. पुणे जिल्ह्यात अनेक
ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.
बारामती इथं विक्रमी पावसाची नोंद झाली. भीमा आणि नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार
पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळी चंद्रभागा नदीवरील
जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. तर, नदीपात्रातल्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. भीमा आणि
नीरा या दोन नद्यांवरचे २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.
घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. बदनापूर तालुक्यातही
पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी झाडांवर वीज कोसळण्याच्या घटनाही
घडल्या आहेत.
बीड जिल्ह्यातल्या सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बहुतांश नदी, नाल्यांना पूर आला आहे. आज दुपारीही
जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
लातूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागातही आज मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
आजपासून येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पावसाची तर तीस आणि एकतीस तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसामुळे पेरण्या करण्याची घाई न
करता मॉन्सूनच्या एक दोन मोठ्या पावसापर्यंत थांबावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी केलं आहे. ते म्हणाले –
बाईट – दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर
****
दक्षिण कोरियातल्या गुमी शहरात सुरू असलेल्या आशियायी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत
दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं.
त्यानं २८ मिनिटं ३८ सेकंदात हे अंतर पार केलं. पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत
भारताच्या सर्व्हिन सेबॅस्टियननं कांस्य पदक जिंकलं.
****
राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन दिल्या
जाणाऱ्या अधिसूचित
सेवा येत्या १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असं महा आयटीचे
व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितलं. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या भेटीत बोलत होते. सध्या ऑफलाईन पद्धतीनं दिल्या जाणाऱ्या तीनशे सहा सेवाही
ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात साडे तीन-चार दशकं सक्रीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव विश्वनाथअप्पा भोसीकर यांचं आज निधन झालं. ते एकोणसत्तर
वर्षांचे होते. भोसीकर यांनी राज्य गृह आणि वित्त महामंडळाचे माजी अध्यक्ष, संचालक, जिल्हा परिषदेचे
माजी उपाध्यक्ष, नांदेड जिल्हा बँकेचे
विद्यमान उपाध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती. त्यांच्यावर उद्या पानभोसी या त्यांच्या
मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात गेवराई - बीड राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात
सहा जणांचा मृत्यू झाला. एक चारचाकी गाडी दुभाजकावर आदळल्यानंतर ती बाहेर काढण्याचा
प्रयत्न सुरू असतानाच, भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकनं बचावकार्य करणाऱ्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. यामुळे या मार्गावरची
वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी इथल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातला आवक-जावक
लिपिक दिगंबर ढोले याच्यावर तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी करून हद्दीच्या खुणा करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment