Thursday, 29 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

५० वर्षांपूर्वी सिक्किमनं लोकशाही मार्ग स्वीकारला. आपल्या अद्वितीय भूगोलासह सिक्किमच्या जनतेनं भारतीय आत्म्याला स्वीकारलं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सिक्कीमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केलं. खराब हवामानामुळं पंतप्रधानांना सिक्कीमचा दौरा रद्द करावा लागला. सिक्कीमसह पूर्ण ईशान्य प्रदेश नव्या भारताच्या विकासगाथेतील चमकता अध्याय असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा मानवता आणि बंधुत्वावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर आता जगाला दिसत आहे की, भारत एकजुटीनं दहशतवादाचा मुकाबला करत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

शेतकऱ्यांची सेवा हीच खरी पूजा आहे. त्यांच्या मेहनतीमुळंच देश आज गहू, तांदूळ, मका, शेंगदाणे आणि सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. कृषीमंत्र्यांनी आज ओदीशातील पूरी इथून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानांतर्गत देशातील ७०० जिल्ह्यांमध्ये दोन हजारांहून अधिक कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पहिल्यांदाच दोन दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत. आज सायंकाळी ते उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. जम्मू विभागातील सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची गृहमंत्री पाहणी करणार आहेत. शुक्रवारी शहा पूंछला भेट देणार आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ३ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे.

****

सात बहुपक्षीय संसदीय शिष्टमंडळं आपापल्या परदेश दौऱ्यांदरम्यान उच्चस्तरीय चर्चा करत आहेत. खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ग्रीस-भारत संसदीय मैत्री गट आणि संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार समितीच्या सदस्यांसोबत एका सत्रात, भारतीय शिष्टमंडळानं दहशतवादाबाबत भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला.

रोममध्ये, खासदार रवी शंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा स्टेफानिया क्रॅक्सी यांची भेट घेतली. भारत आणि इटली यांचे द्विपक्षीय संबंध दृढ असून दहशतवादाविरोधात भारत आणि इटली यांच्यात एकमत असल्याचं रवी शंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली इथं राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात कवी संमेलनासह विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन केलं आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या गाथेनं या परिषदेचा समारोप होईल. साहित्य अकादमीच्या सहकार्यानं राष्ट्रपती भवन इथं या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि देशभरातील साहित्यिक उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसंच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांची उपस्थिती होती.

****

छत्रपती संभाजीनगर विभागात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक २५ पूर्णांक ९ मिलिमीटर पाऊस धाराशिव जिल्ह्यात, तर लातूर जिल्ह्यात १९ पूर्णांक ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या जायकवाडी धरणात २९.७९ टक्के पाणीसाठी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

****

राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत एनडीआरएफची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी एक एनडीआरएफ पथक पाठवण्यात आलं आहे. गडचिरोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक एसडीआरएफ पथक तैनात करण्यात आलं आहे. सचेत अ‍ॅपद्वारे राज्यातल्या ९३ लाख ३३ हजार नागरिकांना सतर्कतेचा इशारा संदेश पाठवण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीश कुमार खडके यांनी सांगितलं.

****

No comments: