Saturday, 31 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 May 2025

Time 18.10 to 18.20 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ दुपारी १.० वा.

****

·      महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी

·      अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची चौंडी इथल्या कार्यक्रमात माहिती

आणि

·      विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम; शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती

****

महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं आज ‘देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात’ ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य, कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून, भारतीय वारश्याच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या, असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा दिला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यासोबतच पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी, ऑपरेशन सिंदूरमधलं महिलांचं योगदान, आणि अंतराळ-विज्ञानातली महिलांची वाटचाल आदींचा उल्लेख करत आजच्या स्त्री शक्तिचाही गौरव केला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी होत आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

देव, देश आणि धर्माची जबाबदारी पार पाडणाऱ्या अहिल्यादेवी या ऊर्जा केंद्र असून, प्रेरणा देणारंही केंद्र असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अहिल्यादेवींची महती देशातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या, असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म सोहळ्याच्या निमित्ताने चौंडी इथं विविध कार्यक्रम पार पडले. आज पहाटे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्ताने जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदौर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. कोकणवाडी चौक इथल्या अहील्यादेवींच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरमधल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या सातारा खंडोबा मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी सातारा धनगर समाज जयंती उत्सव समितीच्या वतीनं सातारा खंडोबा मंदिर परिसरात अहील्यादेवींना अभिवादन करण्यात आलं.

****

परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं अहिल्यादेवींचं भव्य स्मारक बनवण्यात येणार असल्याचं, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार असून, आमदार पाटील यांनी एक लाख रुपये देऊन निधी संकलनाचा शुभारंभ केला. सुशासन, न्याय आणि अध्यात्म यांचं प्रतीक असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचं हे एक सशक्त पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी धनगर समाज युवा संघटनांनी मोटरसायकल रॅली काढली. तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

****

परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथं आज विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्र मणि यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. मृदा आरोग्य चांगलं रहावं, यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन कुलगुरुंनी यावेळी केलं. ड्रोन तंत्रज्ञानाविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमात शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल असं युवा शेतकरी मंगेश देशमुख आणि प्रियंका कांबळे यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - शेतकरी प्रियंका कांबळे आणि मंगेश देशमुख

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आठ वाण, तीन कृषि यंत्रे अवजारे, ६१ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी ही माहिती दिली. या वाणांमुळे आणि तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, तसंच शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील, असं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी यावेळी सांगितलं.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. याअंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय आणि मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ टाळा, व्यसनमुक्त व्हा, आरोग्य सांभाळा अशी जनजागृती करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे तसंच सेवन करणाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंमलबजावणी पथकानं कारवाईचा बडगा उचलला आहे. २०२४-२५ या वर्षी ५१७ लोकांवर तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ लाख १ हजार ३० रुपये दंड वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करण्यात आले.

****

 

 

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या ‘भारत जिंदाबाद’ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंज मधल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप भडकलगेट इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर होईल.

****

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल, त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा परत आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल, असं कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...